……” कर्जतमध्ये NEET पेपरफुटी प्रकरणी व इतर मागण्यांसाठी हजारो विद्यार्थी , पालक व नागरिक संतप्त “……
जबाबदारी स्वीकारून " केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान " यांनी राजीनामा द्यावा !

सर्वांच्या वतीने ” तहसीलदार धनंजय जाधव ” यांच्या मार्फत ” राष्ट्रपतींना ” निवेदन……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची सर्वोच्च स्तरावर निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, शिक्षण व्यवस्था पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त करण्यात यावी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या मागण्यांसाठी कर्जत तालुका विद्यार्थी व पालक मंचाच्या वतीने भारताचे राष्ट्रपती यांना धनंजय जाधव तहसीलदार, कर्जत यांच्या मार्फत आज सोमवार दिनांक २० जुलै २०२६ रोजी प्रशासकीय भवन कर्जत येथे निवेदन सादर करण्यात आले.

संतप्त झालेल्या कर्जत तालुक्यातील विद्यार्थी , पालक , नागरिक आज रस्त्यावर उतरले . NEET परीक्षा पेपरफुटीमुळे देशभरातील लाखो विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून, प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारामुळे शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असून विद्यार्थ्यांमध्ये मानसिक ताण व असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.
यावेळी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शांततापूर्ण आंदोलन करणारे सोनम वांगचुक, अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आंदोलनाला याप्रसंगी नैतिक पाठिंबा व्यक्त करण्यात आला. तसेच आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक यांचे उपोषण प्रशासनाने जबरदस्तीने सोडविल्याच्या घटनेचाही निषेध करण्यात आला. यावेळी NEET पेपरफुटी प्रकरणाची स्वतंत्र व वेळबद्ध चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, भविष्यात पेपरफुटी रोखण्यासाठी पारदर्शक परीक्षा प्रणाली, विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची व्यवस्था, शांततापूर्ण आंदोलनांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण आणि शिक्षण व्यवस्था भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने ठोस धोरण राबवावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या .
सदर निवेदन देणे पुर्वी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, नागरीकांनी मनोगत व्यक्त करून सोनम वांगचुक, अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठींबा देवुन सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. याप्रसंगी सदर निवेदन देताना कर्जतमधील अनेक पक्ष, संघटना, संस्थाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भविष्यात आवश्यकता वाटली तर तीव्र स्वरुपाचे संतप्त आंदोलन छेडण्यात येईल , असा सुद्धा इशारा देणेत आला.
यावेळी कर्जत मधील मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी, वकील, डॉक्टर, इंजिनिअर, पत्रकार तसेच सर्व स्तरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




