……” आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या माध्यमातून कर्जतमध्ये विकासकामांचा धडाका “…..
अंदाजे " ६ कोटींच्या " निधीतून विविध कामांचे भूमिपूजन !

कर्जत नगर परिषदेचे ” गटनेते संकेत दादा भासे ” यांची उपस्थिती…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक सक्षम आणि दर्जेदार स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी मंजूर झालेल्या अंदाजे ६ कोटी रुपयांच्या निधीअंतर्गत कामांचा शुभारंभ करण्यात आला. शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक संकेत दादा भासे यांच्या उपस्थितीत या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या विकासकामांमुळे शहरातील अनेक प्रभागांमधील रस्ते, गटारे आणि इतर नागरी सुविधांशी संबंधित प्रश्न मार्गी लागणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कर्जत नगरपालिका हद्दीत वाढत्या लोकसंख्येनुसार पायाभूत सुविधांचा विकास होणे आवश्यक आहे. यासाठी आमदार महेंद्र शेठ थोरवे सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करत असून नगरविकास विभागामार्फत विविध विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात यश मिळवले आहे. या निधीतून शहरातील अनेक प्रलंबित कामे पूर्ण होणार असून नागरिकांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे.

या विकासकामांच्या भूमिपूजनाची सुरुवात दहिवली परिसरातील सोनार आळी येथून करण्यात आली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्ते व गटारांच्या कामांना अखेर ” हिरवा कंदील ” मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल गटनेते संकेत दादा भासे यांचे आभार मानले.
यावेळी बोलताना संकेत दादा भासे यांनी , कर्जत शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प पुन्हा अधोरेखित केला. शहरातील प्रत्येक गल्ली-बोळात दर्जेदार आणि प्रशस्त रस्ते निर्माण व्हावेत तसेच सांडपाणी आणि घाण वाहून नेण्यासाठी सक्षम गटार व्यवस्था उभारली जावी, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न सोडविणे ही आपली प्राथमिकता असून विकासकामांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच ही कामे मंजूर झाली असून भविष्यातही शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असेही संकेत दादा भासे यांनी नमूद केले. विरोधी पक्षात असलो तरी विकासाच्या बाबतीत कोणतीही राजकारणाची अडचण येऊ देणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.
या प्रसंगी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने कर्जत शहराच्या विकासाला नवी गती देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मंजूर झालेल्या विकासकामांमुळे शहरातील पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार असून नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात करणाऱ्या या भूमिपूजन सोहळ्यामुळे कर्जत शहराच्या प्रगतीला नवे बळ मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.




