…..” विजेची बत्ती गुल म्हणून संताप , तर पाणी टंचाईने कर्जतकर हैराण “…..
उपकार्यकारी अभियंता " केंद्रे " यांची हकालपट्टी करा , नागरिकांची संतप्त मागणी !

कर्जतमध्ये ” ५७ करोडच्या ” नवीन पाणी योजनेचे काम ” संथ कासव ” गतीने…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
अजून पावसाला सुरुवात नाही झाली तरी कर्जत तालुक्यातील वीज वेळी अवेळी जात असून कधी झंप्पर उडाला , कधी ब्रेकअप झाले , कधी वायर तुटली , कधी ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड झाला , वायरवर झाडाची फांदी पडली , अश्या ना – ना समस्याने सध्या वीज जात असल्याने नागरिकांत वीज कंपनीच्या ” बेजबाबदार ” कारभारामुळे संताप खदखदत आहे . सततच्या ” बत्ती गुल ” मुळे याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या जीवनमानावर होत असल्याने कर्जतकर नागरिक हैराण झाले आहेत . त्यातच भरीसभर म्हणून कर्जत नगर परिषदेच्या कारभाराची सत्ता येऊन सहा महिने होऊन गेले तरी कारभाराची घडी अजून नीट बसली नसल्याने ” ५७ करोड ” रुपयांची नवीन ” पाणी योजनेचे ” काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना जुन्या पाणी योजनेचे पाणी मिळण्यास ” कंठ ” दाटून येत आहे . त्यामुळे अनेक प्रभागात ” टँकरने ” पाणी मागविले जात आहे.

गेली अनेक महिने आठवड्यातून २ दिवस वीज कंपनी कर्जतमध्ये ” शट डाउन ” घेऊन प्रभागात काम करत असते , तर इतर वेळी देखील वीज गायब असते , तसेच रात्री बेरात्री देखील वीज जाण्याने नागरिकांचा , व्यापारी वर्ग , ज्येष्ठ नागरिक , महिला वर्ग , विद्यार्थी , शासकीय कामकाजात , बँकेत या अकाली वीज जाण्याने प्रचंड नुकसान होत असून तर त्याचा रोजच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे . वीज नसल्याने नागरिकांना पाणी देखील मिळत नसल्याने वीज कंपनीवर साहजिकच चीड येत असून नागरिक वीज कंपनीच्या या बेभरोशी कामकाजावर संताप व्यक्त करून उपकार्यकारी अभियंता ” केंद्रे ” यांची येथून ” हकालपट्टी ” करण्याची मागणी करत आहेत .

त्यातच कर्जत शहरात ५७ करोड रुपयांची नवीन पाणी योजनेचे काम सुरू असून ते अतिशय ” संथ कासव गतीने ” सुरू असल्याने सर्वच प्रभागात पाण्याची बोंबाबोंब सुरू आहे . या पाणी योजनेवर पालिका प्रशासनाचे व सत्ताधारी ” कर्जत परिवर्तन विकास आघाडीचे ” अंकुश नसल्याचे दिसून येत आहे . पाऊस तोंडावर असताना देखील खोदलेले रस्ते व्यवस्थित केले नाहीत त्यामुळे पावसात सर्व प्रभागात सगळीकडे ” खताडा ” होणार असल्याचे चित्र आहे . 
त्यामुळे वीज कंपनीने आपला गलथान कारभार सुधारावा , अन्यथा नागरिकांना ” काळोखात ” ठेवायला गेलात तर संतप्त नागरिक तुमचे ” तोंड काळे ” केल्याशिवाय रहाणार नाहीत ,अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे , तर कर्जत नगर परिषदेने देखील पाणी योजनेचे काम जलद गतीने करावे , अशी संतप्त मागणी ” छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटनेने ” केली आहे .



