……” गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटेवर मदतीचा हात , अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्ट चा स्तुत्य उपक्रम “…..
१५ ऑगस्ट रोजी एन. डी. स्टुडिओ येथे हजारो विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग, छत्री व वह्यांचे वाटप !

नामदार ” ॲड. आशिष शेलार ” यांच्या सहित ” आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र शेठ थोरवे आणि माजी आमदार देवेंद्र साटम ” यांची प्रमुख उपस्थिती……..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
आजच्या या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात ” शिक्षण हेच खरे सामर्थ्य आहे ” या विचारातून समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देण्यासाठी ” अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्ट ” च्या वतीने हजारो विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग, छत्री आणि वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कर्जत फाटा जवळील ” एन. डी. स्टुडिओ ” येथे या भव्य सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार ॲड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र शेठ थोरवे आणि माजी आमदार देवेंद्र साटम हे उपस्थित राहणार आहेत.
आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, तसेच त्यांना शैक्षणिक साहित्याची कमतरता भासू नये, या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याबरोबरच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देऊन उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लावण्याचा व शिक्षण क्षेत्रात ” गरुड भरारी ” घेण्यासाठी त्यांच्या ” पंखात बळ ” देण्यासाठी हा छोटासा प्रयत्न असल्याचे आयोजक ” अशोक छाजेड ” यांनी सांगितले.
या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध होणार असून, त्यांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी, विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन ” अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टचे ” उपाध्यक्ष ॲड. संतोष खांडेकर यांनी केले आहे.




