……” मृत्यू पत्रावरून वारसाची नोंद करण्यासाठी ३ वेळा नोटीस बजावून ” कर्जत भूमिलेख कार्यालयाचा ” अजब प्रकार “……
" सुधांशू वणगे " यांनी माहिती अधिकारात विचारल्यावर माहिती देण्यास टाळाटाळ !

” कचऱ्याची टोपली ” दाखविणाऱ्या संबंधितांवर ” कारवाई ” होण्यासाठी अपिल…….
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
आपल्या वडिलांच्या मृत्यू पत्रावरून मुद्रे ( बु ) येथे असलेल्या नगर भूमापन क्रमांक ५६ जागेवर मृत्यूपत्राने नाव अधिकार अभिलेखात दाखल करणेसाठी ऑनलाईन अर्ज श्री. सुधांशु द्वारकानाथ वनगे यांनी सर्व कागदपत्रासहीत दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी सादर केला असता कर्जत भूमी अभिलेख कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी पंधरा – पंधरा दिवसांच्या ३ वेळा नोटीस देऊन जाणून बुजून व ” काही अपेक्षा ” ठेवून मानसिक त्रास देण्याचा अजब प्रकार ” सुधांशू वणगे ” यांच्या पाठपुरावा केलेल्या कागदपत्रांवरून दिसून येत असून याविरोधात ते ” माहिती अधिकारात ” गेले असता हि माहिती देण्यास देखील टाळाटाळ करत असून माहिती अधिकार पत्राला ” केराची टोपली ” दाखविण्याचा संताप जनक प्रकार चालवला असल्याने याविरोधात संबंधित अधिकारी वर्गावर कारवाई होण्यासाठी ते पुन्हा अपीलात गेले आहेत.

कर्जत नगर परिषद हद्दीतील मुद्रे ( बु ) येथे रहाणारे ” सुधांशू वणगे ” यांनी त्यांचे वडील द्वारकानाथ आत्माराम वनगे यांनी केलेल्या मृत्यू पत्रावरून मुद्रे ( बु ) येथील नगर भूमापन क्रमांक ५६ जागेवर आपली नोंद होण्यासाठी उप अधीक्षक भूमी अभिलेख कर्जत या कार्यालयात सर्व कागदपत्रे सादर करून दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी अर्ज केला होता . यावर भूमी अभिलेख कार्यालयाने एकच १५ दिवसांची चावडीवर नोटीस जारी करून त्यानंतर त्यांची फेरफार नोंद करणे अनिवार्य होते. मात्र कर्जत भूमी अभिलेख कार्यालयातील संबंधित अधिकारी वर्गाने तसे न करता ” दिनांक ४ मे २०२६ – २२ मे २०२६ व १६ जून २०२६ ” अश्या तीन चावडीवर नोटीस जारी केल्या . यामध्ये नाहक ४५ दिवसांचा अवधी गेला. सदरच्या ” संशयास्पद ” प्रकारामागे संबंधित अधिकारी वर्गाचा काय हेतू होता , हा स्पष्ट न समजल्यामुळे सुधांशू वणगे यांना नाहक मानसिक व शारीरिक त्रास झाला.
याविरोधात सुधांशू वणगे यांनी ३ चावडी नोटीस जारी करण्याचे कारण माहिती अधिकार पत्र सादर करून कर्जत भूमी अभिलेख कार्यालयात विचारणा केली असता , माहिती अधिकार अधिनियम २००५ ची हेळसांड करून ” केराची टोपली ” दाखवली असून माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. म्हणूनच याविरोधात आपल्याला न्याय मिळण्यासाठी त्यांनी अपिलीय अर्ज केला आहे. याबाबत आता उप अधीक्षक भूमी अभिलेख अपिलीय अधिकारी काय न्याय देतात , याकडे सुधांशू वणगे यांचे लक्ष लागून आहे.




