……..” कर्जतची शान राजाभाऊ कोठारी सर् “…….
" जानेवारी १९८९ ते जून २०२६ " पर्यंत " ५४० " रक्तदान शिबिरे घेऊन " ६२ हजार " रक्त पिशव्या संकलनाचा विश्व विक्रम !

ज्ञान व रक्तदानातून ” कवच कुंडले ” देवून जीवन घडविणारा देव रुपी माणूस…….
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
” खरा तो एकची धर्म – जगाला प्रेम अर्पावे ” , या विचार ध्येयाने पछाडलेला व्यक्ती आपले ध्येय गाठून त्यातून मिळणाऱ्या ” अनमोल साठ्याचा ” जगाला फायदा कसा होईल , हे स्वप्न उराशी बाळगून कार्य करत असतो , त्याचा प्रत्यय कर्जत तालुक्यात ” रक्तदाते राजाभाऊ कोठारी सर् ” यांच्या ध्येयवेड्या ” रक्त संकलनातून ” दिसून येत आहे . हि मालिका आजपर्यंत सुरू ठेवून अनेकांना ” जीवनदान ” देण्याचे पुण्य त्यांच्या हातून घडत आहे . आधुनिक आणि तंत्रज्ञान युगात धावपळीच्या जीवनात व सभोवतालच्या वातावरणामुळे , खाण्यामुळे तरुणांना तसेच वयोवृध्द नागरिकांना नवनवीन आजारांना सामोरे जावे लागत आहे. डेंग्यू , मलेरिया , अपघात , तर नेहमीच १५ दिवसांनी रक्त चढवणारे ” थैलेसिमीया ” या आजाराचे रुग्णांना वेळीच रक्त देवून ” कवच कुंडले ” देणारा राजाभाऊ कोठारी सर् ” देव माणूसच ” ठरत आहे .
कर्जत मध्ये राजाभाऊ कोठारी सर् एका सामान्य कुटुंबात जन्माला आले. वयाच्या १२ व्या वर्षीच त्यांचे वडील मयत झाल्याने न डगमगता ” आई मधुकांता व भाऊ गोपाळ ” यांच्या संस्कारात ते कॉमर्स मधून पदवीधर झाले . गरीब गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांना ” विद्येचे ज्ञानार्जन ” देवून शिक्षणात पारांगत केल्यास हजारो कुटुंब सावरले जातील , अशी धारणा घेवून त्यांनी खाजगी क्लासेस सुरू केले . त्यामाध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले . उच्च पदाची नोकरी , उद्योजक , डॉक्टर , वकील , सी. ए. असे विद्यार्थी घडवून देशसेवा त्यांनी केली . हे करत असतानाच ” रक्तदान श्रेष्ठ दान ” आहे , हि देशव्यापी संकल्पना त्यांनी मनाशी बाळगून रक्तदानाच्या कार्यामध्ये अनेक संस्थांना , मंडळे , राजकीय पक्षांना सहभागी करून त्यांनी रक्तदानाचे महत्व पटवून दिले . म्हणूनच जानेवारी १९८९ पासून ते जून २०२६ पर्यंत त्यांनी एकूण ५४० रक्तदान शिबिरे कर्जत खालापूर तालुक्यात घेतली , त्यात त्यांनी स्वतः १०७ वेळा रक्तदान केले तर आजवर जमा झालेल्या एकूण रक्त पिशव्या ६२ हजारच्या वर असा त्यांचा ” विश्व विक्रम ” आहे . एकदा रक्तदान कराल तर ते ” तीन ” जणांना उपयोग होतो , रक्ताला जात-पंथ-धर्म- गरीब-श्रीमंत हे भेदभाव नसतात , रक्त दिल्याने वाढते. ज्ञानदान – अन्नदान – व आता ” सर्वश्रेष्ठ रक्तदान ” झाले आहे , तुम्ही केलेले रक्तदान दुर्धर आजारी असणाऱ्यांना उपयोगी येते .रुग्णांना जीवन जगण्यासाठी ” कवच कुंडले ” ठरतात , हे पटवून देण्यात ते यशस्वी झाले आहेत .
कोरोना लॉक डाऊनच्या काळात एकूण १४ रक्तदान शिबिरे आयोजित करून ११३८ रक्तबाटल्या संकलित करून अनेकांचे जीव त्यांनी वाचविले . म्हणूनच त्यांना आजपर्यंत ” अनंत काका जोशी प्रतिष्ठान ” तर्फे १ लाख रुपयांची बक्षिस थैली भरत कुमार राऊत व अनंत काका जोशी यांच्या हस्ते देवून ” कर्जत भूषण ” म्हणून सन्मानित करण्यात आले होते . ६ मार्च २०२२ ” रायगड भूषण ” पुरस्कार , २८ नोव्हेंबर २०२३ रोजी महानगर या वृत्तपत्र समुहा तर्फे ” महागौरव ” , २ मार्च २०२४ रोजी शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्था मुंबई च्या वतीने ” राजेश्री जीवन गौरव ” पुरस्काराने सन्मानित , १७ जुन २०२४ रोजी नितीन दादा सावंत – रायगड उपजिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने ” शिक्षक रत्न ” पुरस्काराने सन्मानित , तर ” महा रक्तवीर ” म्हणून त्यांना ” राष्ट्रीय पुरस्कार ” देण्यात आला आहे , त्याचप्रमाणे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अगदी राज्यपालांपासून ते तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , आरोग्यमंत्री राजेशजी टोपे, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून त्यांचा सन्मान झाला आहे. या सर्व सर्वोच्च समाज कार्यात आईंचा आशीर्वाद , व त्यांच्या ” सौभाग्यवती हेमा ” या सावली सारख्या व खंबीर पाठींबा देवून उभ्या असल्यानेच हे साध्य झाले आहे.

राजाभाऊ कोठारी सर् कर्जत स्मशानभूमी समिती उपाध्यक्षपद , अभिनय ज्ञान मंदिर संस्थेच्या कार्यकारी मंडळ सदस्य , कोंकण ज्ञानपीठ संस्थेच्या महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य , सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सल्लागार , कडाव बालदिगंबर मंदिराच्या ट्रस्टचे खजिनदार , म्हणून काम पहात आहेत , तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे ते कर्जत शहर अध्यक्ष होते. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना कर्जत नगर परिषदेवर स्वीकृत नगरसेवक नियुक्ती करून अजून जोमाने कार्य करण्यास वाव दिला आहे . 
असे ज्ञानातून विद्येचे धडे देवून ” आधुनिक द्रोणाचार्याची ” व रक्तदान करून ” कर्णाला ” देखील लाजवेल असे सर्वश्रेष्ठ ” दान ” आपल्या हातून सत्कर्म घडवून रक्तातून ” कवच कुंडले ” देवून अनेकांचे जीवन वाचविणारे ” देव रुपी माणूस ” राजाभाऊ कोठारी सर् यांचे कार्य महान असून त्यांचे आयुष्य दीर्घायुषी होवो , हिच त्यांच्या आज मंगळवार ” ३० जून ” जन्मदिनी ईश्वर चरणी प्रार्थना ! 




