दिल्ली NCR

……” प्रबोधनकार हे सामाजिक दुष्कृत्यांविरुद्ध लढणारे द्रष्ट्ये युगपुरुष “……- डॉ. रवींद्र मर्दाने

प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत येथे ” प्रबोधनकार ” यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

” प्रबोधनकार ठाकरे हे जातीव्यवस्था – अंधश्रद्धा – अस्पृश्यता – हुंडापद्धती – बालविवाह – देवदासी प्रथा अशा सामाजिक दुष्कृत्यांविरुद्ध जनमत तयार करून लढणारे द्रष्ट्ये युगपुरुष होते “, असे प्रतिपादन कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले. येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात आयोजित प्रबोधनकार ” केशव सीताराम ठाकरे ” यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सहयोगी संशोधन संचालक डॉ. भरत वाघमोडे हे होते.

        डॉ. मर्दाने यांनी प्रबोधनकारांच्या जीवनातील विविध प्रसंगांचे नेटके विवेचन केले. ते म्हणाले की, इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांची साहित्यिक दादागिरी प्रबोधनकारांनी आपल्या लेखणीने मोडून काढली. कर्मवीर भाऊराव पाटील त्यांना गुरु आणि पित्याप्रमाणे पूज्य मानीत, यातच त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबतचे त्यांचे योगदान चिरस्मरणीय राहील. पत्रकार, संपादक, वक्ते, इतिहासकार, नाटककार, चित्रकार अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचे ते धनी होते. मराठी भाषा आणि मराठी माणसाची अस्मिता जोपासण्यासाठी त्यांनी आपले शरीर चंदनाप्रमाणे झीजविले, यावर त्यांनी प्रकाश टाकला. 

      अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. वाघमोडे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांनी जीवनभर सामाजिक समता निर्माण करण्यासाठी परिश्रम घेतले, असे नमूद करीत त्यांचे संस्कार आणि वारसा जतन करण्याचे कार्य त्याच्या भावी पिढीकडून होणे अभिमानास्पद असल्याचे सांगितले.

        कार्यक्रमाला कनिष्ठ भात पैदासकार डॉ. महेंद्र गवई, कीटकशास्त्रज्ञ डॉ. वैशाली सावंत,कनिष्ठ कृषिविद्यावेत्ता डॉ. नामदेव म्हसकर, सहायक उद्यानविद्यावेत्ता डॉ. राजेंद्र सावळे, अधीक्षक नरसिंह निरडे, दीप्ती पाटील व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

      सुरुवातीला सहयोगी संशोधन संचालक डॉ. वाघमोडे यांनी प्रबोधनकारांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि उपस्थित शास्त्रज्ञ, अधिकारी यांनी त्यांना पुष्पान्जली अर्पण करीत विनम्र अभिवादन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!