टॉप न्यूज़

…..” कडाव येथे शिशु मंदिर शाळेची आषाढी एकादशी जल्लोषात साजरी “……

बालगोपाळांची दिंडीत " टाळ - मृदंग, विठूनामाचा गजर " अन् बालवारकऱ्यांचा उत्साह !

चिमुकल्यांचा ” ज्ञानासोबत संस्कारांचा ” संदेश…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

वारकरी संप्रदायात ” आषाढी एकादशीला ” अनन्य साधारण महत्व आहे . ” श्री विठ्ठलाचे ” भक्त पंढरपूरला पायी दिंडी काढून विठोबाच्या दर्शनाची आस घेऊन दरवर्षी जात असतात . याच आषाढी एकादशीचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे यंदाही कर्जत तालुक्यातील कडाव येथे ” शिशु मंदिर ” शाळेच्या वतीने बालगोपाळांची ” पारंपरिक दिंडी ” कडाव परिसरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. विठ्ठलनामाच्या गजरात, टाळ – चिपळ्यांच्या निनादात आणि अभंग – भजनांच्या सुरावटीत परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला.

           शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कुडे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अंजली मंगेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ” शिशु मंदिर कडाव ते बालदिगंबर गणपती मंदिर ” या मार्गावर ही दिंडी काढण्यात आली. दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल – रुक्मिणी आणि वारकरी संप्रदायाचा पारंपरिक वेश परिधान करून हाती वीणा, टाळ आणि भगवे ध्वज घेत ” विठ्ठलनामाचा ” अखंड गजर केला. लहानग्या बालवारकऱ्यांचा उत्साह, शिस्त आणि भक्तिभाव पाहून उपस्थित नागरिकही भारावून गेले.

          दिंडीमध्ये शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका सौ. पुष्पा मोहिते, सौ. अर्चना भोसले, सौ. करुणा तांडेल, सौ. माया गंगावणे, सौ. भाग्यश्री म्हात्रे, सौ. सोनाली पवार, सौ. रूपाली थोरवे, सौ. प्रगती कडव, सौ. पुनम गायकर, सौ. माया अंकुश गंगावणे तसेच शिक्षकेतर कर्मचारी सौ. सुशीला गायकर, सौ. उर्मिला गायकर आणि सौ. मधुरा ठोंबरे यांनी सक्रिय सहभाग घेतला. याशिवाय विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिंडीत सहभागी झाले. यावेळी सर्वांनी मराठी पारंपारिक वेष परिधान करून खेळ खेळून या दिंडीचा आनंद लुटला .

          बालदिगंबर गणपती मंदिर परिसरात विठ्ठल-रुक्मिणीची आरती करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी एकत्रितपणे विठ्ठलनामाचा गजर करत भक्तिमय वातावरण अनुभवले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. आनंद, उत्साह आणि अध्यात्मिक संस्कारांची सांगड घालत हा दिंडी सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

           शिशु मंदिर कडावच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये ” वारकरी परंपरेची ओळख , भारतीय संस्कृतीची जपणूक आणि सामाजिक-धार्मिक मूल्यांचे संवर्धन ” करण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला. उपस्थित पालक आणि ग्रामस्थांनी शाळेच्या या संस्कारमय उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!