दिल्ली NCR

……” जिल्हा परिषदेचे विजयी उमेदवार ठाकरे सेनेचे , मात्र निशाणी राष्ट्रवादीची , मग हे नक्की उमेदवार कुणाचे , ये चक्कर क्या है ? “…..

" सुधाकर भाऊ घारे " यांच्या भाषणाने कर्जतमध्ये ठाकरे सेनेत अस्वस्थता !

परिवर्तन विकास आघाडी तुटणार का ? उपजिल्हाप्रमुख ” नितीन दादा सावंत ” यांची सावधगिरीची भूमिका…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

राजकारणात कोणी कुणाचा कायमचा ” शत्रू ” नसतो , तसा ” मित्र ” हि नसतो , हे आजपर्यंतच्या राजकीय घडामोडीतून समोर आले आहे , तसेच कधी कुणावर अधिक विश्वास ठेवणे , हे देखील ” घातक ” ठरू शकते , हे कर्जतमध्ये परिवर्तन विकास आघाडीत घडले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत स्थापन झालेल्या परिवर्तन विकास आघाडीतील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ” सुधाकर भाऊ घारे ” व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख ” नितीन दादा सावंत ” यांच्या मध्ये झालेल्या आरोपांच्या ” कलगी तुऱ्या ” मुळे व रॉयल गार्डन येथे भर सभेत सुधाकर भाऊ घारे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे सेनेचे ” सुवर्णा प्रदिप ठाकरे ” या राष्ट्रवादीच्या उमेदवार असल्याचे सांगितल्याने ठाकरे सेनेत अस्वस्थता पसरली असल्याचे चित्र दिसत आहे.

         जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अस्तित्वात आलेल्या परिवर्तन विकास आघाडीतील प्रमुख पक्ष ” राष्ट्रवादी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ” हे राज्यात परस्पर विरोधी पक्ष आहेत. तरीही स्थानिक राजकारणात ते एकत्र आले. आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ” चितपट ” करण्यासाठी हि आघाडी अस्तित्वात जरी आली असली तरी पुढील राजकारण जे घडणार होते , ते कुणालाच माहीत नव्हते , म्हणूनच ” विरोधी पक्षाची ” भूमिका बजावताना कर्जत मतदार संघातील घडामोडी विरोधात उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांना अखेर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांच्यावर ” कडवी टिका ” करावीच लागली.

         ठाकरे सेनेचे कट्टर कार्यकर्ते तथा माजी सभापती असलेले कर्जत रेल्वे पट्ट्यातील वांजळे येथील प्रदिप ठाकरे यांची पत्नी ” सौ. सुवर्णा प्रदिप ठाकरे ” या माणगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद गटातून निवडून आल्या , मात्र त्यांची राष्ट्रवादीचे ” घड्याळ ” हि निशाणी होती , तर कशेळे येथील कट्टर , ठाकरे शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख राजाराम शेळके यांची सून ” सौ. वर्षा सुरेश दोरे ” या देखील जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून आल्या , व त्यांची देखील निशाणी हि राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ हे होते . जर इतर उमेदवार बाबू घारे , सौ. सुनीता रोहिदास मोरे हे ठाकरे सेनेच्या ” मशाल ” चिन्हावर निवडून आलेले असताना मग दोरे व ठाकरे यांनाच का ” घड्याळ ” निशाणी दिली ? एकप्रकारे त्यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळाचाच प्रचार केला ? हा प्रश्न उपस्थित होतो , व याचेच ” भांडाभोड ” सुधाकर भाऊ घारे यांनी भर सभेत बोलून दाखवले की , हे उमेदवार राष्ट्रवादीचेच आहेत. 

          त्यामुळे भविष्यात हे उमेदवार राष्ट्रवादीची ताकद बनणार का ? राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत का ? जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता आहे , त्यात राष्ट्रवादी देखील प्रमुख पक्ष आहे , म्हणूनच हे ठाकरे सेनेचे जिल्हा परिषद उमेदवार त्यांच्या ” गळाला ” लागतील का ? सुधाकर भाऊ घारे भर सभेत असे का म्हटले ? घड्याळ निशाणी वर निवडून आल्याने ते राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत का ? या सर्व प्रश्नांनी ठाकरे शिवसेनेत अस्वस्थता पसरली असून नक्की आता पुढे काय होणार ? याचे उत्तर जरी ” गुलदस्त्यात ” असले , तरी परिवर्तन विकास आघाडीत काहीच ” आलबेल ” नाही , हेच या संपूर्ण घडामोडीवरून दिसून येत आहे. सुधाकर भाऊ घारे यांनी केलेल्या ” कडवट टीकेवर ” आता उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत काय उत्तर देतात ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. मात्र यावर आता ठाकरे सेनेला ” सावधगिरीची भूमिका ” बजवावी लागणार , हे मात्र त्रिवार सत्य आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!