टॉप न्यूज़

……” मूळ जमीन मालकाला अंधारात ठेवून टोरेंट कंपनीला हस्तांतरित केलेल्या भालीवडी – पुलाचीवाडीतील ३९.१७ हेक्टर जमिनीच्या फेरफाराला हरकत “……

फेरफार क्र. ९५२ रद्द करण्याची तहसीलदार " धनंजय जाधव " यांच्याकडे मागणी !

नागरिकांत ” टोरेंट कंपनी ” विरोधात संतापाचे वातावरण…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत तालुक्यातील भालीवडी / पुलाचीवाडी येथील सर्व नं .१४ गट नं. ९८/१ मधील ३९.१७ हेक्टर जमीन टोरेंट कंपनीला दिल्याच्या नोंदी संदर्भात करण्यात आलेल्या फेरफार क्र. ९५२ विरोधात हरकत अर्ज दाखल करण्यात आला आहे. गावातील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते ” मंगेश सोमा म्हसे ” यांनी कर्जत तहसीलदार ” धनंजय जाधव ” यांच्याकडे हा अर्ज सादर करून सदर फेरफार तात्काळ रद्द अथवा स्थगित करण्याची मागणी केली आहे.

          याबाबतीत दिलेल्या तक्रार हरकतीत सदर जमिनीबाबतचा फेरफार दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी नोंदणीकृत झाल्याचे दि. २२ ऑगस्ट रोजी समजल्याचे म्हसे यांनी नमूद केले आहे. मात्र, या फेरफाराची कोणतीही नोटीस आपल्याला अथवा गावातील ग्रामस्थांना देण्यात आलेली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, PESA कायदा १९९६ नुसार अनुसूचित क्षेत्रातील जमीन हस्तांतरणासाठी ग्रामसभेची पूर्वपरवानगी आवश्यक असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. मात्र, अशा प्रकारची कोणतीही ग्रामसभा घेण्यात आली नसल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. गावात सध्या ” प्रशासक ” असल्याने ग्रामसभेच्या प्रक्रियेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

          याशिवाय, सदर जमीन कातकरी आदिवासी समाजाच्या पारंपरिक वापरातील असल्याचे नमूद करताना, FRA 2006 नुसार हक्क निश्चित न करता जमीन हस्तांतरित करता येत नसल्याचा दावा अर्जदाराने केला आहे. तसेच, जमिनीच्या व्यवहारात तिसऱ्या ” ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याचा ” उल्लेख असून, ही बाब कायद्याचा भंग असल्याचे अर्जात म्हटले आहे.

मंगेश म्हसे यांनी तहसीलदारांकडे फेरफार क्र. ९५२ तात्काळ रद्द अथवा स्थगित करावा, ग्रामसभेचे म्हणणे ऐकून घेण्यात यावे आणि ग्रामसभेचा ठराव होईपर्यंत टोरंट कंपनीला संबंधित जमिनीचा ताबा देऊ नये, अशी स्पष्ट मागणी केली आहे.

         दरम्यान, टोरंट कंपनीसाठी जमीन हस्तांतरणाच्या प्रक्रियेवरून कर्जत तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये आधीपासूनच ” नाराजीचे आणि संतापाचे ” वातावरण असल्याचे चित्र आहे. ग्रामसभेला आणि स्थानिक जमीनधारकांना डावलून व अंधारात ठेवून जमीन हस्तांतरणाचा प्रयत्न झाल्यास तो कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही, असा इशारा या हरकतीतून देण्यात आला आहे. त्यामुळे फेरफार क्र. ९५२ बाबत तहसीलदार धनंजय जाधव व तहसील प्रशासन आता काय भूमिका घेते ? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!