…..” कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये जूनपासून पोषण आहाराचा तुटवडा ? “……
विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित !

दोन दिवसांत पुरवठा सुरळीत करण्याचे शिक्षण विभागाचे आश्वासन…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये जून महिन्यापासून शालेय पोषण आहाराचा पुरवठा झालेला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारापासून वंचित राहावे लागत असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्य व पोषणाशी संबंधित महत्त्वाचा असलेला हा प्रश्न ऐरणीवर आल्याने पालक आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणा बरोबरच आवश्यक पोषण मिळावे, विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा, या उद्देशाने शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. मात्र, जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये जून महिन्यापासून पोषण आहारासाठी लागणारे धान्य व धान्यादी माल उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरम्यान, याबाबत पंचायत समिती कर्जतचे गटशिक्षणाधिकारी अनंत खैरे यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना गटशिक्षणाधिकारी अनंत खैरे यांनी सांगितले की, रायगड जिल्हा परिषदेचे माननीय शिक्षणाधिकारी यांनी संबंधित पुरवठादाराला पोषण आहाराचा पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांत शालेय पोषण आहाराचा पुरवठा सुरळीत सुरू होणार आहे. पोषण आहाराचा करारनामा झालेला असून, शाळांमध्ये धान्य व धान्यादी माल टाकण्यास दोन दिवसांत सुरुवात होणार आहे. त्यामुळे सध्या निर्माण झालेली अडचण लवकरच दूर होण्याची शक्यता आहे.
शालेय पोषण आहाराचा नियमित पुरवठा हा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शैक्षणिक व्यवस्थेतील महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे पुरवठा केवळ सुरू होण्यापुरता मर्यादित न राहता भविष्यात कोणत्याही कारणामुळे तो खंडित होऊ नये, यासाठी प्रशासनाने प्रभावी नियोजन करावे, अशी अपेक्षा पालक व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार येत्या दोन दिवसांत शाळांमध्ये धान्य व धान्यादी मालाचा पुरवठा प्रत्यक्ष सुरू होतो का ? याकडे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांचे लक्ष लागले आहे.



