……” टोरेंटच्या पेज नदीवरील धरणांमुळे कर्जत शहर व नेरळ पाणी योजना धोक्यात “……
" धोक्याची घंटा " ओळखून सर्वांनीच सावध होण्याची गरज !

पाण्याच्या भविष्यासाठी जागे व्हा , ॲड कैलास मोरे यांचे आवाहन…….
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
टोरेंट वीज प्रकल्पामुळे आता पाणी वाचवा – कर्जत वाचवा – नेरळ वाचवा अशी ” धोक्याची घंटा ” कर्जत तालुक्यातील नागरिक व शेतकरी बांधवांवर येवून ठेपली आहे. टोरेंट कंपनीच्या प्रस्तावित साईडोंगर-१ आणि साईडोंगर-२ पंप्ड स्टोरेज प्रकल्पांमुळे पेज नदीच्या पाण्याच्या उपलब्धतेवर आणि कर्जत शहर व नेरळच्या पाणी पुरवठ्यावर त्याचा थेट परिणाम असून पाण्याच्या भविष्यासाठी जागे व्हा , असे आवाहन कर्जत तालुका पर्यावरण बचाव संघर्ष समितीचे ” ॲड कैलास मोरे ” यांनी केले आहे.

टोरेंटच्या प्रस्तावित पंप्ड स्टोरेज प्रकल्पामध्ये दोन जलाशयां दरम्यान पाण्याची ने – आण करून वीज निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये साईडोंगर-१ प्रकल्प — 3,000 मेगावॅट असून त्यात प्रस्तावित वरचा जलाशय (Upper Reservoir): 15.87 दशलक्ष घनमीटर (MCM) साठवण क्षमता आहे. प्रस्तावित खालचा जलाशय (Lower Reservoir): 28.96 दशलक्ष घनमीटर (MCM) साठवण क्षमता; हा जलाशय पेज नदीवर प्रस्तावित आहे. वीज निर्मितीच्या वेळी पाणी वरच्या जलाशयातून खालच्या जलाशयाकडे सोडले जाते. त्यानंतर पंपांच्या साहाय्याने पाणी पुन्हा वर नेले जाणार आहे.

साईडोंगर-२ प्रकल्प मध्ये या प्रकल्पाची स्वतंत्र जलाशय रचना, साठवण क्षमता, पाणी घेण्याचा स्रोत, नदीशी असलेला संबंध आणि जलसंतुलन यांची अधिकृत अजुन जाहीर नाही , परंतु याचा परिणाम थेट कर्जतवरचं होणार आहे. जलाशयाची साठवण क्षमता म्हणजे नदीतून दरवर्षी किंवा दररोज तेवढेच पाणी घेतले जाणार, असा अर्थ होत नाही. प्रत्यक्ष परिणाम समजण्यासाठी पाण्याचे एकूण संतुलन आणि नदीतील प्रवाहाचा अभ्यास आवश्यक आहे.
पेज नदीच्या पाण्याचा प्रश्न एवढा महत्त्वाचा का आहे ? तर पेज नदीवरील जलाशयाच्या निर्मितीमुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाचे नियमन कसे केले जाणार, पाणी किती काळ साठवले जाणार आणि नदीच्या खालच्या प्रवाहात किती पाणी उपलब्ध राहणार ? हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत.
जर नदीतील पाण्याची उपलब्धता कमी झाली किंवा पाणी सोडण्याच्या वेळापत्रकात बदल झाला, तर नदीवर अवलंबून असलेल्या जलस्रोतांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. प्रकल्प सुरू होण्यापूर्वी नदीच्या विद्यमान प्रवाहाचा, उन्हाळ्यातील पाण्याच्या उपलब्धतेचा आणि प्रकल्पानंतरच्या संभाव्य परिस्थितीचा आपण विचार करणार आहोत की नाही ? असा प्रश्न निर्माण होतो.
कर्जत शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा देखील तितकाच महत्वाचा असून कर्जत शहरातील नागरिकांना नियमित आणि सुरक्षित पाणीपुरवठा मिळणे ही स्थानिक प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. जर शहराच्या पाणीपुरवठ्याचा स्रोत पेज नदीवर किंवा तिच्याशी संबंधित जलस्रोतांवर अवलंबून आहे, तर पुढील प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजेत.
▪️ कर्जत शहराला दररोज किती पाण्याची गरज आहे ?
▪️ सध्याच्या पाणीपुरवठ्याचा नेमका स्रोत कोणता आहे ?
▪️ उन्हाळ्यात नदीतील पाण्याची उपलब्धता किती असते ?
▪️ प्रस्तावित प्रकल्पामुळे नदीच्या प्रवाहात बदल होणार आहे , त्याचा शहराच्या पाणीपुरवठ्यावर काय परिणाम होऊ शकतो ?
यासाठी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज सुरक्षित ठेवण्यासाठी कोणती पर्यायी व्यवस्था आहे ?
कर्जत बरोबरच नेरळ आणि आसपासच्या गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न हि असून नेरळ परिसरातील नागरिक, शेतकरी आणि ग्रामीण वस्त्यांच्या पाण्याच्या गरजांचाही स्वतंत्र विचार झाला पाहिजे. नेरळ परिसरातील अनेक वस्त्या, गावे किंवा पाणीपुरवठा योजना पेज नदीशी संबंधित जलस्रोतांवर अवलंबून आहेत, नदीच्या खालच्या प्रवाहातील पाणी कमी उपलब्ध झाले, तर संबंधित पाणीपुरवठा योजना, नदीकाठच्या विहिरी किंवा शेतीवर त्याचा परिणाम होणार आहे , हे स्पष्ट दिसत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच संभाव्य धोके ओळखणे अधिक महत्त्वाचे आहे. शेतकरी, शेती आणि भूजलाचा प्रश्न पाणी हा शेतकऱ्यांच्या जीवनाचा आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे. यामुळे शेतकरी उध्वस्त होणार आहे. पेज नदीच्या प्रवाहात बदल झाल्यास नदीवर अवलंबून असलेल्या शेतीला, सिंचन व्यवस्थेला आणि नदीकाठच्या विहिरींना परिणाम होणार आहे. साईडोंगर-१ व साईडोंगर – 2 हया दोन्ही प्रकल्पांच्या एकत्रित परिणामांमुळे स्थानिक जलस्रोतांवर निर्माण होणारे संभाव्य धोके हे दिसून येत असून पाणी सुरक्षित असेल, तरच शेती सुरक्षित राहील. शेती सुरक्षित असेल, तरच शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सुरक्षित राहील.
म्हणूनच प्रशासनाला आणि टोरेंट कंपनीला ॲड.कैलास मोरे यांनी थेट प्रश्न केले आहेत की , १)प्रकल्प सुरू करण्यासाठी सुरुवातीला किती पाणी लागणार आणि त्याची भरपाई कोणत्या स्रोतांतून केली जाणार ? २)बाष्पीभवन आणि पाण्याची झिरपण यामुळे होणाऱ्या पाण्याच्या नुकसानीचा अंदाज किती आहे ?३) कर्जत शहर आणि नेरळच्या पाणीपुरवठ्याचा प्रकल्पाच्या जलनियोजनात विचार करण्यात आला आहे का ? ४) नदीच्या खालच्या प्रवाहात उन्हाळ्यात किती पाणी उपलब्ध राहील ? ५) दोन्ही प्रकल्पांचा एकत्रित जलवैज्ञानिक परिणाम तपासण्यात आला आहे का ? ६) जलसंतुलन अहवाल आणि संबंधित पर्यावरणीय मंजुरीच्या अटी नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार का ? असे थेट सवाल करून साईडोंगर-१ व साईडोंगर-२ या दोन्ही प्रकल्पांच्या एकत्रित जलस्रोत परिणामांचा अहवाल सार्वजनिक करावा , तसेच कर्जत शहर आणि नेरळच्या पाणीपुरवठ्याच्या स्रोतांची अधिकृत माहिती जाहीर करावी , अशी मागणी केली आहे.
यासाठी शेतकरी, स्थानिक स्वराज्य संस्था, जलसंपदा विभाग, पर्यावरणतज्ज्ञ आणि नागरिक यांच्या उपस्थितीत पारदर्शक चर्चा आयोजित करावी. हा केवळ एका प्रकल्पाचा प्रश्न नाही , हा प्रश्न आपल्या घरातील पाण्याचा आहे , हा प्रश्न आपल्या मुलांच्या भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा आहे , हा प्रश्न शेतकऱ्यांच्या शेतीचा, ग्रामीण भागातील जलस्रोतांचा आणि नदीच्या पर्यावरणाचा आहे. असे प्रश्न विचारणे हा आमचा हक्क व अधिकार असून आपल्या पाणीहक्कांचे संरक्षण करण्यासाठी लोकशाही मार्गाने एकत्र येऊन फक्त आश्वासनांवर विश्वास न ठेवता आमच्या पाण्याच्या सुरक्षिततेबाबत ठोस पुरावे आणि जबाबदारी निश्चित करणारी व्यवस्था हवी , अशी संतप्त मागणी करत पेज नदी वाचवा , कर्जत शहराचा पाणीपुरवठा सुरक्षित ठेवा , नेरळ आणि आसपासच्या गावांच्या पाण्याचे संरक्षण करा , आपले पाणी – आपला हक्क आहे , असे आवाहन कर्जत व नेरळ येथील नागरिकांना , तालुक्यातील शेतकरी बांधवांना कर्जत तालुका पर्यावरण बचाव संघर्ष समितीचे सर्वेसर्वा ॲड. कैलास मोरे यांनी केले आहे.




