…..” स्वातंत्र्याची ७९ वर्षे रस्ते – वीज – शिक्षण – आरोग्य – स्वच्छता आणि पाण्यासाठी नागरिकांची अद्यापही झुंज सुरूच “…..

भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे –
स्वातंत्र्य मिळवून आज ” ७९ वर्षे ” पूर्ण झाली असली , तरी नागरिकांना आजही मूलभूत गरजांसाठी ” झुंज ” द्यावी लागते. ” रस्ते – वीज – पाणी – शिक्षण – रोजगार – आरोग्य – स्वच्छता ” व इतर ही अनेक सुविधा आजही शहारा बरोबरच ग्रामीण भागाच्या टोकापर्यंत पोहचल्या नसल्याचे दिसून येत असल्याने अद्यापपर्यंत नागरिक ” स्वातंत्र्य ” झाले आहेत की नाहीत, असे खेदजनक चित्र आजही पहाण्यास मिळत आहे.

शासन – प्रशासन कागदोपत्री नवनवीन ” योजना ” जरी आखत असले तरी त्याची कार्यतत्परता कुठेच दिसून येत नाही. कुठे-कुठे लालफितीत या योजना अडकून पडत आहेत, तर कुठे कुठे या योजना प्रत्यक्षात उतरल्या तरी भ्रष्टाचाराने बरबटलेल्या असल्याने ” अधिकारी व ठेकेदारांच्या ” संगनमताने टक्केवारीच्या साखळीमुळे निकृष्ठ दर्जाची कामे सर्वत्र दिसून येत आहेत. याचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.

आजही नागरिकांना आपल्या मूलभूत गरजांसाठी निवेदने अर्ज विनंत्या, तर कामांत झालेला भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी , निकृष्ठ दर्जाची केलेल्या कामांना वाचा फोडण्यासाठी ” मोर्चे – आंदोलने – धरणे – आमरण उपोषण ” , करावी लागत आहेत. तर अनेक अधिकारी ” लाच ” मागत असल्याने त्यांना लाचलुचपत खाते पकडून जेरबंद करतानाचे चित्र सर्वत्र दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या – कामगारांच्या – नागरिकांच्या करातून ” पाच आकडी पगार ” घेणारे ” लोकसेवक अधिकारी ” फक्त ” खुर्ची उबवण्याचे ” काम करताना दिसत असून कुणाचे कुणावर अंकुशहीन परिस्थिती या ७९ वर्षात दिसून येत आहे. यामुळे नागरिकांच्या समस्यांचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जिल्ह्याचा ” जिल्हाधिकारी ” आपली खुर्ची सोडून तालुक्यात आढावा घेण्यास येत नसल्याने सामान्य नागरिकांना तहसीलदार , मुख्याधिकारी , असे इतर स्थानिक अधिकारी न्याय देण्यास असमर्थ ठरत आहेत.

सर्वत्र विजेची चोरी, पाण्याची चोरी, रस्त्यांची देखील चोरी होताना दिसत आहे. धनदांडगे बिल्डर अधिका-यांना हाताशी धरून बिनबोभाट बेकायदेशीर कामे करताना सर्वत्र दिसत आहेत. यासाठी देखील नागरिकांनाच झुंज द्यावी लागत आहे. ज्या परिसरात अशी बेकायदेशीर कामे होतात, त्या परिसरातील लोकप्रतिनिधी यांना जबाबदार ठरवून त्यांनीच पाठपुरावा करून ते बेकायदेशीर कामे तोडण्यासाठी काम करणे, असा कायदा होणे गरजेचे वाटते. निव्वळ प्रशासनाच्या जीवावर राहिल्यास अधिकारी वर्ग सामान्य नागरिकांना ” भीक ” देखील घालत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ” कर्तव्यात कसूर ” करणाऱ्या अश्या अधिका-यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे वाटते.

म्हणूनच स्वातंत्र्याची ७९ वर्षे एकमेकांवर पांघरून घालण्यावर, टक्केवारीत , भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या भ्रष्टाचारी अध्यापनाचा ” एन्ड ” कधी होणार ? याचीच प्रतीक्षा सर्वसामान्य नागरिक करताना दिसत आहेत. या देशाला , आपल्याला , गोर गरीब जनतेला , स्वातंत्र्य किती झुंज देऊन, हुतात्म्यांच्या बलिदानातून , मिळाले आहे , हे सर्वांनी लक्षात ठेवून शासकीय अधिकारी , राज्यकर्ते , नागरिकांनी , आपले प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणी करण्यासाठी डोळ्यावरची पट्टी काढल्यास व अधिकारी वर्गाने जर अन्न व औषध प्रशासनाचे राज्याचे प्रमुख ” तुकाराम मुंडे साहेब ” यांच्या सारखे कर्तबगार व तडफदार काम केल्यास सर्वत्र ” सुजलाम सुफलाम ” चित्र दिसेल, यांत शंकाच नसेल !





