दिल्ली NCR

…..” विविध मागण्या घेऊन कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे नागपूर येथे १९ ऑक्टोबर रोजी होणार ४६ वे अधिवेशन “…….

कर्जत प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना कोकण विभाग अध्यक्ष " संजीव मोरे " यांच्या हस्ते निमंत्रण व समस्यांचे दिले निवेदन !

अधिवेशनाला ” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ” यांची प्रमुख उपस्थिती……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

गेली अनेक वर्षे महसूल कर्मचारी वर्गाच्या असलेल्या समस्या वरिष्ठ पातळीवर मांडून देखील त्यावर अद्यापि ठोस उपाय योजना केल्या गेल्या नाहीत. ” कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने ” आजपर्यंत प्रशासनाशी समन्वय ठेवून निवेदने, स्मरणपत्रे, आढावा बैठका व प्रत्यक्ष भेटी यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला आहे.

           सदर प्रश्न हा केवळ काही कर्मचाऱ्यांचा वैयक्तिक प्रश्न नसून संकलन बदलाच्या प्रक्रियेतील पारदर्शकता, सेवा ज्येष्ठतेचा विचार, समान संधी आणि शासकीय कार्यालयीन कामकाजातील प्रशासकीय शिस्त यांच्याशी संबंधित असल्याने नागपूर येथे होणाऱ्या १९ ऑक्टोबर २०२६ च्या अधिवेशनात मान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री यांच्या समवेत होणाऱ्या चर्चेत हे विषय मांडण्यात येणार असल्याचे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा कोकण विभागीय अध्यक्ष संजीव मोरे यांनी कर्जत ” प्रशासकीय भवन ” येथे प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ व तहसीलदार धनंजय जाधव यांना अधिवेशनाचे निमंत्रण व कर्मचारी वर्गाच्या विविध समस्यांचे निवेदन सादर केले. यावेळी त्यांच्या समवेत कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष महसूल विभाग – रायगड राहुल प्रल्हाद सूर्यवंशी हे देखील होते.

          यावेळी होणाऱ्या अधिवेशनात पुढील मागण्या मान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मांडण्यात येणार आहेत. १) तीन वर्षे पूर्ण झालेल्या महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करून त्यांचे संकलन बदल करण्याची प्रक्रिया राबविण्यात यावी. २) संकलन बदल करताना संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेचा योग्य विचार करण्यात यावा. ३) अद्याप पर्यंत संकलन बदलाची संधी न मिळालेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने संधी देण्यात यावी. ४) संबंधित कर्मचाऱ्यांकडून उपलब्ध संकलनांपैकी १ ते ३ पसंतीक्रम/अभिप्राय घेऊन, उपलब्धता, सेवाज्येष्ठता व प्रशासकीय गरज यांचा विचार करून संकलन देण्याची पारदर्शक पद्धत राबविण्यात यावी. ५) ज्या कर्मचाऱ्याने पूर्वी एखाद्या संकलनावर काम केले आहे, त्याला तेच संकलन पुन्हा देऊ नये, याबाबत स्पष्ट निकष निश्चित करण्यात यावेत. ६) शासकीय कार्यालयांमध्ये खासगी इसमांकडून शासकीय कामकाज करून घेतले जात असल्यास त्याची आवश्यक तपासणी करून असे कामकाज तातडीने बंद करण्याबाबत निर्देश देण्यात यावेत. ७) खासगी इसमांकडून शासकीय कामकाज करून घेत असल्याच्या तक्रारी असलेल्या कार्यालयांची आवश्यकतेनुसार तपासणी करून नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी. ८) खासगी इसमांकडून शासकीय कामकाज करून घेताना कार्यालयातील टेबल, खुर्ची, संगणक, प्रिंटर, शासकीय ई-मेल, OTP, शासकीय फाईल्स, अभिलेख, राजमुद्रा/शासकीय शिक्का इत्यादी शासकीय साधने, प्रणाली व अभिलेखांचा वापर करण्यास परवानगी दिली जात असल्यास सदर प्रकार तातडीने बंद करण्यात यावा. तसेच अशा प्रकारे शासकीय साधनसामग्री, माहिती, अभिलेख अथवा डिजिटल प्रणालीचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास चौकशी करून नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.९) दि. ११ जून २०२६ रोजीच्या आढावा बैठकीतील मुद्दा क्र. १० ची दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या इतिवृत्तामध्ये योग्य व स्पष्ट नोंद घेऊन दुरुस्त/सुधारित इतिवृत्त पुन्हा प्रसिद्ध करण्यात यावे.१०) वरील सर्व विषयांची पुढील आढावा बैठकीच्या इतिवृत्तामध्ये स्वतंत्र व स्पष्ट नोंद घेण्यात यावी. ११) सदर विषयांवर संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीचा लेखी कार्यवाही अहवाल (Action Taken Report) कास्ट्राईब कर्मचारी महासंघास उपलब्ध करून देण्यात यावा. १२) जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त स्तरावर यापूर्वी झालेल्या बैठका, निवेदने व पाठपुराव्याच्या अनुषंगाने आजपर्यंत झालेल्या कार्यवाहीची माहिती महासंघास लेखी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात यावी. यासाठी वरिष्ठ स्तरावरून आवश्यक निर्देश देण्याबाबत सूचना करण्याची मागणी करणार आहेत.

            त्याचप्रमाणे मुद्दा क्र. १७ – “ मागासवर्गीय गृहनिर्माण सोसायटीस जागा उपलब्ध करून देणे ” , आणि मुद्दा क्र. १८ – “ कास्ट्राईब कर्मचारी महासंघास कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देणे ” , हे दोन्ही विषय अत्यंत महत्त्वाचे असून, त्यावर संबंधित प्रशासनाकडून ठोस व निर्णयात्मक कार्यवाही होणे आवश्यक आहे. मा. जिल्हाधिकारी , मा. विभागीय आयुक्त , कोकण विभाग यांच्या स्तरावर सातत्याने प्रशासकीय पाठपुरावा करूनही सदर विषयाबाबत अपेक्षित कार्यवाही झाली नाही अथवा महासंघाने मांडलेल्या मागण्यांवर ठोस निर्णय घेण्यात आला नाही, तर दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या ४६ व्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री महोदय, मा. महसूल मंत्री महोदय तसेच महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्य सचिव यांना मान. कृष्णाजी इंगळे साहेब, अध्यक्ष, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य व संजिवजी मोरे – जिल्हाध्यक्ष, रायगड तथा कोकण विभागीय अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघ (महा. राज्य) यांच्या नेतृत्वाखाली सदर विषय स्वतंत्रपणे मांडण्यात येणार आहेत.

          यावेळी कर्जत प्रशासकीय भवन येथे अजित पवार – नायब तहसीलदार प्रांत कार्यालय , संदीप गाढवे – कुळवहिवाट सहाय्यक महसूल अधिकारी प्रांत कार्यालय , सचिन राऊत – निवासी नायब तहसीलदार , रविंद्र दळवी – पुरवठा शाखा निरीक्षक , जगन्नाथ उबाळे – सहाय्यक महसूल अधिकारी , मृणाली शिरसाट – महसूल नायब तहसीलदार , धोंडीबा कांबळे – सहाय्यक महसूल अधिकारी , यांना अधिवेशनाचे निमंत्रण देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!