…..” कर्जत शहरातील समस्या सोडवण्यास कर्जत नगर परिषद हतबल ” …….
" कर्जत बचाव समितीची " पालिका कार्यालयावर धडक , व विचारला जाब !

” ९ महिने होऊनही सत्ताधारी परिवर्तन विकास आघाडीचे ” नियोजनात पिछेहाट…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत नगर परिषदेवर प्रशासकीय सत्ता जाऊन आज ” ९ महिन्यांचा ” कालावधी होऊनही सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांची ” परिवर्तन विकास आघाडीला ” अद्यापि विकास कार्यात सुर गवसला नसल्याने नागरिकांच्या अनेक समस्या सुटलेल्या नाहीत . अंकुशहीन कारभारामुळे अखेर १ महिना उलटून हि काहीच समस्या न सुटल्याने कर्जत बचाव समितीच्या सदस्यांनी पालिका कार्यालयावर धडक देत याचा जाब मुख्याधिकारी ” तानाजी चव्हाण ” व परिवर्तन विकास आघाडीचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ” सुधाकर भाऊ घारे ” यांना आज झालेल्या बैठकीत विचारले. आज बुधवार दिनांक ०९ सप्टेंबर २०२६ रोजी कर्जत बचाव समितीची शहरातील प्रलंबित विविध समस्या वर आढावा बैठक मुख्याधिकारी तानाजी चव्हाण , नगराध्यक्ष सौ पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे , उपनगराध्यक्ष संतोष दादा पाटील तसेच परिवर्तन विकास आघाडीचे समन्वयक व रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुधाकर भाऊ घारे तसेच परिवर्तन विकास आघाडीचे सर्व नगरसेवक यांच्याबरोबर नगरपालिका कार्यालयात दुपारी २.३० वाजता बैठक घेण्यात आली.

यावेळी कर्जत शहर बचाव समितीच्या वतीने समितीचे कार्यवाहक ॲड .कैलास मोरे , रंजन दातार , तसेच पत्रकार रमाकांत जाधव , ज्येष्ठ सदस्य विजय गोखले , विजय बेडेकर , सतीश मुसळे , स्वीटी बार्शी , प्रशांत उगले , अतुल पवार , व अन्य मान्यवर उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीस ॲड .कैलास मोरे यांनी मागील १ महिन्यांपूर्वी बैठकीमध्ये मांडलेल्या प्रश्नांवर नगरपरिषदेमार्फत झालेल्या कारवाईचा आढावा मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्याकडे मागितला. यामध्ये १) शहरातील गंभीर समस्या असलेला ” पाणी प्रश्न ” यावर नगरपरिषद कडून बऱ्यापैकी काम चालू असल्याचे दिसून आले. टाक्यांची साफसफाई झालेली असून जिथे जिथे पाणी कमी प्रेशर ने येते तेथे तेथे उपाययोजना चालू आहेत. मात्र ” एक्सप्रेस फिडर ” च्या बाबतीत बऱ्याच अडचणी दिसून आल्या.
२) ” जंतुनाशक फवारणी ” शहरात कुठल्या भागात कधी केली जाते , याबाबत आरोग्य अधिकारी रायन यांना विचारून समितीने धारेवर धरले तसेच फवारणीचे टाईम टेबल ग्रुप वर टाकून केलेल्या कामाचे फोटो सुद्धा ग्रुप वर टाकावे , असे त्यांना कडक शब्दात सांगण्यात आले. यावर रायन यांनी समितीच्या सूचना मान्य केले असून सर्वतोपरी सहकार्य तसेच फवारणी वेळापत्रक नागरिकांना प्रसिद्ध केले जाईल , असे सांगितले. ३) शहरात बाहेरून येणाऱ्या नागरिकांना ” सार्वजनिक संडास ” उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. याकरिता प्रशासकीय भवन येथे सार्वजनिक संडास चांगल्या प्रतीचे बांधण्यासाठी नगरपरिषदेला सांगण्यात आले. ४) मुख्य बाजारपेठेतील ” हातगाडी समस्या ” यावर मोठी चर्चा झाली. नगरपरिषदेने मान्यता दिलेल्या हातगाड्या या आता खूप कमी असून विनापरवाना हातगाड्या वाढलेल्या दिसून येत आहेत. यावर कर्जत नगरपरिषद कडून कुठलीच कारवाई होत नाही तसेच यामुळे ” ट्रॅफिक समस्या ” खूप प्रमाणात वाढल्याची दिसून आले आहे. काही हातगाड्यांचे मालक हे दिवंगत झाले असून तरी अशा हातगाड्यांचे परवाने चालू आहे. यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी असे समितीच्या वतीने सांगण्यात आले.५) गुंडगे येथील असलेल्या ” डंपिंग ग्राउंड ” बाबत नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी आहेत. यावर समितीच्या वतीने रंजन दातार यांनी आरोग्य अधिकारी रायन यांना डम्पिंग ग्राउंड वरील कचऱ्यावर होत असलेल्या प्रक्रियाबाबत विचारणा केली. सद्यस्थितीत डंपिंग ग्राउंड वरील कचऱ्यावर हवे तसे प्रक्रिया होत नाही असे दिसून आले आहे. ६) नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत आवश्यक असलेल्या ” सीसीटीव्ही कॅमेरे ” बसवण्याबाबत अजून तरी योग्य ती कारवाई नगरपरिषद कडून झालेली नाही , असे निदर्शनास आले , यावर शहरातील बऱ्याच व आवश्यक असलेल्या भागात कमीत कमी कॅमेरे बसवावे असे समितीच्या वतीने सांगण्यात आले. ७) ” भटक्या कुत्र्यांच्या ” बाबतीत नगरपरिषदेने कुत्र्यांच्या निर्बीजीकरण करण्यासाठी सामाजिक संस्थेला ठेका दिला असून त्याच्या माध्यमातून बऱ्याच कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे , असे आरोग्य अधिकारी रायन यांनी सांगितले.

समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद असलेल्या इतर सर्वच समस्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली तसेच आवश्यक उपाययोजना चालू असल्याचे दिसून आले आहे. गणपती उत्सवात शहरात ” नगर परिषदेमार्फत व पोलीस विभागामार्फत ” कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असून , कुठल्याही नागरिकाला या काळात त्रास होणार नाही , यासाठी नगरपरिषद तत्पर राहणार आहे , तसेच उर्वरित समस्या लवकरात लवकर मार्गी लावाल अशी आशा समितीने व्यक्त करण्यात आली.

यावर आता सत्ताधारी ” परिवर्तन विकास आघाडी ” प्रशासनावर कसे अंकुश ठेवते , व काम करून घेते ? तसेच नागरिकांच्या समस्या सोडवून त्यांचा संताप कसा रोकुन धरते ? हे येणाऱ्या दिवसांत समजणारच आहे.




