……” कर्जत नगर परिषदेतील सत्ताधारी परिवर्तन विकास आघाडी व पालिका प्रशासनाचा बेबंदशाही कारभार “……
कर्जत नगरपरिषदेत तीन महिन्यांपासून " सर्वसाधारण सभा " गायब !

लोकशाहीची गळचेपी , विरोधी पक्ष नेते ” ॲड. संकेत दादा भासे ” यांचा आरोप…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत नगरपरिषद हद्दीत नागरिकांच्या अनेक समस्या असताना त्या न सोडविल्याने ” गलथान ” कारभाराचे चित्र सत्ताधारी व पालिका प्रशासन करत असून गेल्या तीन महिन्यांपासून सर्वसाधारण सभा न घेणे हा केवळ प्रशासनातील हलगर्जीपणा नसून, लोकशाही प्रक्रियेला जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रकार आहे. सत्ताधारी परिवर्तन विकास आघाडी आणि प्रशासन नेमकं काय लपवू पाहत आहेत ? असा थेट आरोप विरोधी पक्ष नेते ” ॲड संकेत दादा भासे ” यांनी केला असून , आता कर्जतकर नागरिक देखील पालिकेच्या बेबंदशाही विरोधात संतप्त प्रश्न विचारू लागले आहेत.

सर्वसाधारण सभा हे नगरपरिषदेचे सर्वोच्च व्यासपीठ आहे. याच सभेत शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, विकासकामे, आर्थिक निर्णय, नागरिकांच्या तक्रारी आणि लोकहिताचे अनेक महत्त्वाचे विषय मांडले जातात. मात्र तीन महिन्यांपासून सभा न झाल्याने स्वच्छता , पाणी , आरोग्य , रस्ते , तर इतर नागरिकांचे मूलभूत प्रश्न प्रलंबित आहेत आणि लोकप्रतिनिधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे.
नागरिकांच्या आलेल्या तक्रारी व विरोधी पक्षनेता म्हणून मी या मनमानी कारभाराचा तीव्र ” निषेध ” करतो. लोकप्रतिनिधींना सभागृहा पासून दूर ठेवून बंद दाराआड कारभार चालविण्याची मानसिकता कर्जतकर जनता कधीही स्वीकारणार नाही. लोकशाहीत सत्ता ही जनतेपुढे उत्तरदायी असते , ती मनमानी करण्याचा परवाना नाही , असा थेट आरोप विरोधी पक्ष नेते तथा शिवसेनेचे नगरसेवक ॲड संकेत दादा भासे यांनी सत्ताधारी व पालिका प्रशासनावर केला आहे .
कर्जत नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी तात्काळ सर्वसाधारण सभा बोलवून प्रलंबित विषयांवर चर्चा करावी. अन्यथा विरोधी पक्ष जनतेला सोबत घेऊन सत्ताधारी ” परिवर्तन विकास आघाडी व पालिकेच्या ” या बेबंदशाही विरोधात तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन उभारेल आणि या निष्क्रिय व मनमानी कारभाराचा जाब प्रत्येक स्तरावर विचारेल. जनतेच्या हक्कासाठी कोणतीही लढाई लढण्यास आम्ही मागे हटणार नाही , असा संतप्त इशारा ॲड. संकेत दादा भासे यांनी दिला आहे .
कर्जतकर नागरिकांच्या अनेक समस्यांवर – प्रश्नांवर पडदा टाकण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. लोकशाही वाचवण्यासाठी आणि जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील , असे संतप्त मत विरोधी पक्ष नेते ॲड. संकेत दादा भासे यांनी व्यक्त केले आहे.




