……” कर्जत नगरपरिषद हद्दीत केलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामांचा दर्जा संशयास्पद , ॲड. संकेत भासे संतप्त “……
" निकृष्ट कामांची " तातडीने चौकशी करून " दोषींवर " कारवाई करा !

नागरिकांच्या पैशांची लुटमारी , कोण आहेत ते ठेकेदार ? विरोधी पक्षनेते ” ॲड. संकेत भासे ” यांचा संतप्त सवाल…….
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत नगरपरिषद हद्दीमध्ये पावसाळ्यापूर्वी तसेच पावसाळ्याच्या कालावधीत विविध ठिकाणी रस्ते दुरुस्ती , खड्डे बुजविणे व डांबरीकरणाची कामे करण्यात आली. मात्र , ही कामे पूर्ण झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच अनेक ठिकाणी रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले असून डांबरीकरण उखडणे, खडी बाहेर येणे आणि रस्त्यांची पृष्ठभागाची अवस्था खराब होणे, अशा गंभीर बाबी निदर्शनास येत आहेत. नागरिकांच्या कराच्या पैशातून लाखो रुपये खर्च करून करण्यात येणाऱ्या सार्वजनिक कामांचा दर्जा असा निकृष्ट असेल, तर या कामांवर देखरेख करणारे अधिकारी, संबंधित ठेकेदार आणि कामाची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा नेमकी काय करत होती ? असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते ॲड संकेत भासे यांनी उपस्थित केला आहे.

रस्ते दुरुस्ती व डांबरीकरणाची कामे पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांतच रस्ते खराब होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. यामुळे संबंधित कामांमध्ये आवश्यक तांत्रिक निकष, दर्जेदार साहित्य आणि गुणवत्ता नियंत्रणाची योग्य अंमलबजावणी झाली आहे का ? याबाबत नागरिकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे.
निकृष्ट रस्त्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून दुचाकीस्वारांचे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर कर्जत नगरपरिषद हद्दीतील मागील कालावधीत करण्यात आलेल्या रस्ते दुरुस्ती, खड्डे बुजविणे आणि डांबरीकरणाच्या सर्व कामांची संबंधित तांत्रिक अधिकाऱ्यांमार्फत सखोल व स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक तथा गटनेता ॲड . संकेत जनार्दन भासे यांनी केली आहे.
चौकशी दरम्यान संबंधित कामांचे अंदाजपत्रक, वर्क ऑर्डर, वापरण्यात आलेले साहित्य, कामाची मोजमाप पुस्तिका, बिलांची नोंद, गुणवत्ता तपासणी अहवाल तसेच प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता यांची तपासणी करण्यात यावी. जर चौकशीत कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे स्पष्ट झाले, तर संबंधित ठेकेदार, कामावर देखरेख करणारे अधिकारी अथवा जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करण्यात यावी, तसेच नगरपरिषदेच्या निधीचा अपव्यय झाला असल्यास संबंधितांकडून रक्कम वसूल करण्यात यावी.
नागरिकांच्या पैशांचा अपव्यय खपवून घेतला जाणार नाही. नगर परिषदेचा निधी हा नागरिकांच्या करातून निर्माण होतो. त्यामुळे सार्वजनिक पैशातून होणाऱ्या प्रत्येक कामाचा दर्जा उत्तम असणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. केवळ कागदोपत्री कामे पूर्ण दाखवून प्रत्यक्षात काही दिवसांतच रस्ते खराब होत असतील, तर अशा प्रकाराला कोणत्याही परिस्थितीत पाठबळ देता येणार नाही.“ कर्जतकरांच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता आणि जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे. निकृष्ट कामे करून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा ॲड. संकेत जनार्दन भासे यांनी दिला आहे.
प्रशासनाने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशी सुरू करावी, दोषींवर कारवाई करावी आणि संबंधित रस्त्यांची आवश्यक त्या ठिकाणी पुन्हा दर्जेदार दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित व सुस्थितीत रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात विरोधी पक्षनेते ॲड संकेत दादा भासे यांनी केली आहे. आता यावर मुख्याधिकारी तानाजी चव्हाण काय भूमिका घेतात , याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.




