……” कर्जतमध्ये महावीर पेठ येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याचा लहान बालकावर जीवघेणा हल्ला “……
रात्रीच्या वेळी चौका - चौकात " कुत्र्यांच्या झुंडच्या झुंडी " , कर्जत नगर परिषदेची " बघ्याची " भूमिका !

” मनुष्य महत्वाचा की भटके कुत्री ” , कर्जतमध्ये ” संतापाचे ” वातावरण ……
भिसेगाव – कर्जत/ सुभाष सोनावणे –
कर्जत नगर परिषद हद्दीत सर्वच प्रभागात ” भटक्या कुत्र्यांच्या झुंडच्या झुंडी ” पहाण्यास मिळत आहेत . त्यातील काही कुत्री पिसाळलेली , आजारी असल्याने सकाळच्या प्रहरी पहाटे कामावर जाणारे चाकरमनी , कामगार , कर्मचारी , महिला वर्ग , लहान बालकांना निशाणा करून झुंडच्या झुंडी अंगावर धावून जात असतात . हिंस्र असलेले हे कुत्रे भुंकण्यानेच नागरिकांची ” पाचावर ” बसत असून ते घाबरतात , यामुळे कर्जत शहरात मुख्य रस्त्यावर , प्रभागातील अंतर्गत रस्त्यांवर ” भटकी कुत्रेच कुत्रे ” दिसत असून नागरिक त्यांच्या दहशतीने हताश झाले असून कर्जत नगर परिषदेची यंत्रणा फक्त ” बघ्याची ” भूमिका घेत असल्याने पालिकेचे मुख्याधिकारी ” तानाजी चव्हाण ” यांच्या या कारभारा विरोधात ” संतापाचे ” वातावरण आहे.
आज रविवार दिनांक २४ मे २०२६ रोजी सकाळच्या दरम्यान कर्जत नगर परिषद हद्दीतील रेल्वे स्टेशन लगत असलेल्या महावीर पेठेत पद्मावती ज्वेलर्स च्या बाहेर एका लहान मुलाला एका पिसाळलेल्या कुत्र्याने अंगावर हल्ला करत मांडीला जोरदार चावा घेतला . या घटनेने त्या मुलाला खूप गंभीर दुखापत झाली असून आज पाच ते सहा जणांना कुत्रा चावल्याची घटना घडली आहे. त्यामुळे कर्जत नगर परिषदेने त्वरीत या भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत निर्णय घेऊन त्यांना पकडून जेरबंद करायला पाहिजे , अशी संतप्त मागणी जोर धरू लागली आहे .

या भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक ” लाकडी दांडे ” घेऊनच परिसरातून जात असल्याचे अनेकांनी सांगितले आहे . हि भटकी कुत्री गाडीच्या मागे भुंकत जात असून नागरिक भयभीत होत आहेत . न्यायालयाने भटक्या कुत्र्यांसाठी नियमावली दिलेली असतानाही काही नागरिक , प्राणी मित्र रस्त्यावरच , सार्वजनिक ठिकाणी अश्या भटक्या कुत्र्यांना खायला घालत असताना दिसत आहेत . त्यामुळे अश्या व्यक्तींवर कारवाई होणे गरजेचे असल्याचे अनेकांचे संतप्त मत आहे .
कर्जत नगर परिषद अश्या जीवघेण्या घटना घडल्यावर जागी होत असून मगच त्या कुत्र्याला जेरबंद करत आहेत . पिसाळलेली कुत्री चावण्याच्या घटना घडत असल्याने ” मनुष्य महत्वाचा की प्राणी महत्वाचा ” असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे . आज उपजिल्हा रुग्णालय येथे ६ ते ७ जणांना कुत्र्याने चावा घेतला असल्याचे रुग्ण उपचारासाठी होते . पावसाळ्यापूर्वी अश्या घटना घडत असल्याने नागरिक भयभीत झाले असून या संदर्भात अश्या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी कर्जत नगर परिषदेकडे कुठलीच यंत्रणा नसल्याचे समजते . अशा गंभीर आणि तातडीच्या परिस्थितीत तसेच अनेक वेळा भटक्या कुत्र्यांना उपचारांसाठी किंवा स्टेरिलायझेशनसाठी देखील पकडावे लागते, परंतु त्यासाठीही कोणतीही व्यवस्था कर्जत नगर परिषदेकडे उपलब्ध नाही. हि दुर्दैवी बाब आहे .

भविष्यात अशा घटना अधिक धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती व्यवस्था निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे . दुर्दैवाने, एखादी गंभीर घटना किंवा कोणाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन याची दखल घेणार का ? असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे .
टाकवे येथील रॉक्सिन मॅडम ची टीम यांच्या प्रयत्नांने या कुत्र्याला पकडण्यात यश आला आहे .




