……” कडाव मधील आदिवासी बांधव , अंगणवाडी , शाळकरी विद्यार्थ्यांचे जीवनमान उध्वस्त करणाऱ्या डंपिंग ग्राउंडचा प्रस्ताव अखेर कायमस्वरूपी रद्द “……
प्रशासक तथा ग्रामसेवक " प्रेमसिंग गिरासे " यांचे ग्रामस्थांना सहकार्य !

तोंडी नाही तर ” लेखी ठराव ” पत्राची ग्रामस्थांची मागणी…….
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यातील कडाव मधील आदिवासी बांधव , अंगणवाडी , शाळकरी विद्यार्थ्यांचे जीवनमान उध्वस्त करणाऱ्या ” डंपिंग ग्राउंडचा ” प्रस्ताव अखेर कायमस्वरूपी रद्द करण्यास लावण्यास ग्रामस्थांना यश आले असून याकामी प्रशासक तथा ग्रामसेवक प्रेमसिंग गिरासे यांचे ग्रामस्थांना सहकार्य जरी मिळाले असले तरी डंपिंग ग्राउंड रद्द करण्याचा आदेश अजून लेखी मिळाला नसल्याने लेखी ठराव पत्राची मागणी ग्रामस्थांनी केली आहे .
कडाव ग्रामपंचायत येथे माणकिवली गावाच्या हद्दीत, आदिवासी वस्तीच्या शेजारी तसेच गावाच्या मुख्य रस्त्यालगत डंपिंग ग्राउंड उभारण्याचा प्रस्ताव कडाव ग्रामपंचायतीकडून पुढे आणण्यात आला होता. दि. २७ जून २०२५ रोजी झालेल्या ग्रामसभेतील ठरावानुसार सर्व्हे क्रमांक १३७/१७ या जागेवर डंपिंग ग्राउंड उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला होता.
प्रस्तावित जागेजवळ आदिवासी लोकवस्ती, अंगणवाडी, शाळकरी विद्यार्थ्यांची नियमित वर्दळ तसेच ग्रामदैवत “ सातीचे देव ” यांचे स्थान असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. डंपिंग ग्राउंडमुळे परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता, माशा-मच्छरांचा प्रादुर्भाव, दूषित पाण्याचा धोका तसेच नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली होती.
यासंदर्भात माणकिवली ग्रामस्थ, महिला मंडळ, आदिवासी बांधव तसेच स्थानिक शेतकरी यांच्या वतीने कडाव ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले होते. ग्रामस्थांना विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करत सदर प्रस्ताव तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती , तसेच प्रस्ताव रद्द न झाल्यास आंदोलन, उपोषण आणि कायदेशीर लढा उभारण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला होता.
ग्रामस्थांचा वाढता विरोध, स्थानिक नागरिकांमधील संताप आणि सामाजिक वातावरण लक्षात घेता अखेर कडाव ग्रामपंचायतीने माणकिवली गावालगत प्रस्तावित करण्यात आलेला ” डंपिंग ग्राउंड प्रकल्प ” कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तथा प्रशासक प्रेमसिंग गिरासे यांनी दूरध्वनीवरून ग्रामस्थांना हि माहिती दिली. यावेळी त्यांनी संबंधित जागेत भविष्यात कडाव ग्रामपंचायतीमार्फत कोणत्याही प्रकारचे कामकाज करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीने यासंदर्भात अधिकृत लेखी पत्र द्यावे, अशी मागणी केली. त्यावर प्रशासक प्रेमसिंग गिरासे यांनी ग्रामस्थांना तसे लेखी पत्र देण्याचे आश्वासन दिले असल्याचे समजते.
दरम्यान, माणकिवली ग्रामस्थ, आदिवासी बांधव आणि स्थानिक शेतकरी यांच्या एकजुटीमुळे हा प्रस्ताव रद्द झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून ग्रामपंचायतीचे प्रशासक तथा ग्रामसेवक प्रेमसिंग गिरासे यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच पर्यावरण, आरोग्य आणि ग्रामस्थांच्या हिताच्या दृष्टीने घेतलेल्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.



