दिल्ली NCR

……” संपूर्ण महाराष्ट्रासाठी – एक दिवस – एक वाहन – एक टोल आकारावा , राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा रेश्मा कांबळे यांचा एल्गार “……

राज्यात चाललेली " लुटमारी " थांबवा !

” राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ” पक्षाच्या वतीने खालापूर तहसीलदार यांना दिले निवेदन…….

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

सध्या राज्यात सर्वत्र आलबेल सुरू आहे. दळणवळण हा शेती विषयक , व्यापारी व इतर क्षेत्राचा मूळ कणा असताना नागरिकांना जाईल तिथे ” टोल ” रुपी लुटमारी सुरू असून यासाठी ” एक दिवस – एक वाहन – एक टोल ” हि संकल्पना संपूर्ण राज्यात राबवावी , असा एल्गार ” रेश्मा चिमन कांबळे ” – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा महिला अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग यांनी खालापूर तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केला आहे. सदरचे निवेदन राज्याचे मान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोहोचवा , अशी मागणी यावेळी करण्यात आली.

        महाराष्ट्र राज्यात फिरतांना एक चारचाकी वाहनाला एक टोल करावा. एक टोल भरलेल्या पावतीवर सदर चारचाकी वाहनास राज्यात सर्वत्र ” मुक्त संचार ” करता आला पाहीजे. देशातील व महाराष्ट्र राज्यातील जवळपास सर्वच रस्ते खराब झाले असून, पावसाळ्यात रस्त्याची चाळण झाली आहे. याचा परिणाम वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. ट्रॅफिक जाम मध्ये कित्येक तास वाहने अडकून पडतात. तयार केलेले रस्ते टोल कंपनी मार्फत अतिशय ” निकृष्ठ दर्जाचे ” करण्यात येत आहेत . कोणता रस्ता कधी खचेल किंवा कुठला उड्डाणपूल कधी पडेल , याची वाहन धारकांचे मनात सतत भिती असते. रस्त्यावर सर्वत्र मोठ मोठे जीवघेणे ” खड्डे ” पङले असल्याने त्याचे ” मेन्टेनन्स ” टोल कंपनी कडून करण्यात येत नाही. रस्ते देखभाल अभावी नागरिकांची वाहने देखील खराब होऊन त्याचे देखभालीचा खर्चही मोठ्या प्रमाणात येतो. इंधनाचे दर वाढले आहेत , रस्ते खराब असल्याने वाहन योग्य एव्हरेज देत नाही. यामुळे वाहनाच्या खर्चाचा बोजा मोठ्या प्रमाणात वाहन धारक याना सोसावा लागत आहे. शेतीची नापीकी, सततचा दुष्काळ, वाढलेली प्रचंड महागाई यामुळे शेतकरी व वाहन धारक हे प्रचंड ” आर्थिक अडचणीत ” सापडलेले आहेत. याबाबत ” मायबाप सरकार ” बेफिकीर झालेले आहे.

         शैक्षणिक, वैद्यकीय, कृषी उत्पादन व इतर कृषी कामानिमित्त मोठ्या शहरात जाण्यास प्रत्येक ठिकाणी वाहनधारकांना टोल भरावा लागतो. एक प्रकारे टोल द्वारे सर्वसाधारण नागरिकांवर टोल प्लाझा द्वारे लुटमारी करून ” दरोङाच ” टाकला जात आहे. चारचाकी वाहन खरेदी करतांना ” वन टाईम ” रोङ टॅक्स वसूल केला जातो. मोठ्या प्रमाणात वाहनावर जी एस टी भरला जातो. वाहन नोंदणी व इतर मोठे खर्च छुप्या पद्धतीने वाहन धारकांकडून घेतले जातात. टोलचे माध्यमातून नागरिकांनी तथा वाहन धारकांनी दिवसातून किती वेळा टोलचे भरमसाठ पैसे भरावे , याचा मायबाप सरकाराने अंतर्मुख होऊन विचार करावा व जनतेची लूट थांबवावी , आणि म्हणूनच वाहन धारक राज्यात फिरतांना एका वाहना करीता ” एका दिवसाला एक टोल ” पावती घेण्यात यावी , असे निवेदनात जिल्हाध्यक्षा रेश्मा कांबळे यांनी व्यथा मांडली आहे. 

         जनतेच्या या गंभीर समस्या बाबतचा आवाज महाराष्ट्र सरकारने ऐकावा व स्वातंत्र्य दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२६ रोजी सदर मागणीची पूर्तता महाराष्ट्र शासनाने त्वरित करावी, या करिता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ” सामाजिक न्याय विभागाच्या महिला जिल्हाध्यक्षा रेश्मा चिमण कांबळे ” यांनी खालापूर तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. या मागणीचा गांभीर्याने विचार करून महाराष्ट्र सरकारने कृती करावी , अशी विनंती , जिल्हाध्यक्षा रेश्मा कांबळे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!