…..” आजच्या युगात शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन करणे गरजेचे “……
" जागतिक मृदा दिनी " डॉ.भरत वाघमोडे यांचे शेती विषयक सुवर्णमध्य !

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
” मातीला ” जिवंत परिसंस्था मानून तिचा ऱ्हास टाळणे, आरोग्य शाश्वत ठेवणे, सुपीकता, उत्पादकता टिकवून ठेवणे आवश्यक असल्याने माती व्यवस्थापनाच्या पध्दती अवलंबविणे गरजेचे आहे. आजच्या या युगात शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य आहे “, असे प्रतिपादन प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जतचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.भरत वाघमोडे यांनी येथे केले. कर्जत संशोधन केंद्राच्या प्रशिक्षण सभागृहात थायलंडचे राजे दिवंगत भूमीबोल अदुल्यदेज यांची जयंती ” जागतिक मृदा दिन ” म्हणून साजरी करण्यात आली.त्यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले की, मृदा ही आपली जननी आहे. मृदाच्या महतीची जाणीव प्रत्येकाला असायला हवी. मातीची निर्मिती होण्यास शेकडो वर्षे लागतात म्हणून तिची काळजी घेणे काळाची गरज आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकू नये , यावर प्रकाश टाकत , शेती किफायतशीर होण्याचे मार्ग उपलब्ध असून आता व्यावसायिक शेतीकडे वळण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी मागणी केल्यास ” रब्बीसाठी ” बियाणे उपलब्ध करून देऊ , अशी ग्वाही त्यांनी दिली. कर्जत संशोधन केंद्राला ” गतिमान भात पैदास प्रकल्प ” मंजूर झाल्याने नव्या तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांच्या गरजेनुरूप भात बियाणे चार ते पाच वर्षात उपलब्ध करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रगतशील शेतकरी चंद्रकांत मांडे यांनी वातावरणातील बदल व शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा उहापोह करीत शासकीय धोरणांची अंमलबजावणी तळमळीने करण्याची गरज असल्याचे प्रतिपादित केले . यावेळी कृषिविद्यावेत्ता डॉ. विजय सागवेकर , वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ डॉ. मीनाक्षी केळुस्कर , कनिष्ठ संशोधन सहायक महेशकुमार , प्रगतशील शेतकरी निलिकेश दळवी व हेमंत कोंडीलकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी ” शेतकऱ्यांचे मसिहा ” थायलंडचे राजे दिवंगत ” भूमीबोल अदुल्यदेज ” व ” जागतिक मृदा दिनाची ” ऐतिहासिक पार्श्वभूमी विशद केली , ते म्हणाले की , जगभरातील माणसांच्या एकूण अन्नाच्या गरजांपैकी ९५ टक्के गरजा मातीवर अवलंबून आहेत. मातीच्या ऱ्हासामुळे दरवर्षी ४०० बिलियन डॉलरचे नुकसान होत आहे. मातीच्या धुपामुळे ७.६ दशलक्ष टन तृणधान्याचे नुकसान होत आहे. हा ऱ्हास असाच सुरू राहिल्यास नजीकच्या काही वर्षात अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन हिरावले जाऊन त्यांना बेरोजगारी आणि उपासमार या समस्यांना तोंड द्यावे लागेल.त्यामुळे मातीचे शाश्वत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
सुरुवातीला डॉ. वाघमोडे , शास्त्रज्ञ व उपस्थित शेतकऱ्यांनी ” भूमीबोल अदुल्यदेज ” यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास तालुक्यातील प्रगतशील शेतकरी , अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




