Uncategorized

……” नरेंदर कब मिलेगा सिलेंडर , वंचित बहुजन आघाडीचे कर्जतमध्ये संतापजनक क्रोध आंदोलन “…..

दैनंदिन जीवनावर होत आहे विपरीत परिणाम !

कर्जत तालुक्यात गॅस टंचाई विरोधात जिल्हा महासचिव ” धर्मेंद्र दादा मोरे आक्रमक “……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

गॅस टंचाई व गॅस कमतरतेमुळे दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत असून महिला वर्गात कमालीचा संताप खदखदत असताना केंद्र व राज्य सरकार ” डोळे बंद ” करून हि विदारक परिस्थिती बघत असून याविरोधात केंद्र व राज्य सरकारला ” झोपेतून जागे ” करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने राज्यभर संतप्त आंदोलन छेडले असून आज कर्जतमध्ये देखील ……” नरेंदर कब मिलेगा सिलेंडर “…. हे क्रोध आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव ” धर्मेंद्र दादा मोरे ” यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले . 

           आज सोमवार दिनांक ०६ एप्रिल २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आद. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने ” नरेंदर कब मिलेगा सिलेंडर ” हे क्रोध आंदोलन संपूर्ण राज्य भर होत असताना कर्जत तालुक्याच्या वतीने सुद्धा शासन व प्रशासनचे गॅस टंचाई आणि दैनंदिन जीवन, रोजीरोटी, रोजगारावर झालेल्या परिणामाबद्दल सरकारकचे लक्ष वेधण्यासाठी आज संतप्त निवेदन कर्जत तहसील कार्यालयात देण्यात आले . 

          काही दिवसांपूर्वी अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच ” शंकरराव शिरसाठ ” हे गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ०५ तास उन्हात रांगेत उभे होते, त्यातच रांगेत उभे असतांना त्यांचा मृत्यू झाला होता. तसेच अमरावती येथे देखील एका तरुणाचा गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर कर्जत तालुक्यात देखील महिला व नागरिकांना गॅस मिळण्यासाठी उन्हातान्हात तासनतास उभे रहावे लागत आहे . गॅसच्या तुटवड्यामुळे स्वयंपाक घरातील गॅस शेगड्या थंड पडल्या आहेत, चहाची टपरी, रस्त्यावरील खाद्य पदार्थांचे स्टॉल्स बंद झाले आहेत. जगण्यासाठी अनेकांना कोळसा आणि लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करून जगावे लागत आहे. महाराष्ट्रातील हजारो छोटे व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली आहेत. राज्यातील अनेक शहरात अनेक हॉटेल्समध्ये चहा, नाश्त्याचे पदार्थ , इडली, डोसा, तळले जाणारे पदार्थांची विक्री बंद झाली आहे. लग्न समारंभ, घरगुती कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, केटरिंगची कामे गॅस टंचाईमुळे पुढे ढकलण्यात आले आहेत. अनेक शहरात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मेसमध्ये गॅस नसल्यामुळे जेवणाचे डब्बे बंद झाले आहेत. अनेक विद्यार्थी आपल्या गावाकडे परत गेले आहेत. अनेक शहरात रिक्षा चालकांनी मोर्चा काढून आपला आक्रोश व्यक्त केला. सर्व सामान्य जनता पूर्णतः हतबल झाली आहे. अनेक ठिकाणी एलपीजी गॅस कमी प्रमाणात मिळत असल्यामुळे रिक्षा भाडे वाढले आहे, त्याचा थेट परिणाम जनतेच्या खिश्यावर होत आहे.

          याविरोधात ११ मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी इशारा दिला होता की, मध्यमवर्गीय, गरीब कुटुंबे, हॉटेल्स, चहाच्या टपरी, फूड स्टॉल, विशेषतः रस्त्यांवरील खाद्यविक्रेते, विवाहसोहळे व धार्मिक कार्यक्रमांमधील केटरिंग व्यवसाय, एलपीजीवर चालणाऱ्या रिक्षा; तसेच एलपीजी आणि पेट्रोकेमिकल्सची भासणारी टंचाई या सर्वांमुळे एलपीजीवर अवलंबून असलेल्या अनेक उद्योगांवर प्रचंड परिणाम होतील. आज त्यांची ही ” चेतावणी ” खरी ठरली आहे. पंतप्रधान मोदींचा संकट काळात तयारीचा अभाव असल्याबाबत ही त्यांनी कठोर टीका केली होती. यामुळे छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर लाथ मारली आहे, हे आज सत्यात उतरले आहे . केंद्र सरकार, राज्य सरकार व रायगड जिल्हाधिकारी म्हणत आहेत की, परिस्थिती सर्वसामान्य आहे, तर मग सांगा की, नागरिक अजूनही गॅस सिलेंडरसाठी रांगेत का उभे आहेत ? आपण आपल्या ” AC ” ऑफिसमधून बाहेर पडावे आणि बाहेरील परिस्थिती बघावी. गॅस सिलेंडरसाठी लाखो लोकं रांगेत उभे आहेत. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे . 

          याचा फायदा घेत अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरचा ” काळा बाजार ” होतोय, दुकाने बंद पडताय. गॅस सिलेंडर काही ठिकाणी मिळत जरी असला, तरी ५ ते ७ हजार रुपयांचा काळाबाजार करून मिळतोय. काही ठिकाणी तर सिलेंडरमध्ये पाणी भरलेलं मिळाले आहे. सरकार वारंवार दावा करत आहे की कोणतंही संकट नाही. परंतु हे साफ खोटे असल्याचा आरोप यावेळी जिल्हा महासचिव धर्मेंद्र दादा मोरे यांनी केला आहे . म्हणूनच या क्रोध आंदोलनात त्यांनी पुढील मागणी केल्या आहेत – 

१) गॅस सिलेंडरसाठी होणारी कृत्रिम टंचाई थांबवावी. 

२) गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखावा.

३) २५ दिवसांनंतर गॅस मिळेल, ही अट शिथिल करण्यात यावी.

४) काळाबाजारी करणाऱ्या लोकांवर सक्त कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

५) वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून कम्युनिटी किचन सुरू करावेत. सरकारकडून प्रत्येक २ किलोमीटरवर जेवणाची व्यवस्था करून गरजू लोकांना अन्न देण्यात यावे.

६) सरकारने सांगावे की, परिस्थिती कधी सामान्य होईल ?, जेणेकरून सामान्य लोकांना ह्या परिस्थितीसाठी तयार राहता येईल.

७) राज्यात अनेक ठिकाणी KYC नाहीये म्हणून नागरिकांना गॅस सिलेंडर दिला जात नाहीये. नागरिकांना तातडीने गॅस दिला जावा.

८) जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये उज्ज्वल गॅस योजने अंतर्गत किती लोकांना गॅस सिलेंडर दिले आहे ? याचे ऑडिट करावे.

             यावेळी कर्जत तहसील कार्यालयात व प्रांत कार्यालयात सदर निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा महासचिव धर्मेंद्र दादा मोरे , कर्जत तालुका अध्यक्ष प्रदीप ढोले , शहर अध्यक्ष लोकेश यादव , शैलेश खोब्रागडे , आंनद खैरे , दिनेश लवंडे , कमलाकर जाधव , भरत देसाई , अमित गायकवाड , सचिन जाधव , राजेश गायकवाड आदि पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!