……” सिलेंडर गॅसची टाकी संपल्यास त्वरित नवीन भरलेली टाकी द्या , हालिवली महिला मंडळाचे तहसीलदार व भारत गॅस एजन्सीला निवेदन “…….
ग्रामीण भागासाठी " ४५ दिवसांची " अट रद्द करा !

माजी सरपंच ” सौ. प्रमिला सुरेश बोराडे ” यांचा पुढाकार……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
शासनाने सिलेंडर गॅस साठी ग्रामीण भागासाठी ” ४५ दिवसांची ” अट लागू केलेली आहे , परंतु यामुळे महिलांना स्वयंपाक करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दैनंदिन जीवनातील कुटुंबातील असलेली चहा , नाश्ता , स्वयंपाक, इतर कामे गॅसवर करताना कुठलेही मोजमाप किंवा कोणत्याही प्रकारचा मीटर नसल्याने कित्ती गॅस संपला हे कळत नसल्याचे सांगत , ग्रामीण भागासाठी असलेली ४५ दिवसांची अट रद्द करून सिलेंडर गॅसची टाकी संपल्यास त्वरित नवीन भरलेली टाकी द्या , अशी जोरदार मागणी हालिवली ग्रामपंचायतीच्या मा. सरपंच ” सौ. प्रमिला सुरेश बोराडे ” यांच्या नेतृत्वाखाली हालिवली महिला मंडळाने मंगळवार दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी कर्जत तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले.

सध्या इलेक्ट्रिकचे दरही वाढलेले आहेत , त्यामुळे इलेक्ट्रिक शेगडी चा वापरहि परवडत नाही. सणावाराला गृहिणींचा दिवस तर स्वयंपाक घरातच जातो. सण उत्सवामध्ये घर भरलेले असते , मूलबालं , पै – पाहुणे घरीच असतात. त्यामुळे विविध पदार्थ बनवताना गॅसचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. चूल पेटवायची म्हटल्यास लाकडे, कोळसा उपलब्ध नसतो. इंधनासाठी वापरावीत इतकी झाडे तरी कुठे राहिली आहेत ? अशा वेळी गृहिणींना सिलेंडर साठी दारोदारी फिरावं लागतं , अशी महिलांची व्यथा सौ. प्रमिला बोराडे यांनी मांडली.

आणि म्हणूनच गॅस मिळण्या बाबत सर्व अटी रद्द करून गॅस संपल्यास त्वरित गॅसची भरलेली टाकी उपलब्ध करून देण्यात यावी , अशी मागणी हालिवली मा. सरपंच सौ. प्रमिला सुरेश बोराडे व हालिवली महिला मंडळ यांनी निवेदन सादर केले. यावेळी कर्जत नायब तहसीलदार सचिन राऊत व भारत गॅस एजन्सी कर्जत मधील एन.आर. कुलकर्णी मॅडम यांना निवेदन देण्यात आला. यावेळी सर्व महिलांनी आपली गॅस सिलेंडर संपल्यानंतर होणारा त्रास व अडचणी सांगितल्या.

यावेळी निवेदन देते प्रसंगी हालिवली मा. सरपंच सौ. प्रमिला बोराडे यांच्यासह , सौ. वर्षा शशीकांत उबाळे, सौ. प्रमिला भगवान दिनकर , सौ.दर्शना जयवंत बोराडे – माजी सदस्य , सौ. मंदा वासुदेव हाडप , करूणा बोराडे , सौ. प्रतिभा बारणे इत्यादी महिला उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे सिलेंडर साठी रांगेत उभे असलेल्या नागरिकांनी स्वेच्छेने पुढे येऊन मोठ्या प्रमाणावर सह्या केल्या व हा विषय हालिवली महिलांनी हाताळल्या बद्दल सगळ्यां महिला वर्गाचे धन्यवाद व्यक्त केले.




