दिल्ली NCR

……” कर्जतचे पाणी टोरेंटच्या घशात जाणार “……

पेज नदीवर टोरेंटचे खालचे धरण झाले तर...टोरेंट तुपाशी...कर्जतकर उपाशी !

टोरेंट प्रकल्पा विरोधात कर्जतकरांनी आता ” पाण्याच्या प्रश्नावर ” आवाज उठवण्याची गरज……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

पेजनदीचे २,३०० कोटी लिटर पाणी धरणात भरणार तसेच दिवसाला ८२ लाख लीटर बाष्पीभवनाचे पाणी सुद्धा पेजनदीतुन घेणार , मग कर्जतकरांच्या पाण्याची हमी कोण देणार ? टोरेंट प्रकल्पाविरोधात कर्जतकरांनी आता पाण्याच्या प्रश्नावर आवाज उठवण्याची गरज येवून ठेपली असल्याचे आवाहन कर्जत तालुका पर्यावरण बचाव संघर्ष समितीचे समन्वयक ॲड. कैलास मोरे यांनी केले आहे.

        कर्जत तालुक्यात टोरेंटचा ३,००० मेगावॅट क्षमतेचा पंप्ड स्टोरेज प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी मोठी धरणे, हजारो एकर क्षेत्र आणि प्रचंड पाणी साठ्याची व्यवस्था केली जाणार आहे. मात्र, या सगळ्यात कर्जत शहर, नेरळ आणि परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचे काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

प्रकल्पाच्या कागदपत्रांनुसार, सुरुवातीला धरणे भरण्यासाठी २,३०० कोटी लिटर पाणी लागणार आहे. त्यानंतर बाष्पीभवनामुळे कमी होणाऱ्या पाण्याची भरपाई करण्यासाठी दरवर्षी ३०० कोटी पेक्षा जास्त लिटर पाणी लागणार आहे. हे आकडे छोटे नाहीत. मग एवढे पाणी कुठून येणार ? पेज नदीच्या प्रवाहावर काय परिणाम होणार ? उन्हाळ्यात कर्जतकरांना पुरेसे पाणी मिळणार का ? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत , परंतु ती दिली जात नाहीत.

           टोरेंटच्या प्रकल्पाच्या कागदपत्रांनुसार – 

वरचे धरण: १,५८७ कोटी लिटर.

खालचे धरण: २,८९६ कोटी लिटर.

प्रारंभिक पाणी भरण्याची गरज: २,३०० कोटी लिटर.

दरवर्षी बाष्पीभवनाची भरपाई: ३०० कोटी लिटर.

वीज प्रकल्पाची क्षमता: ३,००० मेगावॅट.

वरच्या आणि खालच्या धरणातील पाणी पुन्हा वापरले जाणार असल्यामुळे दोन्ही धरणांची क्षमता एकत्र करून नवीन पाण्याची गरज मोजता येत नाही. मात्र, सुरुवातीला लागणारे पाणी आणि दरवर्षी भरून काढावे लागणारे ३०० कोटी लीटर पेक्षा जास्त पाणी यांचा हिशेब जनतेसमोर स्पष्ट असला पाहिजे.

          पेज नदीतुन टोरेंट जे २३०० कोटी लीटर व ३०० कोटी बाष्पीभवन होऊन कमी होणा-या पाणी घेणार आहे , हया पाण्याचा कर्जतच्या प्रत्येक नागरिकावर परिणाम होणार आहे. प्रकल्पासाठी सुरुवातीला सुमारे २,३०० कोटी लिटर पाणी आणि बाष्पीभवनामुळे होणारी पाण्याची घट भरून काढण्यासाठी वर्षाला सुमारे ३०० कोटी लिटर पाण्याची गरज असल्याचा उल्लेख संबंधित प्रकल्पाच्या कागदपत्रांमध्ये असल्यास, या पाण्याच्या वापराचा कर्जत शहर आणि ग्रामीण भागावर काय परिणाम होईल, याचा पारदर्शक अभ्यास होणे आवश्यक आहे. ३०० कोटी लिटर म्हणजे दररोज किती पाणी ? वर्षभरातील ३०० कोटी लिटर पाण्याचे ३६५ दिवसांत समान विभाजन केल्यास, वार्षिक पाण्याचे प्रमाण – ३०० कोटी लिटर , दररोजची गणिती सरासरी सुमारे ८२.२ लाख लिटर , हे पाणी किती लोकांच्या गरजेइतके आहे, हे भारत सरकारच्या पाणीपुरवठा निकषांनुसार पाहूया.

          ८२.२ लाख लिटर पाण्यात किती लोकांची गरज भागू शकते ?

१) शहरी भाग — १३५ लिटर प्रति व्यक्ती प्रतिदिन

शहरी भागात, सांडपाणी व्यवस्थेची सुविधा असलेल्या शहरांसाठी वापरला जाणारा १३५ LPCD निकष विचारात घेतल्यास:

८२,२०,००० ÷ १३५ = सुमारे ६०,८८९ व्यक्ती , म्हणजेच हे पाणी शहरी पाणीपुरवठ्याच्या निकषानुसार दररोज सुमारे ६१ हजार लोकांच्या गरजेइतके आहे.

२) ग्रामीण भाग — ५५ लिटर प्रति व्यक्ती प्रतिदिन

जल जीवन मिशनअंतर्गत ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ५५ LPCD हा सेवा-स्तर निकष वापरला जातो.

८२,२०,००० ÷ ५५ = सुमारे १,४९,४५५ व्यक्ती

कर्जत शहर आणि ग्रामीण भागाच्या पाण्याचे काय ?

कर्जत शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पेज नदी किंवा संबंधित जलस्रोतांचा किती वापर होतो, उन्हाळ्यात नदीत किती पाणी उपलब्ध असते आणि प्रस्तावित प्रकल्पासाठी कोणत्या काळात किती पाणी उचलले जाणार आहे, याची अधिकृत आकडेवारी सार्वजनिक होणे गरजेचे आहे.

ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासोबत शेती, पशुधन आणि स्थानिक गरजांसाठीही पाण्याचे वापर होतो. हजारो भुमिपुत्रांनी छोटे मोठे फार्म हाऊस तयार केले आहेत त्यावर परिणाम होणार आहे.

        पेज नदी कोणासाठी ? पेज नदी ही केवळ धरण भरण्यासाठीची जलसंपत्ती नाही. तिच्या पाण्याशी स्थानिक शेती, गावांची पाणी व्यवस्था आणि परिसरातील पर्यावरण जोडलेले आहे.दुष्काळी वर्षात पाणी किती उपलब्ध राहील, नदीचा नैसर्गिक प्रवाह किती कायम ठेवला जाईल आणि कर्जत शहर व नेरळच्या पाणी योजनांना किती पाणी मिळेल, हे स्वतंत्रपणे तपासणे आवश्यक आहे.

         टोरेंटला पाणी मिळेल, पण कर्जतकरांच्या पाण्याची हमी कोण देणार ? ६०० एकर जंगल त्यातील ५ लाख झाडे, हजारो एकर शेतजमिन, आदिवासी, गावठाण, गुरचरण अशी सर्व नैसर्गिक संपत्ती गेली, तर पाण्याचे काय ? प्रकल्पा मध्ये सुमारे ६०० वनजमीन त्यातील ५ लाख झाडे तोडली जाणार. हजारो एकर खाजगी जमीन जंगल पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत करते, मातीची धूप रोखते आणि निसर्गाचे संतुलन टिकवते. एवढ्या मोठ्या क्षेत्रावरील जंगलात बदल झाल्यास स्थानिक जलचक्रावर काय परिणाम होऊ शकतो, याचा अभ्यास जनतेसमोर मांडला पाहिजे.

कर्जतकरांच्या वतीने आमचे ठाम प्रश्न.

१) उन्हाळ्यात आणि दुष्काळात कर्जत शहर व नेरळचा पाणीपुरवठा सुरक्षित राहणार का ?

२) नदीच्या खालील बाजूला किती पाणी वाहते राहणार ?

३) स्थानिक जनतेच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्याची लेखी हमी कोण देणार ?

४) पाणी आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा स्वतंत्र अहवाल जनतेसमोर कधी मांडणार ?

५) प्रकल्पाची ब्लु प्रिंट कधी जाहीर करणार ?

६) पुर व भुकपांची हमी व जबाबदार कोण घेणार ?

७) उन्हाळ्यात कमीत कमी व जास्तीत जास्त किती पाणी खाली कर्जतकरासांठी सोडलं जातं व प्रकल्प झाले नंतर किती त्याचे प्रमाण असेल याचा अभ्यास केला का ?

        आता गप्प बसून चालणार नाही , कर्जतला विकास हवा, रोजगार हवा; पण त्यासाठी कर्जतच्या पाण्याची आणि जंगलाची किंमत मोजावी लागणार असेल, तर त्याचा जाब विचारलाच पाहिजे. आमचा प्रश्न वीज निर्मितीच्या विरोधापुरता मर्यादित नाही. आमचा प्रश्न आहे स्थानिक जनतेच्या हक्कांचा. हजारो कोटी लिटर पाण्याचे नियोजन करणाऱ्या प्रकल्पात कर्जतकरांच्या पिण्याच्या पाण्याला किती महत्त्व दिले जाणार, हे स्पष्ट झालेच पाहिजे. टोरेंटच्या प्रकल्पाचे आकडे जनतेसमोर आहेत; आता कर्जतच्या पाण्याची हमीही जनतेसमोर आली पाहिजे. म्हणूनच पेज नदी वाचवा ! कर्जतचे पाणी वाचवा !! जंगल वाचवा !!! पाणीपुरवठ्यासंदर्भात स्वतंत्र जलवैज्ञानिक व जलसंतुलन अहवाल जाहीर करा , असे आवाहन कैलास मोरे , कर्जत तालुका पर्यावरण बचाव संघर्ष समिती समन्वयक यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!