……” भिसेगाव प्रभागात ऐन नवरात्री उत्सवात पाणी टंचाई “…..
" ५७ करोडची " पाणी योजना अजूनही गुलदस्त्यातच !

” टँकरने ” पाणी मागवावे लागते , नागरिकांचा नगर परिषदेच्या ” ढोबळ कारभारावर ” संताप……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव प्रभागातील स्टँड कडे जाणाऱ्या परिसरात ऐन नवरात्री उत्सवात पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याने , येथील नागरिकांचा कर्जत नगर परिषदेच्या ” ढोबळ कारभारावर ” संताप व्यक्त होत आहे. त्यातच नव्याने काम सुरू असलेल्या ५७ करोडच्या पाणी योजनेची मुदत संपून आज १ वर्षाचा कालावधी संपून देखील कासव गतीने सुरू असलेल्या या कामांमुळे हि पाणी योजना अजूनही ” पाईप लाईन ” मध्येच अडकून पडली असल्याने सत्ताधारी ” परिवर्तन विकास आघाडीचे ” या योजनेवर अंकुश आहे की नाही ? असा संतप्त सवाल कर्जतकर उपस्थित करत आहेत.
सध्या नवरात्रोत्सव सर्वत्र साजरा होत आहे. येणाऱ्या ६ नोव्हेंबर पासून दीपावली सण सुरू होणार असल्याने या ऑक्टोबर हिट मध्येच भिसेगाव प्रभागात पाणी टंचाई सुरू झाली आहे. कर्जत नगर परिषदेची पाणी यंत्रणा ” अंकुशहीन ” असल्याने कधी पाणी येते , कधी जाते , ? याचे कुणालाच सोयर सुतक नाही. जुन्या एस टी स्टँड परिसरात रात्रीच ३ वाजता पाणी सोडले जाते , हा काय पाणी सोडण्याचा व नागरिकांनी पाणी भरण्याची वेळ आहे का ? असा संतप्त सवाल येथील नागरिक विचारत आहेत.
भिसेगाव प्रभागात मोठ्या प्रमाणात इमारती होत असल्याने लोकवस्ती वाढत चालली आहे. तेथील अरिहंत अलोकी ४०० ब्लॉक व राधा गॅलेक्सि येथे ४०० ब्लॉक सारखे मोठे टॉवर असल्याने येथे पाणी टंचाई ” बारा महिने ” सुरू असते. येथील नागरिकांना कायमस्वरूपी टँकर मागवावे लागत असल्याने अनेक वेळा कर्जत नगर परिषदेवर ” हंडा मोर्चा ” देखील त्यांनी काढला होता , व पालिकेची लक्तरे वेशीवर टांगली होती , मात्र तरीही पालिकेची पाणी यंत्रणा सुधारली नसून अद्यापि ” सुस्तच ” दिसत आहे. गढूळ व असुरक्षित पाणी हे तर ” पाचवीलाच पुजले ” असल्याने असे पाणी आरोग्यास घातक आहे.
या ५७ करोड पाणी योजनेत भिसेगाव प्रभागात ” पाणी साठवण टाकी ” न बांधता ती गुंडगे प्रभागात बांधत असल्याने आता तेथून उलटे या प्रभागात पाणी कसे यायचे ? भिसेगाव ठिकाणी हि पाणी साठवण टाकी बांधायची सोडून गुंडगे – संत रोहिदास नगर वर असलेल्या परिसरात ती बांधली जात असल्याने हा ” जावई शोध ” कुणी लावला ? अश्या संतापजनक चर्चेचा सूर देखील येथे उमटत आहे.
तरी नागरिकांची पाण्या अभावी गैरसोय होऊ नये , म्हणून नियमित , वेळेवर , मुबलक व स्वच्छ पाणी द्या , अशी जोरदार मागणी भिसेगाव प्रभागातील नागरिक करीत आहेत. तरी सत्ताधारी परिवर्तन विकास आघाडीने व मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे , अशी संतप्त मागणी जोर धरू लागली आहे.




