…….” हालिवलीतील रस्ते आणि कचऱ्याच्या समस्येने नागरिक त्रस्त “…..

” हालिवली ग्रामपंचायत प्रशासक व कर्जत पंचायत समिती सदस्यांनी ” लक्ष केंद्रित करून समस्या दूर करण्याची मागणी……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत शहराच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या ” हालीवली ग्रामपंचायत ” परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परिसरातील काही रस्त्यांवर मोठमोठे ” खड्डे ” पडले असून, पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना , ज्येष्ठ नागरिकांना, लहान विद्यार्थ्यांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.
हालीवली परिसरातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, कागद, घरगुती कचरा व इतर घनकचरा उघड्यावर टाकण्यात आलेला दिसून येत आहे. कचऱ्याचे ढीग वाढत असल्याने ” परिसरात दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि आरोग्याचा प्रश्न ” निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाच्या पाण्यासोबत कचरा परिसरात पसरत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकी स्वारांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर या वाहतुकीचा परिणाम होत आहे.
या समस्येकडे संबंधित ग्रामपंचायत व प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती, खड्ड्यांची डागडुजी, नियमित कचरा संकलन आणि कचरा टाकण्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. “ स्वच्छ परिसर आणि सुरक्षित रस्ते हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. प्रशासनाने केवळ पाहणी न करता प्रत्यक्ष काम सुरू करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी,” अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. यासाठी हालिवली ग्रामपंचायतीचे प्रशासक व पंचायत समितीच्या सदस्याने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष केंद्रित करावे , अशी जोरदार मागणी नागरिक करत आहेत.



