टॉप न्यूज़

…..” आमदार महेंद्र शेठ थोरवे यांची कर्जत तहसील कार्यालयात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी बैठक “…..

पाणीपुरवठा - पीक नुकसान आणि चारा नियोजनावर भर द्या !

१००% रिझल्ट पाहिजे, कारणं ऐकणार नाही , आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांचे अधिकाऱ्यांना सक्त आदेश……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत तालुक्यातील ” पाणी टंचाईवर ” मात करण्यासाठी ” आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांनी नियोजनपूर्व पाऊल उचलले असून ” निवारण – उपाययोजना – अंमलबजावणी , यांची १०० टक्के रिझल्ट पाहिजे , असे सक्त आदेश तालुक्यातील अधिकारी वर्गाला देत पीक नुकसान आणि चारा नियोजनावर भर द्या , अशी सूचना देखील त्यांनी केली आहे. जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांची प्रगती आणि कमी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी कर्जत तहसील कार्यालयातील आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक बुधवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी संपन्न झाली. या बैठकीत पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती, जलसंधारणाची कामे, पीक नुकसानीचे पंचनामे आणि पशुधनासाठी चारा उपलब्धतेच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली.

          कर्जत तालुक्यात जलजीवन मिशनअंतर्गत एकूण १२३ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी ७८ योजना एनजेएस (NJS) आणि ४५ योजना नाबार्ड (NABARD) यांच्यामार्फत राबविण्यात येत आहेत. या योजनांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून ग्रामीण भागात नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. तालुक्यातील भूगर्भातील पाणीपातळी खालावत असल्याने लोकसहभागातून वनराई बंधारे उभारणे, अपूर्ण बंधाऱ्यांची कामे तातडीने पूर्ण करणे, गाळ काढणे आणि जलसंधारणाच्या माध्यमातून पाणीसाठा वाढविण्यावर भर देण्यात आला. तालुक्यातील ३० बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली असून, १२ बंधाऱ्यांची कामे अपूर्ण आहेत. या बंधाऱ्यांचा किती गावांना लाभ होणार आहे, याची माहिती संकलित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

          या बैठकीत आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अपुऱ्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे निदर्शनास आणून दिले. पावसाचे प्रमाण आणि नुकसानीचे योग्य मूल्यांकन करून बाधित क्षेत्रांचे तातडीने पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली. आगामी काळात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन, ज्या गावांमध्ये पाण्याचे स्रोत उपलब्ध नाहीत किंवा पाणी पुरवठ्याच्या पुरेशा सुविधा नाहीत, तेथे पर्यायी व्यवस्था करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. केवळ जलजीवन मिशनच्या योजनांपुरते मर्यादित न राहता गावांच्या प्रत्यक्ष गरजेनुसार जलसाठे निर्माण करणे आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

           तर पशुधनासाठी चारा उपलब्धतेचा प्रश्नही बैठकीत महत्त्वाचा ठरला. मका बियाण्यांची उपलब्धता, चारा उत्पादन वाढविण्यासाठी उपाययोजना आणि आगामी टंचाईच्या काळात जनावरांना चारा उपलब्ध होईल, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सध्याच्या परिस्थितीत राजकीय मतभेद बाजूला ठेवून लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि प्रशासनाने समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. पाणीटंचाई, शेतीचे नुकसान आणि पशुधनासाठी चारा या प्रश्नांवर केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा , अशा स्पष्ट सूचना आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी दिल्या आहेत.

          यासोबतच भीषण पाणीटंचाईला तोंड देताना उपयोजना करत असताना गरज लागेल तिथे निधी मंजूर करून देऊ, शासनाकडून काही कारणास्तव मदत होत नसेल तर CSR मधून निधी उपलब्ध करून देऊ. प्रत्येक १० दिवसांनी तहसीलदारानी आढावा बैठक घेत कामाचा आढावा घेतला पाहिजे , अशा सूचना त्यांनी दिल्या. सर्वांनी एकत्र येत काम केलं पाहिजे, फक्त कागदोपत्री कारवाई नको तर प्रॅक्टिकली रिझल्ट दिसला पाहिजे, संपूर्ण यंत्रणा कामाला लाऊन या टंचाईवर मात करण्यासाठी काम करावं , असे आदेशच आमदार महेंद्र थोरवे यांनी सबंधित यंत्रणांना दिले आहेत.

        कर्जत तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीसाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी व तालुक्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!