टॉप न्यूज़

……” श्री. सुनिल हरणाबाई परशुराम चव्हाण यांना राज्यस्तरीय ” जीवन गौरव पुरस्कार ” – २०२६ ने सन्मानित “……

" टिटवाळा " येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न !

” जप जीवाला बहुउद्देशीय संस्था , आधार जनसेवा सामाजिक संस्था व सोनल महिला बहुउद्देशीय संस्था ” यांचा स्तुत्य उपक्रम…… 

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

समाजात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व बहुमूल्य कार्य करणाऱ्या नवरत्नांना नुकतेच राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ” जप जीवाला बहुउद्देशीय संस्था ( निधी आयोग ISO), आधार जनसेवा सामाजिक संस्था (रजिस्टर्ड) व सोनल महिला बहुउद्देशीय संस्था ” यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा व जिल्हास्तरीय कवि संमेलनाचे आयोजन टिटवाळा येथे करण्यात आले होते. याप्रसंगी कर्जत तालुक्यातील बहुजन समाजात सामाजिक – धार्मिक – शैक्षणिक – सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय व उत्तुंग कार्य करणारे ” श्री. सुनिल हरणाबाई परशुराम चव्हाण ” यांना राज्यस्तरीय ” जीवन गौरव पुरस्कार – २०२६ ” देवून त्यांच्या कार्याचा नुकतेच शाल , पुष्पगुच्छ , सन्मानपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.

         कर्जत नगर परिषद हद्दीत गुंडगे रोड , जुने एस टी स्टँड परिसरात रहाणारे सामाजिक कार्यकर्ते सुनील परशुराम चव्हाण हे ” चव्हाण बाबा ” या नावाने ओळखले जातात. गेली ३० ते ३५ वर्षे या परिसरात ते वास्तव्यास आहेत. भारतीय रेल सेवेत ” गार्ड ” म्हणून प्रामाणिक व एकनिष्ठ देशसेवा करून ते सेवानिवृत्त झाले आहेत. नेहमीच इतरांना मदत करण्याचा त्यांचा हातखंडा आहे. गरीब – गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याच्या हेतूने ” दत्तक योजना ” त्यांनी राबवली , त्यामाध्यमातून ते दरवर्षी विद्यार्थ्यांना ते स्वखर्चाने शालेय साहित्य , ड्रेस , व इतर मदत देत असतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत ” छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज , भारतीय घटनेचे शिल्पकार – महामानव – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , स्त्री शिक्षणाचे उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले ” , या महापुरुषांच्या जयंती महोत्सव आपल्या परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करून सरबत वाटप , अन्नदान , शालेय विद्यार्थ्यांसाठी डान्स , गाण्याचे कार्यक्रम करून त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस वाटप करतात. महापुरुषांचे पडद्यावर पिक्चर दाखवून तरुणांमध्ये ” प्रेरणा ” जागृत करतात. 

           विविध संघटनेत श्री सुनील चव्हाण यांचा सहभाग असतो. एस सी एस टी रेल्वे असो. पेन्शनर संघटना , कर्जत तालुका भीम जयंती महोत्सव कमिटी , आपल्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटीचे ते सर्वेसर्वा आहेत. या कमिटीच्या माध्यमातून ते दरवर्षी आषाढी एकादशीला खिचडी वाटप , तथागत ” भगवान गौतम बुद्ध ” जयंतीला खीर वाटप , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबर रोजी परिसरात मेणबत्ती प्रज्वलित करून त्यांना अभिवादन करतात , तर दादर चैत्यभूमी येथून अभिवादन करून रेल्वे प्रवासातून परतणाऱ्या अनुयायांना अन्नदान करतात , असे विविध उपक्रम राबवून ते धार्मिक क्षेत्रात देखील उल्लेखनीय कामगिरी करीत असतात. नेहमीच प्रसिद्धी पासून ते लांब रहातात. महापुरुषांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत , तर आपणही या समाजाचे काही देणे लागतो , या उदात्त भावनेने आपण मदत करत असतो , असे ते नेहमीच म्हणतात. वयाची ७५ वी गाठली असूनही ते पहाटे ५ वाजता उठून ” मॉर्निंग वॉक ” करतात , म्हणूनच ते या परिसरात तरुणांचे ” प्रेरणास्थान ” आहेत. ते प्रत्येकाच्या सुख दुःखाच्या कार्यक्रमात सहभागी होतात. 

        हा जीवन गौरव पुरस्कार सोहळ्या प्रसंगी नामांकित हायकोर्टाचे वकील , व कर्जत तालुक्यातील सामाजिक चळवळीचे प्रणेते ॲड. कैलास मोरे , महा रक्तवीर राजाभाऊ कोठारी सर , विठ्ठल उर्फ माऊली पवार , गणेश कांबळे, आमीर मणियार , लोकेश यादव , संदिप पावसकर , सौ.छाया कुलकर्णी, गोपीशेठ ओसवाल , सौ.संगिता कांबळे , नथुराम कदम आदींसह अनेक मान्यवर या गौरव सोहळ्यास उपस्थित होते.

          ” श्री सुनील परशुराम चव्हाण ” यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आल्याने त्यांच्यावर कर्जत तालुक्यातील राजकीय – सामाजिक – धार्मिक – शैक्षणिक – सांस्कृतिक क्षेत्रातील तसेच बहुजन संघटनेतील अनेक मान्यवरांनी त्यांचे ” अभिनंदन ” केले व पुढील कार्यास ” शुभेच्छा ” व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!