……” राजाभाऊ कोठारी सर राज्यस्तरीय ” रक्तदाता व रक्तदान चळवळ पुरस्कार २०२६ ” ने सन्मानित “…….
" टिटवाळा " येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न !

” जप जीवाला बहुउद्देशीय संस्था , आधार जनसेवा सामाजिक संस्था व सोनल महिला बहुउद्देशीय संस्था ” यांचा स्तुत्य उपक्रम……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
समाजात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व बहुमूल्य कार्य करणाऱ्या नवरत्नांना नुकतेच राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शनिवार दिनांक २६ सप्टेंबर २०२६ रोजी ” जप जीवाला बहुउद्देशीय संस्था ( निधी आयोग ISO), आधार जनसेवा सामाजिक संस्था (रजिस्टर्ड) व सोनल महिला बहुउद्देशीय संस्था ” यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा व जिल्हास्तरीय कवि संमेलनाचे आयोजन टिटवाळा येथे करण्यात आले होते. याप्रसंगी कर्जत तालुक्यातील सार्वजनिक रक्तदाता – रायगड भूषण – महारक्तवीर व रक्तदान शिबिर संयोजक तथा नगरसेवक ” राजाभाऊ कोठारी सर ” यांना रक्तदान क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय ” रक्तदाता व रक्तदान चळवळ पुरस्कार २०२६ ” ने नामांकित वकील ॲड. कैलास मोरे यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.

आजपर्यंत राजाभाऊ कोठारी सर यांनी एकूण ५४७ रक्तदान शिबिरे आयोजित करून एकूण ६८००४ रक्त बाटल्यांचे संकलन केले असून वैयक्तिक ” ११४ ” वेळा रक्तदान केले आहे. आजपर्यंत महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने ” रक्तदान शिबिर संयोजक ” म्हणून एकूण विविध १४ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच सन २०२२ मध्ये रायगड जिल्हा परिषदेचा सर्वोत्तम पुरस्कार ” रायगड भूषण ” या पुरस्काराने रायगड जिल्ह्याच्या तत्कालीन पालकमंत्री मान. आदिती तटकरे याच्या शुभ हस्ते अलिबाग येथे गौरविण्यात आले. सन २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय वैश्य महासंमेलन यांच्या वतीने दिल्ली येथे लदाख चे उपराराज्यपाल महामहिम ” कविंद्रजी गुप्ता ” यांच्या शुभहस्ते ” महारक्तवीर ” या पुरस्काराने गौरविण्यात आले .

तसेच कर्जत मध्ये ” अनंत काका जोशी प्रतिष्ठान ” तर्फे १ लाख रुपयांची थैली देऊन सन्मान करण्यात आला होता , तर अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने आजपर्यंत त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

याप्रसंगी नामांकित हायकोर्टाचे वकील , व सामाजिक चळवळीचे प्रणेते ॲड. कैलास मोरे , विठ्ठल उर्फ माऊली पवार , गणेश कांबळे, आमीर मणियार , लोकेश यादव , संदिप पावसकर , सौ.छाया कुलकर्णी, गोपीशेठ ओसवाल , सौ.संगिता कांबळे नथुराम कदम आदींसह अनेक मान्यवर या गौरव सोहळ्यास उपस्थित होते.





