…..” कर्जतच्या राजकारणात मोठी उलथापालथ , माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांची घर वापसी “……
भाजपाला " रामराम " तर पुन्हा राष्ट्रवादीला " सलाम " !

काका माजी आमदार ” सुरेश भाऊ लाड ” यांचीही सोडली साथ ?….कर्जतमध्ये चर्चेला उधाण……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जतच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही . राज्याच्या राजकारणाचा थेट परिणाम या मतदार संघात होत असताना दिसत असतो . ” काका – पुतण्यांचा ” राजकीय खेळ या अगोदरही सर्वांनी राज्यात बघितला असताना कर्जतमध्ये देखील तीच पुनरावृत्ती होताना दिसत आहे . ३ वर्षांपूर्वी नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत खालापूर मतदार संघाचे माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी ” भारतीय जनता पक्षात ” प्रवेश केला होता , त्याचवेळी आपल्या काकांसोबत त्यांचे पुतणे कर्जत नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ” राजेश लाड ” यांनी देखील भाजपात पक्ष प्रवेश केला होता . मात्र भाजप पक्षात नीट सूर जुळला नसल्याने त्यांनी पुन्हा एकदा रोह्यात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून ” घर वापसी ” केली आहे . पण हा निर्णय त्यांचा एकट्याचा की यांत माजी आमदार तथा काका सुरेश भाऊ लाड यांचा काही संबंध आहे ? हे मात्र अजून गुलदस्त्यात बंद आहे . त्यांच्या या ” एकला चलो ” च्या निर्णयाने मात्र कर्जत तालुक्यातील राजकारणात खूप मोठी उलथापालथ होऊन चर्चेला उधाण आले आहे.

सुरेशभाऊ लाड , कर्जत सहित रायगडच्या राजकारणातील ” मात्तबर नेते ” म्हणून बघितले जातात . कर्जत खालापूर मतदार संघात ४५ वर्षे राजकारणात असलेले व तीन वेळा ” आमदार ” म्हणून निवडून आलेले राजकीय क्षेत्रातील ” कोहिनूर हिरा ” आहेत . या ४५ वर्षात अनेक घडामोडी त्यांनी पाहिल्या आहेत . दहिवली सरपंच , कर्जत पंचायत समिती सभापती , कर्जत तालुका राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष , राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष , रायगड जिल्हाध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषविली असताना महाराष्ट्राचे धुरंधर नेते ” सुनील तटकरे ” यांचे मित्र म्हणून त्यांची ख्याती होती , मात्र मागच्या सन २०१९ च्या निवडणुकीपासून या ” मैत्रीत ” फूट पडल्याने कर्जत च्या राजकारणात खूपच बदल होत गेला , खासदार सुनील तटकरे यांनी भाऊंच्या ” डोक्यावरचा हात ” काढून रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांच्या डोक्यावर हात ठेवल्याने या मैत्रीचा ” वणवा ” सर्वत्र पसरला गेला . सन २०१९ सालच्या निवडणुकीत सुनील तटकरे यांनी टाकलेले फासे सुरेशभाऊ लाड यांचा दारुण पराभव झाल्यावर हे कोडे नंतर उलगडल्याने सुरेश भाऊंच्या खूपच जिव्हारी लागला . परंतु दुखावलेल्या भाऊंनी काहीच न बोलता काही दिवस गप्प बसून ” वेट अँड वॉच ” ही भूमिका घेतली . पण राजकारणात मातब्बर असलेले सुरेशभाऊ गप्प कसे बसतील ? आपले राजकीय विरोधक असलेल्यांना दोन हात करायचे असेल तर त्यांना नवीन पर्याय शोधणे गरजेचे होते , म्हणूनच अखेर त्यांनी ” भाजपात ” जाण्याचा निर्णय घेतला होता. आणि कर्जतच्या राजकारणात त्यांनी ते २०२४ च्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांना निवडून आणून दाखवले होते .तर याच निवडणुकीत राजेश लाड यांनी प्रचारात पत्रकार परिषदेत सुनील तटकरे व सुधाकर भाऊ घारे यांच्या विरोधात प्रखर कडवी मते व्यक्त केली होती . यामाध्यमातून रायगडात सुनील तटकरे यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता .

एकेकाळी या मतदार संघात काँग्रेस व नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापना झाल्यापासून भरभराटीस आणणारे सुरेश भाऊंचे बोट धरून राजकीय प्रवास करणारे राजेश लाड आता सुरेश भाऊंचेच एकेकाळी कार्यकर्ते असलेले व आत्ताचे या मतदार संघाचे सर्वेसर्वा तथा जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांच्या आदेशात काम करण्याची आलेली वेळ हि ” अमरत्वाचां पट्टा ओढून कुणी जन्माला येत नाही ” , हे भाऊंचे शब्द माजी नगराध्यक्ष व भाऊंचे ” राजकीय आधारस्तंभ ” राजेश लाड यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीत प्रवेश करून धुळीस मिळवले की काय ? प्रतिस्पर्धी म्हणून भाऊंची असलेली भूमिका आता कशी सिद्ध होणार ? पुतण्याची हि भूमिका सुरेश भाऊंना पटली असेल का ? या प्रश्नाने राजकीय भूकंप करणार की काय ? असेच काहीसे चित्र राजेश लाड यांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेशाने येथे निर्माण झाले आहे . यावर माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांची भूमिका नक्की काय असेल ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे .





