दिल्ली NCR

…..” वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी कर्जत बायपासचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सुनील गोगटे यांनी घेतली भेट “……

स्वतः लक्ष घालणार , " केंद्रीय मंत्री नितीन गडकरी " यांचे सकारात्मक आश्वासन !

” डीपीआर ” तातडीने पूर्ण करून प्रकल्पाला गती द्या , अधिकाऱ्यांना दिले निर्देश……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत शहरातील नागरिकांना दररोज ” भीषण वाहतूक कोंडी, वेळेचा अपव्यय, वाढते प्रदूषण आणि अपघाताच्या धोक्याला ” सामोरे जावे लागत आहे . यास कारणीभूत असलेल्या बायपास रस्त्याच्या ” डिपीआर ” चे काम अगदी धीम्या गतीने सुरू असल्याने या बायपास कामाला गती देण्यासाठी कर्जत शहरातील भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुनील सदाशिव गोगटे यांनी ” केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी ” यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन राष्ट्रीय महामार्ग क्र. 548-अ वरील कर्जत बायपास प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी कर्जत बायपासचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तातडीने पूर्ण करून प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला गती देण्याची मागणी करणारे निवेदन मंत्री महोदयांना सादर केले.

            भाजप नेते ” सुनील गोगटे ” हे गेल्या काही वर्षांपासून कर्जत बायपाससाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत . त्याची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला , तसेच बायपासचा डीपीआर तयार करून तो वार्षिक आराखड्यात समाविष्ट करण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले होते. मात्र, सध्या डीपीआर तयार करण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने प्रकल्प रखडला असून कर्जत शहरातील नागरिकांना दररोज याचा त्रास सहन करावा लागत आहे , हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. म्हणूनच डीपीआर तयार करणाऱ्या एजन्सीला तातडीने काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात यावेत आणि संबंधित मुख्य अभियंत्यांना आवश्यक त्या सूचना देऊन प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रियेला गती देण्यात यावी, जेणेकरून कर्जत बायपासच्या प्रत्यक्ष कामास लवकरात लवकर सुरुवात होईल, अशी मागणीही त्यांनी केली.

        यावेळी ” केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ” यांनी निवेदनाची गंभीर दखल घेत तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी उपस्थित सहकारी अधिकारी व संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देत ” डीपीआरचे ” काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी आणि प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी स्वतः लक्ष घालून कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.

          या बैठकीनंतर ” कर्जत बायपास प्रकल्पाला ” गती मिळण्याची आशा निर्माण झाली असून, अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीचा व अन्य समस्यांचा सामना करणाऱ्या कर्जतकरांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!