टॉप न्यूज़

…..” घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे रायगड जिल्हा परिषद नवीन इमारती समोर पुतळा स्मारक उभारण्याची आर पी आय पक्षाची मागणी “……

कर्जत तालुका अध्यक्ष " हिरामण भाई गायकवाड " यांचा पुढाकार !

आमदार महेंद्र शेठ दळवी व जिल्हाधिकारी किशन जावळे  ” यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पक्षाचे निवेदन…….

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

या देशाचा कारभार भारतीय घटनेचे शिल्पकार , महामानव , विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ” संविधानाच्या ” माध्यमातून चालतो. त्यातच रायगड जिल्ह्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक सत्याग्रह , आंदोलने केलेली असल्याने जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे ठिकाण असलेल्या अलिबाग येथे रायगड जिल्हा परिषदेची नव्याने उभारण्यात येणारी इमारत ही जिल्ह्याच्या ” प्रशासकीय व सामाजिक विकासाचे ” महत्त्वाचे केंद्र असल्याने या नव्या इमारती समोर ” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ” यांचे भव्य पुतळा स्मारक उभारण्यात यावे , अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पक्षाच्या जिल्ह्याच्या सर्व तालुका अध्यक्षांच्या वतीने जिल्हाधिकारी किशन जावळे व अलिबागचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांना निवेदन देऊन करण्यात आली.

          डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले असून, सामाजिक समता – स्वातंत्र्य – न्याय – बंधुता आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. माणसाने – माणसाशी – माणसा प्रमाणे वागावे , यासाठी त्यांनी अशी सत्याग्रह व आंदोलने रायगड जिल्ह्यात देखील केली. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीसमोर त्यांचा पुतळा तथा भव्य स्मारक उभारल्यास नागरिकांना त्यांच्या ” विचारांची आणि कार्याची प्रेरणा ” मिळेल.

          तसेच या स्मारक परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधान निर्मितीतील योगदानाची माहिती देणारा सुंदर व सुबक माहिती फलक उभारण्यात यावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना ” संविधान आणि डॉ. आंबेडकर ” यांच्या कार्याची माहिती मिळण्यास मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

            रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनावर पक्षाचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई रघुनाथ गायकवाड, पनवेल महानगरपालिका प्रभारी अध्यक्ष मोहनीष गायकवाड , अलिबाग – मुरुड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सुनील जगन्नाथ सप्रे, अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ ॲड . संजय जाधव, कोकण प्रदेश नेते जयप्रकाश पवार, रिपब्लिकन सेना रायगड जिल्हाध्यक्ष प्रदीप परशुराम ओव्हाळ, विधानसभा पनवेल अध्यक्ष विजय शंकर गायकवाड , ॲड. रघुनाथ कांबळे, शंकर माने, बंडू मुंडे या पदाधिकाऱ्यांच्या सहीचे निवेदन दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!