……” अखेर कर्जत तालुक्यातील ठेकेदारांच्या बेमुदत उपोषणाला सुरुवात “……
थकीत बिलांच्या निधीसाठी " आमदार महेंद्र शेठ थोरवे " यांचे विधिमंडळाच्या अधिवेशनात जोरदार प्रयत्न !

जोपर्यंत निधी पास होत नाही , तोवर ” आर – पार ” ची लढाई लढणार – अध्यक्ष राहुलजी डाळींबकर
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यातील ठेकेदारांची प्रलंबित बिले मिळावी , या करिता ठेकेदार संघटनेने शासनाला मंगळवार दिनांक २४ मार्च पर्यंत ची मुदत दिली होती , परंतु त्यावर कुठलाच ” तोडगा ” न निघाल्याने अखेर कर्जत तालुका ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष ” राहुलजी डाळींबकर ” यांच्या नेतृत्वाखाली सर्व ठेकेदारांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेऊन आज बुधवार दिनांक २५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडत ” बेमुदत उपोषणाला ” सुरुवात केली . ठेकेदारांची साधारणतः मागील तीन वर्षापासुन देयके प्रलंबित आहेत. त्यामुळे ठेकेदारांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे , तर कुटुंबाला देखील उपासमारीची वेळ आली आहे . शासनाकडून वरील देयके अदा होत नाहीत तो पर्यंत उपोषण सुरु राहील. आता ही ” आर – पार ” ची लढाई असल्याचे , ठेकेदार संघटनेने अध्यक्ष ” राहुलजी डाळींबकर ” यांनी म्हटले आहे .
कर्जत तालुका हा बहुसंख्य आदिवासी भाग असल्याने त्यांच्या भागात केलेल्या कामांची देखील बिले प्रलंबित असल्याने ठेकेदार संघटनेने संताप व्यक्त केला आहे . विकास कामांसाठी घेतलेले कर्ज व त्याचे व्याज देखील वाढत असल्याने , गेली ३ वर्षे प्रयत्न करूनही बिलांची रक्कम मिळत नसल्याने शासनाचे ” डोळे ” उघडण्यासाठी कर्जत तालुका ठेकेदार संघटनेने अखेर बेमुदत उपोषणाचा मार्ग पत्करला आहे .
कर्जत तालुक्यातील आदिवासी उप योजना अंतर्गत साधारणतः एकशे पंचवीस कोटी , ट्रायबल मधील कामांची एकशे नव्वद कोटी तसेच विविध हेड खाली साधारणतः पन्नास कोटी इतक्या रक्कमेची एकूण २०३. ९५ कोटी इतकी बिले प्रलंबित असून मागील दीड वर्षात ठेकेदारांना एकही रुपयाचे बील मिळाले नाही. यासंबंधी आमदार महेंद्र शेठ थोरवे हे विधिमंडळ अधिवेशनात जोरदार प्रयत्न करणार असून नक्कीच निधी मंजूर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .

या बेमुदत उपोषण आंदोलनाला ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष राहुलजी डाळींबकर , सेक्रेटरी उदय दादा पाटील , सहित कर्जत तालुक्यातील सर्व ठेकेदार या उपोषणात सहभागी झाले आहेत.





