दिल्ली NCR

…..” मोदींच्या कर्जत दौऱ्यावर निषेधाचे सावट ? टोरेंट प्रकल्पाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक “……

दिवाळी नंतर सर्व प्रकल्पग्रस्तांच्या वतीने " प्रांत कार्यालयावर " क्रोध महामोर्चा !

विकासाच्या नावाखाली ” निसर्गाचा ऱ्हास ” होऊ नये, हीच आमची भूमिका – ॲड. कैलास मोरे……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत तालुक्यातील हजारो एकर जमीन, वनसंपत्ती आणि आदिवासींच्या अस्तित्वावर विविध धरणे व जलविद्युत प्रकल्पांमुळे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी का, असा सवाल उपस्थित करत पर्यावरणप्रेमींनी सरकारच्या धोरणांविरोधात ” एल्गार ” पुकारला आहे. टोरेंट प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ नोव्हेंबर २०१६ रोजी कर्जतमध्ये आल्यास निषेध नोंदवण्याचा इशारा कर्जत तालुका पर्यावरण बचाव समितीने दिला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य कर्जत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पविरोधातील भूमिका ई-मेलद्वारे पीएमओ ना पाठवणार आहेत. अशी भूमिका कर्जतमध्ये पर्यावरण प्रेमी व प्रकल्प बाधित शेतकरी घेणार असल्याचे ठरले आहे.

          दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ नोव्हेंबर रोजी बारामती दौऱ्यानंतर कर्जत तालुक्यातील कोठिंबे परिसरात खासगी दौऱ्यासाठी येणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील ब्रिटिशकालीन आणि अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या रस्त्यांच्या विकासाची कामे शासनस्तरावरून सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मोदींच्या संभाव्य दौऱ्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती आणि सुशोभीकरण होत असल्याची विडंबनात्मक टीका परिसरात केली जात आहे. खासगी कंपनीच्या दौऱ्यासाठी सरकारी यंत्रणा सक्रिय झाली आहे का ? असा सवालही उपस्थित होत आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर साई डोंगर परिसरापर्यंत पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आल्याचे चित्र आहे.

          कर्जत शहरातील शनी मंदिर येथे रविवार, १८ ऑक्टोबर रोजी तालुका पर्यावरण बचाव समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यात पोशीर, शिलार, टोरेंट, टाटा, कोंढाणे आणि पाली-भूतिवली प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. सुमारे ११ हजार एकर क्षेत्र बाधित होण्याची भीती व्यक्त करत जंगलतोड, वन्यजीवांच्या अधिवासाचा नाश आणि आदिवासींच्या विस्थापनाचा प्रश्न यावेळी मांडण्यात आला.

         टाटा प्रकल्पातील खोदकाम आणि ब्लास्टिंगमुळे कातकरी वस्त्यांना धोका निर्माण होत असल्याचा आरोप तानाजी तुरडे यांनी केला. नॅन्सी ताई गायकवाड यांनीही आदिवासी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आंदोलनाला पाठिंबा दिला. सचिन गायकवाड यांनी पाली भूतिवली धरणग्रस्तांना ३० वर्ष यातना सोसाव्या लागत आहे , हे सांगत तालुक्यातील वनविभागाच्या जमिनी मोठ्या प्रमाणात प्रकल्पांमध्ये बाधित होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. पोशिर धोरणाबाबत श्री. तानाजी चव्हाण व सतिश पाटील यांनी सविस्तर मांडणी करुन पोशीर धरण कुठल्याही परिस्थितीत होवुन देणार नाही अशी भुमिका मांडली तसेच यापुढे सर्व प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येवुन लढले पाहीजे , असे मत मांडले.

         शिलार धरणाबाबत सुद्धा अनेक ग्रामस्थांनी शिलार धरण नको , अशी भुमिका मांडली. टोरेंट परिसरातील सुद्धा अनेक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. टोरेंट बाबत श्री. श्रीखंडे यांनी टोरेंटचा सुरू असलेला मनमानी कारभार, दादागिरी याबाबत सविस्तर मांडणी करुन टोरेंट प्रकल्पाला विरोध केला. कोंढाणा धरणाबाबत सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम यांनी हया धरणाचा स्थानिकांना काही फायदा नाही असे मत मांडून 3 तारखेच्या आंदोलनाला पाठींबा दिला. यावेळेस राजेश लाड, प्रविण गांगल, देशमुख, मालू निरगुडा अशा अनेक मान्यवरांनी आपले मत मांडून पुढील प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला जाहीर पाठींबा दिला.

          पेज नदीवरील प्रस्तावित टोरेंट धरणामुळे कर्जत, नेरळ आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली. या प्रकल्पांविरोधात जनजागृती करण्यासह दिवाळीनंतर प्रांत कार्यालयावर सर्व प्रकल्पग्रस्तांचा ” क्रोध महामोर्चा ” काढण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. विकासाच्या नावाखाली निसर्ग, जलस्रोत आणि स्थानिक नागरिकांचे भविष्य धोक्यात घालू नये, अशी मागणी समितीने केली आहे.

          “ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून टोरेंट प्रकल्पाला पाठिंबा देऊ नये आणि या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी कर्जतमध्ये येऊ नये, अशी विनंती करण्यात येणार आहे. या प्रकल्पांमुळे पर्यावरण, वनसंपत्ती, जलस्रोत आणि आदिवासींच्या अस्तित्वावर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे विकासाच् तसेच टोरेंटच्या पेज नदीवरील धरणामुळे कर्जत शहर, नेरळ, अनेक गावांच्या पाणी योजना अडचणीत येऊन कर्जत तालुक्याला प्रचंड पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास होऊ नये, ही आमची भूमिका आहे. पंतप्रधानांचा कर्जत दौरा झाल्यास त्याचा निषेध करण्यात येईल,” असे मत याप्रसंगी ॲड. कैलास मोरे, कर्जत तालुका पर्यावरण बचाव समिती यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!