……” उड्डाणपुलांच्या प्रस्तावावर अजून अंतिम मंजुरी नाही , मग श्रेयवादाचा एवढा गाजावाजा कशासाठी ? संकेत भासे यांचा संतप्त सवाल “…….

उड्डाण पुलांसाठी ” नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे साहेब, खासदार श्रीरंग आप्पा बारणे आणि आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांचे जोरदार सातत्यपूर्ण प्रयत्न……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत मतदार संघात सध्या ” श्रेयवादामुळे ” राजकीय वातावरण तापले आहे. रेल्वे गाड्या सुरू होण्यासाठी कोण निवेदन देतोय , मात्र रिझल्ट शून्य ? कोण उड्डाण पुलाचे श्रेय लाटतोय , पण मंजुरी , निधी अजून गुलदस्त्यातच ? येथील नेतृत्व यासाठी सातत्याने प्रयत्न करत असताना सोशल मीडियावर मात्र श्रेय घेण्यावरून प्रसिध्दी मिळवत असताना दिसत आहे. ज्यांना आपल्या मतदार संघात १६ वर्षे होऊनही मुंबई – गोवा हायवे रस्ता करता आला नाही , असे नेतृत्व कर्जतमध्ये श्रेय घेण्यास पुढे येत असेल व प्रश्न जेव्हा कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांच्यावर येत असल्याने त्यामुळे यावर संतप्त होत शिवसेनेचे कर्जत नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते ॲड संकेत दादा भासे यांनी या श्रेयवादाची ” कोंडी ” फोडत सविस्तर खुलासा केला आहे.

कर्जत शहरातील वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कर्जत चार फाटा आणि गुंडगे–आकुर्ले या दोन उड्डाणपुलांचे प्रस्ताव पुढे आले आहेत. या प्रस्तावांचे आम्ही स्वागत करतो. मात्र, या दोन्ही उड्डाणपुलांना अद्याप ” अंतिम शासकीय मंजुरी ” मिळालेली नसून विषय कॅबिनेट बैठकीत प्रलंबित आहे, ही वस्तुस्थिती कर्जतकरांसमोर स्पष्ट होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे नागरिकांच्या वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असणाऱ्या या उड्डाण पुलांसाठी ” नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे साहेब, खासदार श्रीरंग आप्पा बारणे आणि आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांचे जोरदार सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या कामाचे श्रेय एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने स्वतःपुरते घेणे योग्य नाही.
विशेष म्हणजे, मे महिन्यात नवीन कर्जत रेल्वे स्थानकाच्या दौऱ्यादरम्यान मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी ” महारेलच्या ” अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष सूचना करून संबंधित ठिकाणांची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्याच अनुषंगाने महारेलच्या माध्यमातून पुढील कार्यवाही आणि प्रयत्न सुरू आहेत. म्हणूनच आज कर्जतकरांसमोर प्रश्न असा आहे की, ज्या कामाची प्रक्रिया अनेक लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून आणि संबंधित शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून सुरू आहे, त्या कामाला अंतिम मंजुरी मिळण्यापूर्वीच ” मंजुरी मिळाली ” , असा प्रचार करण्याची घाई का ? उड्डाणपूल हा कर्जतच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे आम्ही या प्रकल्पाला कोणताही विरोध करत नाही. उलट, कर्जतच्या वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी प्रश्न सुटला पाहिजे, यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, करतायत , हीच आमची भूमिका आहे.
परंतु प्रस्ताव, पाहणी, प्रशासकीय प्रक्रिया, कॅबिनेट निर्णय आणि अंतिम शासकीय मंजुरी या सर्व गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कॅबिनेटचा अंतिम निर्णय होण्यापूर्वीच ” मंजुरी ” चा दावा करून राजकीय प्रसिद्धी मिळवणे म्हणजे कर्जतकरांच्या डोळ्यात ” धूळफेक ” करण्याचा केविलवाणा खोटा प्रकार आहे.
कर्जतकरांना आता जाहिराती आणि श्रेयवाद नको आहे. त्यांना हवे आहे , अधिकृत मंजुरी, निधीची तरतूद आणि प्रत्यक्ष कामाची सुरुवात , फायनल रिझल्ट ! त्यामुळे संबंधितांनी कॅबिनेटच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा करावी. कर्जतच्या विकासकामांमध्ये श्रेयवादापेक्षा सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांना महत्त्व दिले पाहिजे.
कर्जतकरांच्या विकासासाठी जो कोणी प्रयत्न करेल, त्याचे स्वागत; पण अंतिम मंजुरीपूर्वी ” मंजुरी ” चा ढोल वाजविण्याला आमचा ठाम विरोध , असा स्पष्ट संकेत विरोधी पक्षनेते संकेत दादा भासे , कर्जत नगर परिषद यांनी दिले आहेत.




