….. ” कर्जतमध्ये भिसेगाव येथे ” फातिमा मातेची ” ९१ ” वी तीर्थयात्रा १८ ऑक्टोबर रविवारी होणार साजरी “…..

सर्व धर्म समभावाचे प्रतिक फातिमा माता !
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
सालाबादप्रमाणे या वर्षीही ” फातिमा मातेची ” ९१ ” वी तीर्थयात्रा रविवार दि . १८ ऑक्टोबर २०२६ रोजी येत आहे . या फातिमा मातेच्या तिर्थयात्रेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन तर मुंबई – उपनगरे , नाशिक , पुणे , ठाणे , वसई , विरार , भाईंदर , कल्याण , तसेच कर्जत तालुक्याच्या परिसरातून भाविक मातेच्या दर्शनाला उपस्थित रहातात . आज मनुष्य शांतीसाठी धडपडत आहे . जगामध्ये अशांततेचे वारे वहात आहेत . अनेक आजार डोके वर काढत आहेत , अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत . अशा पार्श्वभूमीत ” फातिमा मातेचा ” १०० वर्षांपूर्वी दिलेला ” त्याग – प्रायश्चित्त – व शांतीचा ” संदेश आज उपयुक्त ठरत आहे .
१३ मे १९१७ ह्या मंगल दिवशी पोर्तुगाल मधील फातिमा या खेडेगावात तीन मेंढपाळ मुलांना येशू देवपुत्राची माता , निष्कलंक कुमारी मारिया मातेचे दर्शन घडले . ल्युसिया , जसीता , व फ्रान्सिको अशी मेंढपाळ मुलांची नावे, ह्या मुलांना शुभ्र वस्त्रे परिधान केलेली ओक वृक्षावर तरंगत असलेली चमकदार ढगांवर आरूढ झालेली ” मारिया मातेने ” दर्शन दिले . तिच्या उजव्या हातात पांढऱ्या मण्यांची रोझरी होती . त्या तीन मुलांना ती म्हणाली , मुलांनो तुम्ही घाबरू नका , मी स्वर्गातून खाली आलेली आहे , प्रत्येक महिन्याच्या १३ तारखेला तुम्ही याच ठिकाणी मला भेटायचे , ऑक्टोबर महिन्यात मी कोण आहे ते सांगेन , १३ ऑक्टोबर १९१७ ह्या दिवशी पवित्र मारियेने फातिमा या गावी मुलांना दर्शन देऊन सांगितले की , मी ” रोझरी माता ” आहे .विश्वासू व श्रद्धावान लोकांनी त्यांचे जीवन श्रद्धावान बनवावे , अगोदरच सर्वांनी पापे करून परमेश्वराला दुखावले आहे . अजून वाईट कृत्यांची त्यात भर घालू नये . म्हणून नियमित रोझरीची प्रार्थना करावी , असा संदेश मातेने दिला .
या मातेचा महिमा सर्वदूर पसरला . दमण प्रांतातील तत्कालीन पोर्तुगीजांवर कर्जतच्या ख्रिस्ती मिशन कार्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती . त्यांनी कर्जतचा विभाग ” फातिमा मातेला ” समर्पित केला . सन १९२० मध्ये पोर्तुगाल मधून फातिमा मातेची सुबक व आकर्षक लाकडी मूर्ती कर्जत येथे आणण्यात आली , व १९३५ साली कर्जतच्या स्टेशन शेजारी मातेचे चर्च बांधण्यात आले . तेथे फातिमा मातेला स्थानापन्न व प्रतिष्ठापना करण्यात आली . म्हणूनच दरवर्षी १३ ऑक्टोबर नंतर येणाऱ्या ” रविवारी फातिमा मातेची तीर्थयात्रा ” येथे भरते . संपुर्ण दिवसभर मातेची सकाळी ७.०० वाजले पासून स्तुती , आराधना , मिस्सा , प्रार्थना , अर्चना , भजन , कीर्तन , व सकाळी ११.०० वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते . तसेच सहभोजन व प्रसादाची व्यवस्था करण्यात येते . दरवर्षी फातिमा मातेची तीर्थयात्रा मोठ्या उत्साहात साजरी होते त्यामुळे भाविकांत आनंद पसरला आहे . या फातिमा माता चर्चचे फादर येथे राहून फातिमा मातेची मनोभावे सेवा करत आहेत .तर फादर ऑलविन – डॉन बास्को , वेणगाव हे येथे प्रवचन करत असतात .
फातिमा मातेचे दर्शन घेण्यास येण्याचे विल्सन पानपाटील , पॉल फ्रान्सिस , व्हिक्टर अंकल , सिल्व्हेस्टर फ्रान्सिस , नेल्सन फ्रान्सिस , तम्मा आंती , सैरिओ , येशूदास , ऐग्निस , जेनिफर फ्रान्सिस , साधना पानपाटील , सिलोमीना , रिटा , संगीता भोईर , ऍड.डिमेलो , आदींनी भक्तिभावाने आमंत्रण केले आहे .




