…..” आजच्या कर्जत बंदला अनेक पक्ष , संघटनेचा पाठिंबा “…..
कर्जत बंदला कडकडीत - उत्स्फूर्त प्रतिसाद !

कर्जतमध्ये सर्व पक्षीय ” पदाधिकारी कार्यकर्ते , अनेक संघटना ” रस्त्यावर…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी दिल्ली येथील जन प्रक्षोभात होत असलेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या ” अमानुष लाठीचार्जमुळे ” संपूर्ण राज्यात संतापाचे वातावरण असून याविरोधात ठिकठिकाणी आंदोलन पेटले . गुरुवार दिनांक २३ जुलै २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते ” ॲड. बाळासाहेब आंबेडकर ” यांनी ” महाराष्ट्र बंद ” ची हाक दिली होती . या बंदच्या पार्श्वभूमीवर कर्जतमध्ये पोलीस प्रशासन, व्यापारी फेडरेशन , सामाजिक संघटना , प्रवासी रिक्षा संघटना तसेच कर्जतकर नागरिकांनी कर्जत तालुका बंद ठेवून सहकार्य करावे , अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव ” धर्मेंद्र दादा मोरे ” यांनी सर्वांना केली होती .


याच पार्श्वभूमीवर आजच्या कर्जत तालुका बंदला सर्व व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त पाठिंबा दिल्याने कर्जत कडकडीत बंद पाळण्यात आला . या बंद मध्ये सर्व पक्ष , संघटना , नागरिक यांत उतरल्याचे चित्र दिसले . यामध्ये वंचित बहुजन आघाडी , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) , स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष , आझाद समाज पार्टी , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , राष्ट्रीय काँग्रेस पक्ष , बहुजन समाज पक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष , महाराष्ट्र नवनिर्माण सेना , शेतकरी कामगार पक्ष , भारतीय कम्युनिस्ट पक्ष , पोलीस मित्र संघटना , भारत मुक्ती मोर्चा , संभाजी ब्रिगेड , पत्रकार बांधव , डॉक्टर संघटना , सकल मराठा समाज कर्जत तालुका , कर्जत व्यापारी फेडरेशन , विद्यार्थी संघटना , रिक्षा संघटना , वकील संघटना , कर्जत मुस्लिम समाज , इतर सामाजिक संघटना , भारतीय बौद्ध महासभा , वाल्मिकी समाज संघटना , चर्मकार महासंघ , कर्जत हातगाडी युनियन , आदिवासी संघटना , आदी पक्ष व संघटनेचे पदाधिकारी , कार्यकर्ते , नागरिक , महिला वर्ग , मोठ्या संख्येने सामील होऊन उपस्थित होते .
यावेळी कर्जत नगर परिषद हद्दीत तसेच कर्जत बाजार पेठेतून सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते यांनी रॅली काढून , घोषणाबाजी करत ” भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ” यांच्या स्मारका जवळ जमून सर्वांनी आपले मत व्यक्त करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशाची भावी पिढीचे भवितव्य उध्वस्त करणाऱ्या या सरकारचा भर पावसात संतप्त जाहीर निषेध नोंदवला . यावेळी संपूर्ण कर्जत तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला होता .





