……” अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणास कर्जत तालुक्यातील बौद्ध बांधवांकडून विरोध “…….
कर्जत प्रांत अधिकारी " प्रकाश संकपाळ " व तहसीलदार " धनंजय जाधव " यांना दिले निवेदन !

घटनेच्या माध्यमातून ” डॉ बाबासाहेब आंबेडकर ” यांनी दिलेला हा संविधानिक अधिकार…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
संविधानिक आरक्षण व हक्क अबाधित ठेवणे तसेच सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या संविधानिक मूल्यांचे संरक्षण करण्याच्या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील विविध आंबेडकरी, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व जनहित संघटनांच्या वतीने शुक्रवारी कर्जत येथे मोर्चा काढून ” अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणास विरोध ” करत मा. उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ व मा. धनंजय जाधव , तहसीलदार कर्जत यांच्यामार्फत शासनाला निवेदन आज शुक्रवार दिनांक १० जुलै २०२६ रोजी प्रशासकीय भवन कर्जत येथे सादर करण्यात आले.

यावेळी उपस्थितांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जातींना सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक न्याय मिळावा या उद्देशाने आरक्षणाची घटनात्मक तरतूद केली असून, आरक्षण हा कोणताही दान किंवा सवलत नसून तो ” ऐतिहासिक सामाजिक अन्यायाची भरपाई करणारा संविधानिक अधिकार ” असल्याचे नमूद केले. निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणामुळे समाजात फूट पडण्याची शक्यता असून , सामाजिक न्यायाच्या तत्त्वाला धक्का पोहोचू शकतो. आजही अनुसूचित जाती समाजातील मोठा घटक ” शिक्षण, रोजगार, आरोग्य, निवारा आणि मूलभूत सुविधांपासून ” वंचित असल्याने आरक्षणाचे विभाजन करण्याऐवजी त्याची प्रभावी अंमलबजावणी, अनुशेष भरणे, रिक्त राखीव पदे तातडीने भरणे तसेच शिक्षण, शिष्यवृत्ती, कौशल्य विकास आणि आर्थिक सक्षमीकरणावर शासनाने अधिक भर द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

अनुसूचित जातींचे घटनात्मक आरक्षण कोणत्याही प्रकारे कमी किंवा विभाजित करू नये, शासन व निमशासकीय विभागांतील राखीव रिक्त पदे तातडीने भरावीत, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, आरोग्य व कौशल्य विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच समाजाच्या हितास बाधा पोहोचविणारा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी व्यापक सार्वजनिक चर्चा व संबंधित घटकांशी सल्लामसलत करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

याशिवाय, या निवेदनाची प्रत महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय विभाग तसेच भारत सरकारच्या संबंधित मंत्रालयाकडे तातडीने पाठविण्याची विनंतीही करण्यात आली.
यावेळी कर्जत तालुक्यातील विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी, बौद्ध बांधव, माता-भगिनी, युवक-युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे आंदोलन शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने पार पडले.




