…..” क्रिकेट क्षेत्रातील अव्वल अष्टपैलू खेळाडू कर्जतचे डॉ. विनय सांगळे “……
मलेशियात क्रिकेट क्षेत्रात कर्जतचा झेंडा फडकवत " डॉ. विनय सांगळे " यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुवर्ण कामगिरी !

मलेशियातील हॉस्पेक्स मेडिकल क्रिकेट स्पर्धेत मुंबईला विजेतेपद…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत नगर परिषद हद्दीतील म्हाडा कॉलनी कर्जत येथील सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन ” डॉ. विनय सांगळे ” यांनी मलेशिया येथे नुकत्याच पार पडलेल्या ” हॉस्पेक्स आंतरराष्ट्रीय मेडिकल क्रिकेट स्पर्धेत ” मुंबईच्या मेडस्केप स्पार्टन्स युनायटेड संघाचे प्रतिनिधित्व करत शानदार कामगिरीच्या जोरावर विजेतेपद पटकावले आहे. त्यांच्या या ” अष्टपैलू ” खेळामुळे उल्लेखनीय यश मिळाले असून कर्जतच्या शिरपेचात आणखी एक मानाचा ” विजयी तुरा ” रोवला गेला आहे . त्यामुळे सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत कतार, बांगलादेश, मलेशिया तसेच भारतातील मुंबई, दिल्ली, केरळ आणि गोवा येथील नामांकित मेडिकल क्रिकेट संघांनी सहभाग नोंदविला होता. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात मेडस्केप स्पार्टन्स युनायटेड संघाने गोवा संघाचा पराभव करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या विजयात डॉ. सांगळे यांचे योगदान मोलाचे ठरले.

गेली १८ वर्षे कर्जतमधील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून रुग्णांची निस्वार्थपणे सेवा करणारे डॉ. विनय सांगळे यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायाबरोबरच क्रिकेटची आवडही सातत्याने जोपासली आहे. टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेट या दोन्ही प्रकारांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

डॉ. सांगळे यांनी यापूर्वी दुबई, श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धांबरोबरच पाँडिचेरी, बेंगळुरू, विशाखापट्टणम, चेन्नई, गोवा, पुणे, मुंबई, कोल्हापूर, संभाजीनगर, हैदराबाद आणि नाशिक येथे झालेल्या अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आपल्या संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

डॉ. विनय सांगळे यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे त्यांनी तब्बल सहा वेळा ” बेस्ट बॉलर ” (सर्वोत्तम गोलंदाज) हा राष्ट्रीय किताब पटकावला आहे. उदयपूर, बेंगळुरू, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि नवी मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी हा मान मिळवला असून, ही कामगिरी करणारे ते मेडिकल क्रिकेटमधील मोजक्या आणि अव्वल गोलंदाजांपैकी एक मानले जातात.

” डावखुरा जादुई फिरकी गोलंदाज ” अशी ओळख असलेल्या डॉ. सांगळे यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मेडिकल क्रिकेट स्पर्धांमध्ये आतापर्यंत ” ५६० ” हून अधिक विकेट्स घेत फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकविण्याचा उल्लेखनीय पराक्रम केला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी गोलंदाजीमुळे ते मेडिकल क्रिकेट क्षेत्रातील एक विश्वासार्ह आणि धडाकेबाज खेळाडू म्हणून ओळखले जातात.

वैद्यकीय क्षेत्रातील जबाबदारी सांभाळत क्रिकेटसारख्या स्पर्धात्मक खेळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणाऱ्या ” अष्टपैलू खेळाडू डॉ. विनय सांगळे ” यांनी कर्जतचे नाव देश-विदेशात उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल वैद्यकीय क्षेत्र, क्रीडाविश्व तसेच कर्जत तालुक्यातील सर्व क्षेत्रातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .




