…..” कर्जतमध्ये गढूळ पाणीपुरवठा “…..

कर्जत नगर परिषदेच्या कारभारावर नागरिकांत संताप !
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत नगर परिषद हद्दीतील जुन्या कचेरी खालच्या मुद्रे प्रभागात नळाला गढूळ पाणी येत आहे. याबद्दल नागरिकांत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. कर्जत नगर परिषदेचे जलशुद्धीकरण केंद्र असून देखील गढूळ पाण्याचे वितरण करण्यात येत असल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कर्जत नगर परिषदेचा कारभार सुरू होऊन आज ९ महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी अजून कामकाजावर परिवर्तन विकास आघाडीची पकड अजून बसली नाही. कचरा , खड्डेयुक्त रस्ते , गढूळ पाणी , वाहतूक कोंडी , अस्ताव्यस्त पार्किंग , तर अशीच अनेक समस्याकामे ” आ ” वासून उभी आहेत. त्यामुळे पालिकेचा कारभार सध्या पूर्णपणे कोलमडला आहे. याबाबत विरोधी पक्ष , सामाजिक संघटना , शिवसेनेचे नगरसेवक , नागरिकांनी गेल्या कित्येक महिन्यांपासून यावर उपाय योजना करण्याचे आवाहन मुख्याधिकारी व सत्ताधारी परिवर्तन विकास आघाडीच्या नगराध्यक्ष यांना केले आहे.
पावसाळ्यातील चार महिने पाण्याचा उपसा होतो त्या पेज नदीत गढूळ पाणी असते. त्यामुळे पालिकेचे ” जलशुद्धीकरण यंत्रणा ” महत्वाची ठरते. जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यक्षम असताना देखील नळाद्वारे येणारे पाणी हे गढूळ येत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या पाण्यासाठी दरवर्षी पाणी शुद्ध करण्यासाठी , व इतर कामांसाठी लाखो रुपये कर्जत नगर परिषद खर्च करते. मात्र तरीही गढूळ पाण्याबरोबरच कर्जतकर नागरिकांना आजारपण ” फ्री ” पालिका प्रशासन देत असेल व त्यावर लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका बजावत असतील तर अश्या ढोबळ कारभारावर सर्वत्र प्रश्नचिन्ह व संताप दिसत आहे.

अशी पाणी गढूळ येण्याची परिस्थिती सर्वत्र असल्याने कर्जतकर नागरिकांच्या ” आरोग्याचा ” प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीपट्टीची आकारणी ” अव्वा च्या सव्वा ” असताना चांगली सेवा पुरवण्याची सोडून गढूळ व दूषित पाणी देत असल्याने या दूषित पाण्यामुळे लहान मुले , ज्येष्ठ नागरिकांना , आजारी रुग्ण यांना त्रास होऊन आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियमित पाणी पट्टी भरूनही माती मिश्रित पाणी आणि दूषित पाणी प्यायचे का ? असा संतप्त सवाल मुद्रे येथील रहिवासी व ” छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटनेचे ” संघटक तुषार बनसोडे यांनी केला आहे.



