……” घरफोडी चोरांच्या कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी आवळल्या मुसक्या “……..
कशेळे परिसरातील " फॉर्म हाऊस व नागरिकांना " केलेले हैराण !

दोन चोरट्यांना बेड्या , सहा गुन्ह्यांचा छडा, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यातील कशेळे परिसरात मोठ्या प्रमाणात फॉर्म हाऊस आहेत. याच फार्म हाऊसवर लाखो रुपयांचे किंमती सामान असते. रात्रीच्या वेळी सामसुम झाल्यावर या परिसरातील सुगवे गावातील २ चोर याचा फायदा घेत चोरीवर चोरी करून येथील फार्म हाऊस व नागरिकांना हैराण करून सोडले होते. या सरावलेल्या हातांच्या मुसक्या आवळणे गरजेचे होते. सण उत्सवात अर्धा डझन तक्रारी कर्जत पोलीस ठाण्यात आल्यावर ” कर्जत पोलीस निरीक्षक उमेश पाटील ” यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी याविरोधात कंबर कसली व केलेल्या तपासाच्या आधारावर सुगवे गावातील २ संशयित चोरांना शिताफीने अटक केली.

कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत फार्म हाऊस आणि घरफोडीच्या घटनांमधून इन्व्हर्टर, बॅटरी, टीव्ही, वॉशिंग मशीन, बोअरिंग पंप तसेच लोखंडी पाइप चोरणाऱ्या दोन संशयितांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. सहा वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल करत पोलिसांनी सुमारे दोन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कर्जत पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली.
सप्टेंबर २०२६ मध्ये दाखल झालेल्या कर्जत पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५५, ३५६, ३५७, ३५८, ३६७ आणि ३६८/२०२६ या सहा गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांना यश आले. गोपनीय माहितीच्या आधारे सुगवे येथील तुषार चवळे आणि राहुल पेमारे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी संगनमताने कशेळे परिसरातील विविध फार्म हाऊस, घरांमध्ये तसेच बांधकामासाठी आणून ठेवलेल्या साहित्याची चोरी केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
या चोऱ्यांमध्ये बोअरिंगची मोटर, वॉशिंग मशीन, ३२ इंची टीव्ही, चार बॅटरी, चार इन्व्हर्टर, मोटारसायकल आणि १८ जीआय लोखंडी पाइप यांचा समावेश आहे. कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक मनीषा लटपटे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. कशेळे दूरक्षेत्रातील हवालदार लालासाहेब तोरवे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव तसेच गुन्हे प्रकटीकरण कक्षातील केशव नागरगोजे, समीर भोईर, स्वप्निल येरुनकर, सतीश पाटील, योगेश गर्जे ऋतिक गोऱ्हाणे, आणि घुले यांनी तपासात सहभाग घेतला.

गेली महिनाभर या चोरांनी येथील नागरिकांना व फार्म हाऊस धारकांना हैराण करून सोडले असल्याने या कारवाईमुळे कर्जत परिसरातील फार्म हाऊस आणि घरफोडीच्या सहा गुन्ह्यांचा छडा लागला असून, पुढील तपास कर्जत पोलीस करीत आहेत.




