……” श्रीकृपा अभ्यासिकाच्या माध्यमातून संचालिका वंदना चित्ते व संचालक विकास चित्ते यांचे स्तुत्य उपक्रम “……

कर्जत परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासाची संधी उपलब्ध करून संचालकांचे कौतुकास्पद कार्य – उप विभागीय पोलिस अधिकारी ” श्री. राहूल गायकवाड ” यांचे प्रतिपादन !
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत नगर परिषद हद्दीत नुकतेच सुरू झालेल्या ” श्रीकृपा अभ्यासिकेला ” दोन महिने पुर्ण झाले , त्या निमित्ताने श्री. राहूल गायकवाड साहेब – उपविभागीय पोलिस अधिकारी, कर्जत , श्री. तानाजी चव्हाण – मुख्याधिकारी, कर्जत नगरपालिका, व श्री . आंबेतकर – मॅनेजर कॅनरा बँक यांचे मार्गदर्शन व भेटीचे आयोजन श्रीकृपा अभ्यासिकाचे वतीने नुकतेच प्रेरणा निवास , नानामास्तर रिक्षा स्टँड च्या बाजूला , मुद्रे – कर्जत येथे करण्यात आले होते. या प्रसंगी मान्यवर पाहुण्यांचे स्वागत ” संचालिका वंदना चित्ते व संचालक विकास दादा चित्ते ” यांचें हस्ते शाल , श्रीफळ , तुळशीचे रोप व ऐतिहासिक पुस्तक देऊन करण्यात आले.

यावेळी विकास दादा चित्ते यांनी प्रस्तावना करताना सांगितले की, या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा, चांगले यश मिळवावे . यश मिळविताना आई , वडीलांचे कष्ट विसरु नये , त्यांची स्वप्ने साकार करावीत .योग्य नोकरी भेटल्यावर आपण समाजाचे , आपल्या गावाचे काही देणं लागतो , देशाचे काही देणं लागतो या भावनेतून सामाजिक बांधिलकी ने काम करावे व सेवा करावी , असे मत व्यक्त केले .

उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल गायकवाड (DYSP) यांनी मुलांना उत्तम मार्गदर्शन करताना सांगितले की , प्रतिकुल परिस्थितीची जाणीव ठेऊन, अपार कष्ट करुन, प्रचंड अभ्यास करुन यश मिळवावे. आपल्या बद्दल न्युनगंड बाळगु नये. सोशल मिडिया पासून दूर रहा , चांगली संगत धरा , यश मिळवायचे असेल , तर कष्टाला पर्याय नाही. हे वय अभ्यास करण्याचे आहे इतर गोष्टी करण्यासाठी आयुष्य पडलंय. स्वतः ला व आपल्या घरच्या लोकांना फसवू नका. तर तानाजी चव्हाण – मुख्याधिकारी यांनी आपल्या मार्गदर्शनात नमुद केले की , आत्मविश्वास पाहीजे. ध्येय ठरविले पाहिजे. त्या ध्येयाचा पाठलाग करताना येणाऱ्या अडचणींवर मात केली पाहिजे. सबब सांगता कामा नये. सोशल मिडिया वर आज ज्या काही अनावश्यक गोष्टी चालू आहेत त्या पासून लांब रहाणे आवश्यक आहे , कोणत्याही परिस्थितीत यश मिळवायचे ही जिद्द पाहीजे. मोबाईलचा अती वापर आपल्या मेंदूवर होत असल्याने केलेला अभ्यास लक्षात रहात नाही , म्हणून अति आवश्यकता असेल तरच अभ्यासिकेत मोबाईल आणावा. प्रचंड वाचन केल्याने हमखास यश मिळेल असे सांगून , मनातील भिती घालवावी. आहे त्या परिस्थितीत , प्रतिकुल परिस्थितीत आपल्याला यश मिळवायचे आहे , हे ठासून ठरविले पाहिजे.

आंबेतकर – मॅनेजर कॅनरा बँक यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, कोणताही अधिकारी बघा त्यांनी यशस्वी होण्यासाठी ” अपार मेहनत ” घेतलेली असते. या अभ्यासिकेत आपणही चांगला अभ्यास करुन यश मिळवावे. ” अपयश ही यशाची पहिली पायरी आहे ” हे नमुद करुन अभ्यास करताना ” एकाग्रता ” कशी होईल याचा विचार करावा. मागील अभ्यासक्रम बघणे , मागील प्रश्नपत्रिका सोडविणे व लक्ष ठरवून त्याप्रमाणे यश मिळेपर्यंत थांबायचे नाही , हा ठाम निश्चय असायला पाहिजे असे प्रतिपादन केले. आपल्या डोळ्यासमोर एक आदर्श असायला हवा , मनात भिती न बाळगता ” यशाला गवसणी ” घालावी , असे मोलाचे विचार व्यक्त केले.
सर्व मान्यवरांनी ” श्रीकृपा अभ्यासिकाचे ” कौतुक करुन कोणतीही मदत लागल्यास नक्की सांगावे , आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी येऊ , हा शब्द दिला. कर्जत तालुका पेंशनर असोशिएशन चे अध्यक्ष, सेवानिवृत्त कृषी अधिकारी व जागेचे मालक जे.के. देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आपण या अभ्यासिकेत अभ्यास करणेसाठी आलो आहे तर अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे व उत्तम यश मिळवावे. अभ्यासिकेत उत्तम व्यवस्था असल्याने आपल्या साठी हि सुवर्णसंधी आहे , असे नमुद केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ” गौरव चित्ते ” याने केले व सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केल्याने याबद्दल सर्वांचे आभार मानले. अभ्यासिकेतील विद्यार्थीनी कु. नेहा बोराडे हिने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप मोलाचे सहाय्य केले.




