……” पत्रकार विकास मिरगणे यांना पितृ शोक “…..
आदिवासी आश्रम शाळेवर " शिक्षक - मुख्याध्यापक - अधीक्षक " पदावर काम केलेले " आदिनाथ मिरगणे " यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन !

आदिवासी विद्यार्थ्यांच्या ” शैक्षणिक प्रगतीसाठी ” उल्लेखनीय कार्य…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यात अनेक वर्षे आदिवासी आश्रमशाळांमध्ये ” शिक्षक – मुख्याध्यापक – अधीक्षक ” अश्या मुख्य पदावर शिक्षण क्षेत्रात काम केलेले ” आदिनाथ मिरगणे ” यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले . कर्जत नगर परिषद हद्दीतील संजय नगर दहिवली कॉलेज परिसरात ते अनेक वर्षे कुटुंबासहित वास्तव्यास होते .
ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांची शिक्षण क्षेत्रात प्रगती व्हावी , म्हणून त्यांची सेवा उल्लेखनीय होती . शिक्षक म्हणून त्यांची पहिली भरती झाली होती , त्यानंतर मुख्याध्यापक व सेवा निवृत्तीच्या वेळी ते ” अधीक्षक ” या पदावर होते .आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी शिक्षण आणि समाजसेवेसाठी अर्पण केले. ” शिक्षक, मुख्याध्यापक आणि अधीक्षक ” अशा विविध पदांवर काम करताना त्यांनी नेहमीच कर्तव्याला प्राधान्य दिले.
विशेषतः कर्जत तालुक्यासह , ठाणे, पालघर, जव्हार आणि रायगड यांसारख्या दुर्गम व आदिवासी भागांतील आश्रमशाळांमध्ये काम करताना त्यांनी आदिवासी समाजाच्या ” उत्थानासाठी ” अत्यंत मोलाचे योगदान दिले. शासकीय योजना शेवटच्या घटकातील व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात , यासाठी ते नेहमीच धडपडत असत. त्यांनी लावलेल्या सेवारूपी रोपट्यांचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून, त्यांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत आहेत , हाच त्यांच्या कार्याचा खरा वारसा आहे.
आपल्या निरपेक्ष सेवेने आणि मार्गदर्शनाने शेकडो विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळवणारे ” आदिनाथ मिरगणे ” यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे अकाली निधन झाले . मिरगणे कुटुंबावर मोठा आघात झाला असून दुःखाचा डोंगर कोसळला आहे. साम टीव्ही चे पत्रकार व कर्जत तालुक्यासहित रायगड जिल्ह्यातील नावाजलेले ” विकासनामा डिजिटल न्यूज चॅनल ” चे संपादक विकास मिरगणे यांचे ते वडील होते .




