…..” लोकल मधील प्रवास व सीट वरून भांडणात चाकू हल्ला “…..
या गंभीर हल्ल्याचा अवघ्या १२ तासांत " कर्जत रेल्वे पोलिसांनी " लावला छडा !

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ” किरण मतकर ” यांच्या मार्गदर्शनाखाली ” कर्जत रेल्वे पोलीसांची ” धडाकेबाज कामगिरी…….
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
अपुऱ्या रेल्वे लोकल त्यात भरमसाठ गर्दी त्यामुळे जागेवरून भांडणे हि नेहमीच होत असतात मात्र कधी कधी हि भांडणे जिवावर बेतण्याच्या घटनेमुळे नागरिकांना हा प्रवास चिंतेची बाब असते . मात्र नेहमीच नागरिकांची सुरक्षा करण्यास तत्पर असलेले रेल्वे पोलीस अश्या गुन्हेगारी प्रवृत्तीला ठेवून काढण्यास सक्षम ठरले आहेत . अशीच एक घटना रेल्वे लोकल मध्ये घडली असताना कर्जत रेल्वे पोलिसांनी आरोपींना १२ तासात सीएसएमटी – खोपोली लोकलमधील प्रवाशावर चाकूने हल्ला करून मारहाण करणाऱ्या आरोपींचा शोध घेत कर्जत रेल्वे पोलिसांनी या गंभीर गुन्ह्याचा उलगडा करत दोन आरोपींना अटक केली आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई उल्लेखनीय मानली जात असून, पोलिसांच्या तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीश कुमार बोलामनी पाठक ( वय 26, रा. मस्जिद बंदर, मुंबई ) हे गुरुवारी (दि. 11 जून) सकाळी सुमारे 6.30 वाजण्याच्या सुमारास भायखळा रेल्वे स्थानकावरून सीएसएमटी – खोपोली लोकलच्या सीएसएमटी बाजूकडील लगेज डब्यातून प्रवास करत होते. दरम्यान, लोकल वांगणी रेल्वे स्थानक ओलांडल्यानंतर सीटवर बसण्याच्या किरकोळ कारणावरून काही तरुणांशी त्यांचा वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले असून, आरोपींनी फिर्यादीच्या पोटात चाकूने वार करून गंभीर दुखापत केली , तसेच हाताने मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 80/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(2), 115(2), 352 व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार दुपारी तपासाची सूत्रे हलताच कर्जत रेल्वे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कड आणि गुन्हे शोध पथकाने उल्हासनगर, शेलू, नेरळ रेल्वे स्थानकांसह नेरळ शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत नेरळमधील ममदापूर परिसरातून दोन संशयितांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे इब्रान इद्रिस अन्सारी (वय 18, रा. नेरळ, ता. कर्जत) आणि करण कन्हैयालाल अग्रवाल (वय 22, रा. शेलू, ता. कर्जत) अशी आहेत. दोघांना चौकशीअंती रात्री 9.25 वाजता अटक करण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी सिद्धार्थ गायकवाड (रा. नेरळ) हा फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १२ तासांत आरोपींना अटक करण्यात कर्जत रेल्वे पोलिसांना यश आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे. रेल्वे प्रवाशांमध्येही या कारवाईमुळे सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त राकेश एम. कलासागर, पोलीस उपआयुक्त प्रज्ञा जेडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त नंदराज पाटील तसेच कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण मतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत पीएसआय भाऊसाहेब कुरुंद, गुन्हे तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कड, पोलीस हवालदार प्रवीण कांबळे, हमीद शेख, सचिन चव्हाण तसेच पोलीस अंमलदार नितीन मोहिते, चोरमले, श्रीकांत जाधव, प्रवीण मुलमुले आणि अक्षय पेरणेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्वांना शाबासकीची थाप कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ” किरण मतकर ” यांनी दिली .




