……” कर्जत पंचायत समिती येथील महापुरुष व हुतात्म्यांचे दालन सुसज्ज करा , अन्यथा १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण , रमेश दादा कदम यांचा एल्गार “……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती ” शिवाजी महाराज ” यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत तर इंग्रजांच्या विरोधात लढून आपल्याला स्वातंत्र्य मिळावे म्हणून ” प्राणाची ” आहुती देणारे स्वातंत्र्य वीर हुतात्मा हिराजी पाटील व भाई कोतवाल यांचे बलिदान कर्जत तालुक्याचा महान इतिहास आहे . मात्र इथे ” महापुरुषांचे व हुतात्म्यांचे ” नाव घेऊन राजकारण करणारे ” राजकारणी ” व या थोर विभूतींचा इतिहास माहीत नसणारे बेजबाबदार ” शासकीय अधिकाऱ्यांना ” रायगडच्या टकमक टोकावरून कडेलोट केला पाहिजे , असे संतप्त मत पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ” रमेश दादा कदम ” यांनी कर्जत पंचायत समितीच्या महापुरुष व हुतात्म्यांच्या दालनाची बिकट झालेल्या अवस्थेकडे बघून केले आहे .

कर्जत शहरात असलेल्या पंचायत समिती कार्यालयात सभापती व गटविकास अधिकारी यांची दालने सुसज्ज आहेत परंतु दालना बाहेरील श्री.छत्रपती शिवाजी महाराज , हुतात्मा हिराजी पाटील , हुतात्मा भाई कोतवाल यांच्या स्मारकाचे छत खराब व नादुरुस्त झाल्यामुळे राष्ट्रपुरुषांच्या डोक्यावर पाणी टपकत आहे ते दुरुस्ती करण्यासाठी दिनांक २२ मे २०२६ रोजी तहसीलदार कार्यालय समोर पोलीस मित्र संघटनेच्या वतीने रमेश दादा कदम यांनी उपोषण केले होते . त्यावेळी गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी उपोषणाची दखल घेऊन १० लाख रुपयांची तरतूद करून १८ जुलै रोजी आचारसंहिता संपल्यानंतर स्मारकाचे नुतनीकरण करण्यात येईल , असे लेखी आश्वासन दिले , त्यामुळे त्यावेळी उपोषण स्थगित केले होते , मात्र तो अवधी उलटून देखील स्मारकासाठी १० लाख रुपये तरतूद करण्यात आली नाही.

रायगड जिल्हा परिषदेत भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी यांची सत्ता असून भाजपाचा अध्यक्ष असताना राष्ट्रपुरुषांच्या स्मारकासाठी १० लाख रुपये तरतूद करु शकत नाही , हि शरमेची बाब असल्याचे संतप्त मत रमेश दादा कदम यांनी व्यक्त केले आहे . यासाठी त्यांनी २७ जुलै अखेरची तारीख दिली असतानाही अद्याप हि निधी उपलब्ध होऊ शकला नाही , म्हणूनच ज्यांनी इंग्रजाच्या विरोधात बंड करुन कर्जतच्या मातीत ” रक्त ” सांडून स्वताचे बलीदान दिले व आपणास स्वातंत्र्य दिले , हा इतिहास येथील सत्ताधारी राजकीय पक्ष व त्यांचे नेते विसरले असले तरी आम्ही आमचा ” प्राण ” पणाला लावून त्यांच्या दालनाचे सुसज्ज सुशोभीकरण करवून घेऊ , यासाठीच देशाच्या स्वातंत्र्य दिनी ” १५ ऑगस्ट २०२६ ” रोजी प्राणांतिक आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांनी कर्जत तहसीलदार ” धनंजय जाधव व प्रांत अधिकारी संकपाळ ” व गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांना दिले आहे .
छत्रपतींचे व हुतात्म्यांचे मावळे शांत आहेत याचा अर्थ ते गप्प बसले नाहीत ,१५ ऑगस्ट २०२६ पर्यंत स्मारकाचे काम सुरू झाले नाही तर ते रस्त्यावर उतरतील व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असे संतप्त मत पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांनी व्यक्त केले आहे.




