……” धावती लोकल थांबत नाही – पण तुम्ही थांबा , रेल्वे रुळ ओलांडू नका – सुरक्षित प्रवास करा ” , वरिष्ठ पोलीस निरीक्षक ” किरण मतकर यांचा नागरिकांना संदेश “…….
" जीवन रक्षा अभियान " , अंतर्गत कर्जत रेल्वे स्थानकावर सुरक्षा जनजागृती मोहीम !

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ” किरण मतकर ” यांच्या मार्गदर्शनाखाली ” पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ” सुरक्षेची केली मानवी साखळी……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
रेल्वेचा प्रवास करताना ” अवाजवी धाडस टाळा, जीवन अनमोल आहे , लाईन क्रॉसिंग करू नका , घरी कोणीतरी आपली वाट पाहत आहे , रेल्वेचे नियम पाळा , अपघात टाळा , धावती लोकल थांबत नाही, पण तुम्ही थांबा , वेळ वाचविण्यासाठी अपघात होवून आयुष्य घालवू नका , सुखी जीवनासाठी , सुरक्षित प्रवास करा , अशा प्रभावी संदेशांद्वारे प्रवाशांना सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देताना , रेल्वे रुळ ओलांडताना होणारे अपघात , अपमृत्यू आणि जखमींच्या घटनांना आळा घालण्यासाठी कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने बुधवारी दि. १७ जून २०२६ रोजी कर्जत रेल्वे स्थानकावर ” जीवन रक्षा अभियान ” अंतर्गत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे रेल्वे प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचे महत्त्व पटवून देत , वाहतूक आणि रेल्वे सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन , कर्जत रेल्वे स्थानकावर रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ” किरण मतकर ” यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार आज सकाळी ९ ते ११ या वेळेत कर्जत रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ व २ वर , सीएसएमटी आणि पुणे बाजूच्या परिसरात ही विशेष मोहीम आयोजित करण्यात आली होती. अनेक रेल्वे प्रवासी लोकल पकडण्याच्या घाईत रुळ ओलांडून जीव धोक्यात घालत असल्याचे निदर्शनास आल्याने ही सुरक्षेची मोहीम हाती घेण्यात आली.

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण मतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी निर्माण करून रेल्वे प्रवाशांना सुरक्षेचे धडे दिले. मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक देविदास वाल्मिकी , श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कड , आनंद लोखंडे , सूर्यकांत देसाई , सतीश व्हर्गे , पोलीस हवालदार राजेंद्र बागुल , आरपीएफ सब इन्स्पेक्टर सुहासिनी लादे यांच्यासह ३२ पोलीस अंमलदार, १ आरपीएफ जवान, २ एमएसएफ कर्मचारी, २० होमगार्ड, अभिनव ज्ञान मंदिर प्रशाळेचे ३ शिक्षक व ३० एनसीसी आणि आरएसपी विद्यार्थी तसेच कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष शिवसेवक गुप्ता, सदस्या शर्वरी कांबळे, भारती कांबळे आदी सदस्य सहभागी झाले होते.
यावेळी प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध घोषणा देण्यात आल्या. प्रभावी संदेशांद्वारे प्रवाशांना सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच रेल्वे पोलीस हे आपल्या प्रवासातील मित्र आहेत , रेल्वे प्रवासा दरम्यान कोणतीही अडचण निर्माण झाल्यास जीआरपी हेल्पलाईन क्रमांक ” १५१२ ” वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. धावत्या रेल्वेत स्टंटबाजी न करण्याचा, संशयास्पद वस्तूंना हात न लावण्याचा आणि तत्काळ रेल्वे पोलिसांना माहिती देण्याचा सल्लाही देण्यात आला.
या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनीही प्रवाशांना सुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे रेल्वे सुरक्षा आणि अपघात प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यास मोठी मदत झाली. या मोहिमेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये रेल्वे पोलिसांविषयी सकारात्मक भावना निर्माण झाली असून सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे पालन करण्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात यश आले.

कर्जत रेल्वे पोलिसांच्या या उपक्रमाचे प्रवासी व नागरिकांकडून स्वागत करण्यात आले असून भविष्यातही अशा जनजागृती मोहिमा सातत्याने राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




