……” भिसेगाव – गुंडगेकरांना रस्ता देण्यास मुख्याधिकारी तानाजी चव्हाण व कर्जत नगर परिषद अपयशी “……
कर्जत नगर परिषदेच्या बैठकीत भिसेगाव ग्रामस्थ " दिनेश भरकले " संतप्त !

रस्ता नाही तर आमच्याकडून ” टॅक्स ” ही घेऊ नका , ” दिनेश भरकले ” यांचा इशारा……..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत नगर परिषदेत झालेल्या बैठकीत पालिकेचे मुख्याधिकारी ” तानाजी चव्हाण ” यांनी ” भिसेगाव व गुंडगे ” ग्रामस्थांना कर्जत शहरात जाण्यासाठी रस्ता देऊ शकत नाही , या वक्तव्यावर भिसेगाव ग्रामस्थ ” दिनेश भरकले ” संतप्त झाले असून जर आम्हाला रस्ता देऊ शकत नसाल तर आमच्याकडून कुठलाही ” टॅक्स ” घेऊ नका , असे आग्रही संतप्त इशारा देऊन मुख्याधिकारी तानाजी चव्हाण व कर्जत नगर परिषद ” सपशेल अपयशी ” झाल्याचा संतप्त आरोप केला असून , सदरचे विधान हे परिवर्तन विकास आघाडीचे नेते तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ” सुधाकर भाऊ घारे ” व ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ” नितीन दादा सावंत ” यांच्या समोर केल्याने मुख्याधिकारी यांच्या भूमिकेवर भिसेगाव व गुंडगे ग्रामस्थ नागरिक संतप्त झाले आहेत .

काल सोमवार दिनांक ११ ऑगस्ट २०२६ रोजी कर्जत शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांबद्दल व कर्जतच्या नागरी प्रश्नावर ” कर्जत शहर बचाव समिती ” आक्रमक होऊन कर्जत नगर परिषदेवर धडक दिली होती. त्यावेळी भाजपचे पदाधिकारी तथा भिसेगाव ग्रामस्थ ” दिनेश भरकले ” यांनी भिसेगाव – कर्जत रेल्वे भुयारी मार्गाबद्दल जो प्रश्न येथील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा असून गेली ३५ वर्षे प्रलंबित आहे , हा प्रश्न बैठकीत उपस्थित केला असता , तेव्हा क.न.प चे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी आम्ही क.न.प मधुन भिसेगांव, गुंडगे यांना जोडणारा रस्ता क. न. परिषद हद्दीतून देऊ शकत नाही , असे बेजबाबदार पणाचे उत्तर दिल्याने उपस्थितांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. जर आमच्याकडून सर्व टॅक्स घेता तर आम्हाला कर्जत नगर परिषदेकडून पाणी, वीज, रस्ता या गोष्टी देणे बंधनकारक आहेत , ते जर आम्हाला तुम्ही देवू शकत नसाल तर आमच्याकडून कुठलाही ” टॅक्स ” वसुल करू नका , उद्यापासून आम्ही टॅक्स भरत नाही , असा इशारा दिनेश भरकले यांनी दिला .

मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी दिलेल्या बेजबाबदार पणाच्या उत्तरावर माजी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि माजी नगरसेवक उमेश गायकवाड यांनी हा प्रश्न खोडण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा आपण त्याचा पाठपुरावा करू , असे उत्तर दिले. परिवर्तन विकास आघाडीचे नेते ” सुधाकरभाऊ घारे आणि नितीन दादा सावंत ” व कर्जत शहर बचाव समितीचे ॲड. कैलास मोरे यांच्या समोर असे वक्तव्य केल्याने पालिकेच्या या भूमिकेवर सांशकता निर्माण झाली आहे , असेच एकंदरीत चित्र दिसत आहे.

पूर्वी भिसेगाव व गुंडगे ग्रामस्थ यांना कर्जत नगरपरिषद हद्दीत जाण्यासाठी कर्जत रेल्वे फाटक मधुन रस्ता होता. कर्जत चारफाटा पुढे डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रवेश द्वार अशी पालिकेची हद्द संपत असल्याने आम्हाला रस्ता कुठे आहे ? असा संतप्त प्रश्न दिनेश भरकले यांनी मुख्याधिकारी तानाजी चव्हाण व परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्ष सौ पुष्पाताई दगडे यांना विचारला असून नगर परिषदेने आपल्याला रस्ता देणे गरजेचे आहे , असा जाब विचारला आहे . भविष्यात जर हा रस्ता दिला नाही तर टॅक्स दिला जाणार नसल्याने , येथील वातावरण संतप्त झाले असून यावर आता पालिका प्रशासन व सत्ताधारी काय निर्णय घेतात ? , याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.




