टॉप न्यूज़

…..” पनवेलच्या इतिहासात प्रथमच शासकीय स्तरावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी “…..

सभागृह नेते " ॲड. प्रकाश बिनेदार " यांच्या संकल्पनेला यश !

” जयंती म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्याचा दिवस ” – महापौर नितीन पाटील

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

पनवेल महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ” यांची जयंती शासकीय स्तरावर अत्यंत दिमाखात व उत्साहात साजरी करण्यात आली. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित या भव्य सोहळ्याची संकल्पना सभागृह नेते ॲड . प्रकाश बिनेदार यांनी मांडली होती. त्यांच्या या प्रस्तावाला महापौर नितीन पाटील यांची तत्काळ मान्यता मिळाली, तर आमदार प्रशांत ठाकूर व माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी कार्यक्रमाचे नियोजन तातडीने ,सुंदर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्यानंतर हा ऐतिहासिक उपक्रम साकार झाला.

            कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावरील कलाकारांनी पोवाडे, शाहिरी, गीत आणि नाट्यमय सादरीकरणातून ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ” यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाचे प्रभावी चित्रण केले. त्यांच्या कार्याचा, साहित्याचा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदानाचा, कामगार चळवळीतील सहभागाचा आणि सामाजिक परिवर्तनासाठी केलेल्या संघर्षाचा प्रभावी उलगडा करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान शाहिरी गीतांच्या तालावर उपस्थित अनुयायी आणि रसिकांनी उत्स्फूर्तपणे नृत्य करत जल्लोष केला.

          यावेळी बोलताना महापौर नितीन पाटील म्हणाले, ” जयंती म्हणजे केवळ जन्मदिन साजरा करणे नव्हे, तर त्या महामानवांनी समाजाला दिलेल्या विचारांचा जागर करण्याचा दिवस आहे.” अण्णाभाऊ साठे यांनी अवघ्या दीड दिवसांच्या औपचारिक शिक्षणाच्या बळावर २७ भाषांमध्ये साहित्य निर्माण करून भारताचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले. अशी व्यक्तिमत्त्वे निर्माण होत नसतात, तर नियती त्यांना समाजाच्या कल्याणासाठी घडवत असते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच ही जयंती तहयात दरवर्षी अधिक व्यापक स्वरूपात साजरी केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

          सभागृह नेते ॲड. प्रकाश बिनेदार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ” यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच पनवेल महानगर पालिकेच्या इतिहासात प्रथमच शासकीय स्तरावर त्यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील व आयुक्त तसेच माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या वर्षी प्रथमच आयोजित केलेल्या कार्यक्रमाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचू शकली नाही, याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र, पुढील काळात सर्व महामानवांच्या विचारांचा गौरव करणारे असे प्रेरणादायी कार्यक्रम अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करून पनवेलच्या सांस्कृतिक इतिहासात नवी भर घालण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, कलाकार, अधिकारी, समाजबांधव आणि उपस्थित श्रोत्यांचे त्यांनी आभार मानले.

          यावेळी विविध समाज बांधवांनी आपल्या भावना व्यक्त करताना मातंग समाजाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी सकारात्मक भूमिका बजावत असल्याचे सांगितले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा उल्लेख करत महापौर नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहर योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तसेच अभ्यासू ,सभागृह नेते ॲड. प्रकाश बिनेदार यांनी अनेक वर्षांची समाजाची भावना ओळखून अण्णाभाऊ साठे जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याचा घेतलेला पुढाकार ,समाजाभिमुख कार्य अविस्मरणीय ठरेल अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

           या कार्यक्रमास महापौर नितीन पाटील, सभागृह नेते ॲड. प्रकाश बिनेदार, अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, नगरसेवक मनोज भुजबळ,नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका प्रिती जॉर्ज, उपायुक्त कैलास गावडे तसेच अनेक मान्यवर, अधिकारी, कलाकार आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने महानगरपालिकेच्या वतीने उपस्थित मान्यवर, कलाकार आणि समाजातील ज्येष्ठ व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्व उपस्थितांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!