……” गुंडगे – कर्जत येथील जागृत , स्वयंभू श्री सोमजाई माता “…….
मंदिरात " नवरात्र उत्सवाचे " जोरदार आयोजन !

दर्शन घेण्यासाठी ” भाविकांची ” गर्दी…….
भिसेगाव – कर्जत/ सुभाष सोनावणे-
कर्जत नगर परिषद हद्दीतील गुंडगे प्रभागातील ” जागृत – स्वयंभू ” देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेली ” श्री सोमजाई मातेच्या ” मंदिरात दर्शनासाठी अनेक भक्त येत असून त्याची ख्याती दिवसेंदिवस वाढत आहे . नवरात्री उत्सवात नऊ दिवस पूजा – अर्चा , आरती असे कार्यक्रम दरवर्षी होत असतात. येथे नवचंडी यज्ञ देखील करण्यात येतो. यावेळी मातेने अग्निरूपात दर्शन दिले , अशी ख्याती असल्याने येथील भक्तांत दर्शनासाठी उत्साह व गर्दी पहाण्यास मिळते.
ही माता स्वयंभू असून या देवीची आख्यायिका अशी आहे की , पूर्वी या ठिकाणी एक साधू येत असत , त्या जागेवर हे साधू ध्यानस्थ बसून तपश्चर्या करत असताना या मातेने त्यांना दृष्टांत दिला होता , तसेच ब्रिटिश काळामध्ये मुंबई – पुण्याचा मध्य असलेले कर्जतमधील गुंडगे परिसरात रेल्वेचे काम चालू असताना रेल्वेच्या कामात असंख्य अडचणी येत होत्या . तेथे काम करणाऱ्या कामगारांना साप व विंचू चावण्याचे प्रकार घडत होते , त्यामुळे कामगार भयभीत होत असत , त्यावेळी कामावर देखरेख करणारे मुकादम भोसले यांनी येथील ग्रामदेवतेस प्रार्थना केली व आमच्याकडून काही चूक घडत असेल तर आम्हाला साक्षात्कार दे , अशी विनवणी केली . तेंव्हा त्याच रात्री मुकादम भोसले यांच्या स्वप्नात येऊन ” श्री सोमजाई मातेने ” दर्शन देऊन सांगितले की , मी ज्या ठिकाणी काम चालू आहे , त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली आहे , मला बाहेर काढून माझ्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा , माझा जिर्णोद्धार करावा . भोसले यांनी लागलीच मातीचा ढिगारा साफ केला असता तेथे देवीची सुंदर मूर्ती आढळून आली , ती मूर्ती बाहेर काढली व तेथे श्री सोमजाई मातेचे छोटेसे मंदिर बांधले . त्या दिवसापासून मातेची मनोभावे पूजाअर्चा , आरती ग्रामस्थ करत आहेत .
प्रत्येक वर्षी चैत्र शुद्ध सप्तमीला श्री सोमजाई मातेचा उत्सव येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो .माता स्वयंभू असल्याने भक्तांच्या पाठीशी व नवसाला पावणारी आहे , अशी ख्याती झाल्याने भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली . त्यामुळे जीर्ण झालेले मंदिर अनेकांनी दान देऊन ग्रामस्थानीं विचार – विनिमय करून सन २००७ साली जीर्णोद्धार करण्यात आला, आज मोठया स्वरूपात मंदिर उभे झाले आहे . नवरात्रो उत्सवात मोठया प्रमाणात भक्त येऊन दर्शन घेतात . येथे केलेल्या ” नवचंडी होम यज्ञात ” मातेने अग्नी कुंडात आपली प्रतिकृती उमटवून सर्व भक्तांना दर्शन देऊन कृतज्ञ केले , त्यामुळे भक्तांमध्ये आनंद पसरला , मातेने आम्हाला दर्शन दिले , आम्ही धन्य झालो , अशी प्रतिक्रिया भक्त व गुंडगे ग्रामस्थ देत आहेत . श्री सोमजाई मातेची पूजा अर्चा ” उत्तर भारतीय ” नागरिक , महिला भगिनी देखील मोठ्या प्रमाणात करतात , येथे पुजारी अरविंद म्हामुनकर व दिनानाथ विश्वासे मनोभावे पूजाअर्चा व मातेची सेवा करतात .
श्री सोमजाई ग्रामस्थ मंडळ – गुंडगे , सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२६ यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही श्री सोमजाई मातेचा शारदीय नवरात्रौत्सव दि. ११/१०/२०२६ ते २०/१०/२०२६ पर्यंत साजरा करण्यात येत आहे. रविवार दि.११/१०/२०२६ देवीचा अभिषेक व घटस्थापना , शनिवार दि. १७/१०/२०२६ राजमाता जिजाऊ महिला मंडळ, गुंडगे आयोजित भोंडल्याचा कार्यक्रम , सोमवार दि.१९/१०/२०२६ दुर्गाष्टमी निमित्त नवचंडी होम व दु. १२ वा. महाप्रसाद , रोज सकाळी ११:०० वा. व सायं. ७:३० वा. देवीची महाआरती , दुपारी २:०० वा. दुर्गामाता महिला मंडळ, गुंडगे यांचे भजन , सायं. ५.३० ते ७.३० सुश्राव्य भजन , रात्री ९:०० वा. दांडिया रास , असे कार्यक्रम ९ दिवस असून हे सर्व नियोजन श्री सोमजाई ग्रामस्थ मंडळ – गुंडगे , श्री नवरात्र उत्सव कमिटी – गुंडगे ,राजमाता जिजाऊ महिला मंडळ – गुंडगे , हे मोठ्या भक्ती भावाने करत आहेत.




