……” विधान परिषद निवडणुक आचार संहिता व पूरग्रस्त परिस्थितीमुळे सर्वसाधारण सभा घेणे अशक्य “…….
नगराध्यक्षा " सौ पुष्पाताई दगडे " यांचा खुलासा !

विरोधी पक्षातील नगरसेवकांना देखील वेळोवेळी सांगून ” संभ्रम ” दूर केल्याची माहिती……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
काल कर्जत नगर परिषदेतील विरोधी पक्ष नेते ” ॲड संकेत दादा भासे ” यांनी सत्ताधारी परिवर्तन विकास आघाडी व पालिका प्रशासनावर ” सर्वसाधारण सभा ” तीन महिने घेतली नसल्याने नागरिकांच्या समस्या सुटत नसल्याचे सांगत तीव्र संताप व्यक्त केला होता . यावर कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा ” सौ पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे व उपनगराध्यक्ष संतोष दादा पाटील ” यांनी या केलेल्या आरोपांचे खंडण करत खुलासा केला असून आम्ही लोकशाही जपणारे सत्ताधारी असल्याचे सांगितले आहे .

याबाबतीत खुलासा करताना नगराध्यक्षा सौ पुष्पाताई दगडे यांनी प्रेस नोट द्वारे खुलासा केला आहे की , कर्जत नगरपरिषदेची ” मे ” महिन्यातील सर्वसाधारण सभा महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर संपूर्ण राज्यात आदर्श ” आचारसंहिता ” लागू करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान लागू झालेल्या आचारसंहितेच्या अनुषंगाने नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा घेणे शक्य नसल्यामुळे सदरची सभा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर दि. ६ जुलै २०२६ रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेचा अजेंडा प्रसिद्ध करण्यात आला होता , मात्र त्याच दिवशी कर्जत शहर व परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती. शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते आणि जनजीवन विस्कळीत झाले होते. या प्रतिकूल परिस्थितीमुळे सर्वसाधारण सभा नियोजितप्रमाणे घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे दि. ६ जुलै २०२६ रोजीची सर्वसाधारण सभा देखील रद्द करण्यात आली.
सदर दोन्ही सभा रद्द करण्यात येत असल्याबाबतची पूर्वकल्पना विरोधी पक्षातील सर्व नगरसेवकांनाही वेळोवेळी देण्यात आली होती. त्यामुळे सभा रद्द करण्याबाबत कोणतीही माहिती लपविण्यात आलेली नव्हती किंवा कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये याची दक्षता घेण्यात आली होती. तर आता लवकरच सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा सौ पुष्पाताई दगडे व उपनगराध्यक्ष संतोष दादा पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने याबाबत गैरसमज करून घेऊ नये , असे खुलासा केला आहे .




